Friday, April 23, 2021

अतिरिक्त कार्यभार

*अतिरिक्त कार्यभार*
शासनामध्ये रिक्त पदांची संख्या प्रचंड आहे(तशीच बिनकामाच्यांची  सुद्धा प्रचंडच!). त्यात पुन्हा रजा, बदल्या, पदोन्नती, सेवानिवृत्ती या कारणामुळे सुद्धा पद रिक्त होतात. त्यामुळे प्रत्येक साहेबाला, कर्मचाऱ्याला बऱ्याच वेळेस अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागतो.  पण एक मात्र निश्चित आहे की पदं कितीही रिक्त असली तरी शासनाच कोणतंच काम थांबत नाही आणि  पदभरती केल्याबरोबर शासन एकदम गतिमान होत अस काही कुणाचं निरीक्षण नाही!!( त्यामुळे शासनाने गंमत म्हणून 5-25% पदं  जर कमी केली तर काय होईल याचा निष्कर्ष अविश्वसनीय  असेल).मुळात 'अतिरिक्त'(अति रिक्त?)  हा शब्दच बुचकाळ्यात टाकणारा आहे. आधीच रिक्त असलेल्या पदाला अति रिक्त कस करणार? काही काही साहेबांच्या तर  पदनामातच अतिरिक्त शब्द असतो!! बरं हे मुळातच 'अतिरिक्त' असलेले साहेब जेंव्हा  रजेवर जातात तरी ते पद रिक्त होते!!! आणि कोणाला तरी  'अतिरिक्त'साहेबांचा  अतिरिक्त कार्यभार सुद्धा  द्यावा लागतो!!!
मुळात अतिरिक्त कार्यभार कोणाला द्यायला पाहिजे हा विषय अतिशय गहन आहे. कोणत्या पदाचा अतिरिक्त कार्यभार द्यायचा आहे यावर पुढचं dynamics अवलंबून असतय. म्हणजे एखादा साहेब काम करून करून वैतागलेला असतो आणि त्यातली त्यात दोन चार प्रकरण त्याच्यासमोर अशी असतात ज्यामुळे साहेबाचं डोकं एकदम हँग झालेलं असतंय. त्यामुळे अशा परिस्थितीत समयसूचकता दाखवत काही तरी गंभीर कारण दाखवून हा साहेब  रजेवर जातो. रजा मिळणार नाही असं वाटलं तर बळच कुटाने करून आजारी पडतो पण रजेवर जातोच!  मग वरच्या साहेबाला दुसऱ्या कोणत्यातरी साहेबांकडे तिथला अतिरिक्त कार्यभार द्यावा लागतो. त्याच ऑफिसमधील एखाद्या कनिष्ठ साहेबांकडे जर अतिरिक्त कार्यभार द्यायचा असल्यास फारशी अडचण येत नाही मात्र   दुसऱ्या ठिकाणी काम करत असलेल्या साहेबाला जर कार्यभार द्यायचा असेल तर अडचण येते. वरचा साहेब त्या ठिकाणी कोणाची तरी  ऑर्डर काढणार  यापूर्वीच जोरदार हालचाली सुरू होतात. ज्या साहेबाना  अस वाटत ही अतिरिक्त  भानगड आपल्याच गळ्यात येऊ शकते ते आधीच साहेबाला भेटून त्याची तब्येत खराब, आजारी बायको घरात, पोराचं लग्न असले पाच पन्नास कारणं सांगून मोकळे होतो! वरचा साहेब पण सगळ्यात कमी resistance ज्या साहेबाकडून होईल त्याच्याच गळ्यात अतिरिक्त कार्यभार टाकतो. अतिरिक्त कार्यभार ज्या  पदाचा द्यायचा असेल ते पद जरा जास्तच अर्थपूर्ण असेल तर मात्र काही साहेब वरच्या साहेबांकडे  डायरेक्ट फिल्डिंग लावतात, काही साहेब  मोठ्या वजनदार व्यक्तींकडून फिल्डिंग लावतात, काही साहेब कसलीच फिल्डिंग लावत नाहीत पण त्यांना अस वाटत चार्ज आपल्यालाच मिळावा...अस सगळीकडूनच वरच्या साहेबांवर प्रेशर आल्याने त्याच पण डोकं जॅम होतंय.. शेवटी कोणाचीही ऑर्डर काढली तरी कोणीतरी नाराज होणारच पण इलाज नसतो!! मग त्यातली त्यात सोयीच्या साहेबाची ऑर्डर काढून वरचा साहेब मोकळा होतो. कधी कधी तर अतिरिक्त प्रभार कोणाकडे द्यायचा हे प्रकरण आपल्याला नीट हाताळता येणार नाही हे पाहून समयसुचकता दाखवत वरचा साहेब पण रजेवर गेल्याची उदाहरणे आहेत!!
सर्वात महत्वाचं म्हणजे अतिरिक्त कार्यभार देताना कार्यक्षमता हा विषय फारच गौण ठरतो. म्हणजे अस की ज्या  साहेबाला  त्याचंच काम आवरत नाही , ज्या कार्यलयात तो पूर्णवेळ असूनसुद्धा  ते पद रिक्त असल्यासारखा performance, त्यालाच अतिरिक्त कार्यभार दिला जातो!! 
एकदा का साहेबाला अतिरिक्त कार्यभार मिळाला की त्याला सगळ्याच विषयात सूट मिळते(किंबहुना तसा तो गैरसमज करून घेतो!). हा साहेब आढावा बैठकीला गेला आणि त्याला वरच्या साहेबानी काही विचारलं तरी हा सुरुवातीलाच  सांगणार माझ्याकडे दोन दोन चार्ज असल्यामुळे मला काम करायला खूप अडचण होत आहे  तरीसुद्धा मी भरपूर  प्रयत्न करत आहे, करून घेतो नक्की वगैरे वगैरे...हा अतिरिक्त प्रभार असलेला साहेब त्याच्या मूळ ऑफिसला सुद्धा कधीच सापडत नव्हता,आणि आता तर अतिरिक्त चार्ज असल्यामुळे साहेब licence मिळाल्यासारखा  दोन्हीकडून गायब असतो. साहेब इकडच्यांना सांगणार मी तिकडं आहे आणि तीकडच्यांना सांगणार मी इकडं आहे आणि हा असतो तिसरीकडच!('तिसरीकडच' हे व्यक्तिसुचक नसून स्थळसुचक आहे).मग इकडच्या कर्मचाऱ्यांना तिकडे सह्या घ्यायला बोलविणे आणि तिकडच्या कर्मचाऱ्यांना इकडे सह्या घ्यायला बोलविणे हे नित्याचेच!! हे सह्या घ्यायला जाणारे कर्मचारी पण आनंदाने इकडून तिकडे  बागडत जातात कारण एकदा साहेबाच्या सह्या घेतल्या की हे त्यांच्या ऑफिसला परत थेट दुसऱ्या दिवशीच उगवतात!  या अतिरिक्त कार्यभाराच्या राड्यात कार्यालयातील लोकं पण एकदम खुश असतात कारण ते कार्यालयाला जो इवलासा वेळ देत होते तो पण आता फावला व्हायला लागलेला असतो! साहेबांकडे लोकांच्या तक्रारी यायला लागतात की तुमच्या कार्यालयातील लोक कधीच जागेवर सापडत नाहीत, पण आपला साहेब त्यांना सुद्धा अतिरिक्त कार्यभाराच कारण सांगायला मागे पुढे पाहत नाही(म्हणजे अतिरिक्त कार्यभारापूर्वी एकदम रामराज्य होत!).
साहेब ज्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार घेतो त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना तंबी देऊन ठेवतो की बिनकामाची, भानगडीची, अडचणीची प्रकरणे माझ्यासमोर अजिबात साहिसाठी ठेवायची नाहीत. म्हणजे भानगडीची प्रकरणे कोणती हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार  तिथल्या कर्मचाऱ्यांना! मग त्याने काही आणो साहेब कोंबडा हाणून मोकळा.अशा पद्धतीने साहेब एकदम सोयीसोयीने अतिरिक्त कार्यभाराच्या ठिकाणी कामे करतो. एवढंच काय तर एखादं प्रकरण अडचणीचं वाटलं की साहेब सांगणार तुमचे रेग्युलर साहेब आले की त्यांच्याकडून करून घ्या...म्हणजे मूळ पोस्टिंग च्या ठिकाणी कशावर पण कोंबडे हाननारा साहेब इथं एकदम अभ्यासू साहेबासारखा आव आणतो.साहेब जास्तच रंगात आला तर त्याची मूळ पोस्टिंग च्या ठिकाणची कीर्ती सुद्धा सांगायला तो कमी करत नाही..!! एकंदरीत या साहेबांचा अंदाज आल्यामुळे तिथली भाऊ, दादा अँड गॅंग सुद्धा या साहेबाला जास्त कामे सांगत नाही, ते पण  म्हणतात 'आपला' रेग्युलरचा साहेब आला की बघू!!   ज्यांच्या गळ्यात बळच चार्ज मारलेला असतो ते एकतर अतिरिक्त कार्यभाराकडे लै फिरकत नाही, गेले तरी काहीच काम करत नाही तथा कोंबडे सुद्धा हाणत नाही, यांची strategy अशी असते की अस केलं तर लोकांच्या कामाचा खोळंबा होणार , लोक तक्रारी करणार मग वरचा साहेब आपला चार्ज  काढून टाकणार!! काही हौशी साहेबांनामात्र   मूळ साहेब परत रुजू व्हायला येणार असला तरी त्यांना चार्ज  सुटत नाही, अतिरीक्त कामाच्या सवयीची  हौसच न्यारी!('मूळ' सोडून 'अतिरिक्त' वर प्रेम करणे हा मानवी स्वभावच!). ते या अतिरिक्त चार्ज च्या काळात हे साहेब  चार्ज झाल्यासारखे गतिमान होतात, प्रत्येक क्षण मॅच मधला  शेवटचा बॉल समजून ते  जोरदार बॅटिंग करतात. त्यांचं हे 'अतिरिक्त'  प्रेम एवढं हाताबाहेर जातं की  ते वरच्या साहेबाला फोन करून मूळ साहेबाला अजून थोडे दिवस जॉईन व्हायला सांगू नका असा सल्ला( की दम?) द्यायला सांगतात!!             
एकदाचा मूळ साहेब जॉईन होतो..त्याला वाटत आता सगळं सुरळीत झालं असेल, अतिरिक्त साहेबांनी सगळ्या भानगडी मिटवल्या असतील वगैरे...पण..परिस्थिती वेगळी झालेली असते... या अतिरिक्त साहेबांनी भानगडी मिटवायच सोडाच, उलट अतिरिक्त भानगडी वाढवून ठेवलेल्या असतात..बाकी सगळ्याच विषयात भरपूर pendency...ज्या भानगडिंपायी साहेब रजेवर गेलेला असतो त्या नव्या दमाने साहेबावर चालून येतात....नंतर हा साहेब जेंव्हा आढावा बैठकीला वरच्या साहेबाकडे जातो तेंव्हा सांगतो मी रजेवर होतो त्यामुळे pendency आहे पण मी करून घेतो, लक्ष घालतो, दोन दिवसात करतो वगैरे....  मग मोठा साहेब पण  
डोक्याला हात लावून बसतो, वैतागतो... मग तो पण रजेवर जातो.. मग त्याच्या जागेवर कोणीतरी असाच 'अतिरिक्त'....क्रमशः
©गोविंद खामकर

(टीप: यापूर्वीचे सर्व 13 लेख याच page वर उजव्या बाजूला उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)

Friday, April 16, 2021

साहेब आणि Whatsapp

साहेब आणि whatsapp!!!

माहितीच्या अधिकारानंतर प्रशासनात  अमूलाग्र बदल  करणारा घटक म्हणजे  Whatsapp !! क्रांतीच म्हणा ना!  एक  महत्वाची गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की whatsapp ला अजूनही email सारखा official communication चा दर्जा नाही मात्र whatsapp शिवाय सध्या शासनाच पानही हालत नाही( पण शासन हा बदल  लवकर करणार नाही हे ठरलेलं!!). या App च्या माध्यमातून प्रशासनातील 'कार्यक्षम' टपाल यंत्रणेच अपयश झाकण्यास मदत होते. साहेबाला टपालातून पत्र वेळेवर जाणार नाहीच  याची खात्री असल्याने साहेब पत्र कोंबडा हाणल्याबरोबर( कधी उत्साहाच्या भरात कोंबडा हाणण्याच्या आधीच!) whatsapp च्या ग्रुप वर फेकून मोकळा!! पण एकंदरीत यामुळे प्रशासन गतिमान झाल्याचा भास तेवढा निर्माण होतो. म्हणजे अस  की मंत्रालयातून एखादं पत्र निघालं की ते तात्काळ मोठ्या साहेबाच्या ग्रुप वर येत! तिथून मोठा साहेब ते उचलून खालच्या साहेबाच्या ग्रुप वर फेकून मोकळा होतो.. मग खालचा साहेब त्याच्या कर्मचारी ग्रुप वर फेकणार... पत्र निघाल्यापासून तर इथपर्यंतच प्रवास फारतर एक तासाचा!!!  पण..... पण.... इथून पुढं काही खरं नाही!! खालचे अर्धे (संख्येने बरं का!) कर्मचारी ते 2-4 दिवस पाहतच नाहीत,   ज्यांनी पाहिलं ते वाचत नाही, जे वाचतात त्यांना ते समजत नाही, ज्यांना समजत ते काहीच करत नाहीत... गतिमान प्रशासन जिंदाबाद!!!
पण ही गतिमानता वरच्या साहेबाना मात्र एकदम ओरिजनल वाटते!  म्हणजे काही साहेब  निद्रानाश झाल्यासारखे रात्री 12:00 वाजता message टाकून त्यांना सकाळी 8:00 वाजता माहिती आवश्यक असते. ते काही का असेना पण ही माहिती सकाळी  8:00 वाजता  सगळे देतील ही अपेक्षा(भाबडी?) ठेवायला सुद्धा लै मोठ्ठ काळीज लागतं! जीवनात सकारात्मकपणा असावा  पण इतका!!! पण तरीसुद्धा सगळ्या साहेबाना whatsapp च्या माध्यमातून सगळ्यांना 24 तास on duty  असल्यासारखा फील येतो. 
जेंव्हा वरचा साहेब एखादा message टाकतो त्याला लगेच कोणी reply देत नाही...पण  ग्रुप मधलाच एखादा साहेब जबाबदारी घेऊन   Yes Sir म्हणला रे म्हणला की  टोळधाड पडल्यासारखी लगेच सगळे Yes Sir, Yes Sir म्हणून मोकळे होतात!  Yes Sir चा जरा कंटाळा आला तर त्याच Advance Version म्हणजे Noted Sir चा वापर होतो. दिवसभर फक्त Yes Sir, Noted Sir, Sure Sir, Sir...मेलो सर!!! एवढंच चालू असतंय... कधी कधी तर एवढा बाका प्रसंग तयार होतो की reply द्यावा तर काय द्यावा हा प्रश्न!!!  उदा. तुमचा performance अमुक अमुक विषयात अत्यंत ढिसाळ आहे असं वरचा साहेब लिहितो.... या ठिकाणी Yes Sir, Noted Sir ही आयुध उपयोगी पडत नाहीत आणि स्वतःला justify करण्याइतपत तर performance पण नसतो आणि reply नाही दिला तर वरच्या  साहेबाचा ego hurt  होऊन तो  नाराज!! कधी कधी वरचा साहेब भली मोठी 60-70 पानांची pdf टाकतो आणि खाली लिहितो .. go through it!!(हे वरच्या साहेबांनी पण वाचलेले नसतंय तो भाग वेगळा!). इकडं साहेबाला कशावर सही करतो ते कळेना आणि हे असलं साहेब कधी वाचणार!! तरी पण साहेब ती pdf 100% वाचणार असल्यासारखं Yes Sir म्हणून टाकतो. काही काही साहेब ग्रुप वर उगाच एखादी जनहितार्थ पोस्ट ग्रुप वर टाकतात उदा. आरोग्य कसे जपावे  वगैरे   पण असल्या साहेबाच्या नादी वरचे साहेब पण लागत नाहीत!
कधी कधी वाटत whatsapp ने साहेबांमध्ये Rat Race लावण्याचा  मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, काही  वरचे साहेब याचा खुबीने वापर करतात. मग दिवसभर हे पटाईत साहेब कसले कसले report टाकून एकदम live commentary  चालू असल्यासारखं ..this  district performing excellent...this this team need to push hard.... come on... Last Lap... Sprint!!!  ...या मायाजालात सगळे साहेब अडकतात... यामध्ये अडचण सांगायची सोयच नसते.. अमुक जिल्हा करतोय तर तुम्हाला काय अडचण आहे? अशा स्थितीत तळातल्या जिल्ह्याकडे, तालुक्याकडे क्षुद्र नजरेने पाहिले जाते.. सगळ्यात चांगला performance असलेल्या  साहेबाला सातत्य ठेवण्यासाठी झोपेला उसंत मिळत नाही आणि सगळ्यात कमी performance असलेला  साहेब टेंशन मूळ झोपू शकत नाही... दोघांचा निद्रानाश!! मध्यम performance असलेले साहेब आणि commentary वाला साहेब हे दोघे निवांत झोपतात!!!
ते जाऊद्या पण एरवी चांगली मराठी बोलणारे पण whatsapp वर इंग्रजीवर घसरतात!  काही साहेब तर एकदम अवघड इंग्रजी लिहू लिहू सगळ्यांना impress करायचा प्रयत्न करतात. त्यांना असं अवघड लिहून स्वतःबद्दल एकदम भारी फील येतो...म्हणजे एकदम elite class मध्ये असल्यासारखं!! जे वाचल्यानंतर  समजत नाही त्याला भारतीय लोक भारी म्हणतात या वृत्तीचा फायदा उठविण्याचा हे लोक प्रयत्न करतात. पण असले अवघड इंग्रजीतील message जशास तसे खालच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुप वर टाकण्याच धाडस खालचे साहेब करत नाहीत!! आणि तसला अवघड message ते खलच्यांना  decode करून सांगण्याच्या भानगडीत पण  पडत नाहीत. बरं ज्या साहेबांचं इंग्रजी जरा बरं आहे त्यांचं ठीक आहे पण ज्यांना इंग्रजी नीट येत नाही त्यांनी कशाला शायनिंग करावी?  हे असले साहेब हाताने आपली माती करून घेतात!(म्हणजे ते मुळात लै भारी असतात असंही काही नाही!!). पण यांच्या चुकीच्या english वर कोणीच comment करत नाही अथवा smiley पण देत नाही ! त्यातली त्यात VC मध्ये वगैरे वरचे साहेब जे इंग्रजी शब्द वापरतात हाच यांच्या vocabulary चा प्रमुख स्रोत असतो. त्यामध्ये low hanging fruit, war footing , mission mode असल्या परवलीच्या शब्दांचा समावेश असतो पण spelling ची वाट लावलेली असते.. हे  साहेब Arjent, Siriysly, Imigetly, Karona असलं बिनधास्त लिहितात पण त्यांना सगळे मोठ्या मनाने समजून घेतात!!! काही काही साहेब तर काहीच कारण नसताना hdkksuhdjdj असलं काहीतरी  चुकून type करून post करतात , delete पण करत नाही!!  whatsapp नसतं तर वरच्या काही साहेबाना ते काय काम करतात हे दाखविण्यासाठी  भरपूर मेहनत घ्यावी लागली असती! आता मात्र साहेब दिवसभरात whatsapp वर वरून आलेलं सगळं गबाळ खाली ढकलत असतो त्यामुळे वरचा साहेब काहीच करत नाही असं म्हणायला वावं राहत नाही. अगदी  सुटीच्या दिवशी सुद्धा दोन चार message इंग्रजीत type करून तो घरी निवांत बसून दिवस काढू शकतो. 
बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांच्या ग्रुप मध्ये किमान वरच्या level ला तरी ग्रुपचा decorum पाळला जातो, पण जस जस वरून खाली याल तशी परिस्थिती बिकट होत जाते. Happy Birthday अमुक साहेब, congratulations तमुक साहेब, भावपूर्ण श्रद्धांजली , शुभेच्छा यांचा तर या ग्रुप वर महापुरच असतो! कधी कधी ग्रुप मधील साहेब कर्मचाऱ्यांवर चिडतो व लिहितो की हा official ग्रुप  असून इथे फक्त शासकीय कामासबंधी messages टाकावेत ... मग एक दोन दिवस  ग्रुपमध्ये शांतता!! पुन्हा तेच....Happy Birthday, शुभेच्छा, श्रद्धांजली!!! मग साहेब यांना पुन्हा असला सल्ला द्यायचा पण सोडून देतो... पण खालच्याना जर थोडाफार आवर घातला नाही तर मग पार " अमुक मुलगा हरवला असून त्याच्या आई वाडीलांपर्यंत हा message पोहचवा" किंवा " हा संदेश तात्काळ 21 लोकांपर्यंत पाठवा ,शुभ बातमी येईल अथवा वाटोळं होईल " किंवा " पहाटे 4:00 वाजता cosmic rays येणार...." असल्या पोस्ट टाकण्यापर्यंत यांची हिंमत वाढते!! ही नुसती कर्मचाऱ्यांच्या ग्रुप ची अवस्था नाही तर काही साहेब पण असले उद्योग करत असतात!!.
दोन वर्षांपूर्वी  तर whatsapp च फारच अवघड असायचं.  एकदा एखादा message/ video धनुष्यातुन सुटलेल्या बाणासारखा...सुटला की सुटला..माघारी घ्यायची सोयच नव्हती! जर चुकून एखादा 'योग्य' message 'योग्य' अथवा 'समविचारी' ग्रुपवर न जाता  'चुकीच्या' ग्रुप वर गेला रे गेला... मग काय खरं नव्हतं!! या असल्या भानगडीमुळे काही कर्मचारी, साहेब  पार suspend झाले!  ही भारतीय साहेबांची दयनीय अवस्था झुकेरबर्ग ला पाहवली नाही म्हणून त्याने ही post एक तासाच्या आत माघारी घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. पण तरीसुद्धा एखादा 'योग्य' message 'चुकीच्या'  ठिकाणी गेला तर एखादा कर्मचारी  पार panic  होऊन जातो आणि तो 'delete for everyone ' ऐवजी 'delete for me' करून करून मोकळा होतो! मग मात्र वाटोळं अटळ आहे!!!
बरं साहेब हा पण शेवटी एक सामाजिक प्राणी असल्यामुळे तो जिथं जॉईन होईल तिथले पायलीचे पन्नास ग्रुप, गावाकडंचे ग्रुप, पाहुण्या रावळ्यांचे ग्रुप, साहेबांचे  ग्रुप असला सगळा ग्रुपचा  बाजार झालेला असतो. सगळीकडे post चा पाऊस सुरूच.. एखादा सण  असेल  तर messages नी  येड लागायची वेळ!!(जरा शुभेच्छा देणार्यांनी पण स्वतःला आवरायला पाहिजे हो!).  एवढं कमी पडलं  म्हणून काय तर साहेबाला status बघायचा नाद, status ठेवायचा नाद, याचे dp बघ, तिचे dp बघ , facebook बघ...असले mobile मध्ये कुटाने चालूच! मुळातच भारतीय माणसाच्या रक्तात दांभिकता कुटुकुटू भरलेली, त्यात साहेब झाल्यामुळे दांभिकतेचा अजून एक extra layer त्यावर add होणार... मग मी किती सुखी हे दाखवण्याचा नादात सुखाने घालवायचा वेळ पण बरबाद करणार!! ही दांभिकता जोपासण्याची, तेवत ठेवण्याची किंबहुना वर्धन करण्याचं काम सुद्धा whatsapp ,facebook च्या माध्यमातून जोरदार पार पाडलं जात! मग ऑफिसच्या कामाच्या नावाखाली साहेब असले timepass करत बसतो!!! परिस्थिती एवढी हाताबाहेर जाते की साहेब साहेब बायकोपेक्षा whatsapp ला जास्त वेळ देतो!! हे थांबलं पाहिजे!!! जरा शहाणपणान 
वापर करायला शिकावं लागेल.....नाहीतर ही क्रांती एक दिवस सगळ्या साहेबांना मनोरुग्ण केल्याशिवाय राहणार नाही!!!!

© गोविंद खामकर

Sunday, April 11, 2021

साहेबाचा दौरा

साहेबाचा दौरा

साहेबाला शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे  दौरे ,तपासण्या, पाहणी वगैरे नियमानुसार कराव्या लागतात. हे नियम किमान दोन दशकापूर्वीचे असतात , तेंव्हाच प्रशासनाच  स्वरूप आणि आजच प्रशासनाच स्वरूप यात जमीन अस्मानाचा फरक आहे पण शासनाचे धोरण नक्की आहे, तुम्ही नियम मोडले तरी चालतील पण आम्ही नियम बदलणार नाही!!!(यामुळेच नियम मोडण्यासाठीच असतात ही धारणा पक्की होत जाते!!). याबाबतीतील   एक उदाहरण द्यायच  झालं तर तालुकास्तरावरील एखाद्या  अधिकाऱ्याने वर्षभरात  गावात जाऊन  60- 90 मुक्काम केले पाहिजे असा शासन निर्णय उपलब्ध आहे!! हे जर नियमप्रिय जनतेला समजलं तर एकतर आपल्यातल्या एका पण साहेबांचं लग्न होणार नाही आणि साहेब जर नियमप्रिय असेल तर एका पण साहेबांचं लग्न टिकणार नाही!!!.  आजच्या प्रशासनाच स्वरूप म्हणजे साहेब मूळ काम सोडून इतर आनुषंगिक कामानेच बेजार होतो.. सगळ्यात मोठी शोकांतिका तर ही आहे की साहेब दिवसभर प्रोटोकॉल, फोन, तक्रारी, मीटिंग, VC , उपोषण, आंदोलन आणि इतर बारा भानगडी दिवसभर करतो त्याचा कधीच आढावा होत नाही किंबहुना हे विषय कधी agenda वरच नसतात. हे काहीही असलं तरी साहेबाने एवढे एवढे दौरे केलेच पाहिजे, एवढ्या भेटी दिल्याच पाहिजे, एवढ्या तपासण्या केल्याचं पाहिजे हा अट्टाहास असतोच.
मग साहेब कधी कधी ज्यादिवशी ऑफिसला काहीच विशेष उद्योग नाही अथवा एखादी अशी भानगड आहे ज्यामुळे साहेबाला ऑफिसला जाऊ वाटत नाही त्यादिवशी साहेब दौऱ्यावर निघतो!
साहेब जेंव्हा नवीन पोस्टिंग ला जॉईन होतो तेंव्हा साहेबाच्या दौऱ्याच प्रमाण जरा जास्त असतंय मात्र जसाजसा साहेब त्या पोस्टिंग च्या ठिकाणी जुना होत जातो तसतस दौऱ्यांची संख्या कमी कमी होत जाते.  साहेब फिल्ड वरील कर्मचाऱ्यांच्या ऑफिसला सुरुवातीच्या काळात Surprise भेटी देण्याचा प्रयत्न करतो मात्र तिथले कर्मचारी शक्यतो जागेवर सापडत नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्याला surprise करण्याच्या नादात साहेब स्वतःच surprise होतो!! मग साहेब चिडचिड करणार, त्या कर्मचाऱ्याला दम देणे, नोटीस काढणे वगैरे वगैरे( अर्थात पुढे काहीच होत नाही!!). साहेब असल्या प्रकरणातून धडा घेऊन संबंधित कर्मचारी जागेवर आहे का हे पाहूनच दौऱ्यावर निघतो म्हणजे कोणीच surprise व्हायला नको!  साहेबाला सकाळी दौऱ्यावर जाणे थोडे सोयीचे असते कारण हे खालचे कर्मचारी जागेवर सापडण्याची शक्यता जरा जास्त असते. कारण दुपारनंतर ही खालची मंडळी काहीच कारण नसताना साहेबाच्या ऑफिसच्या अवतीभवती पिंगा घालत बसलेली असतात. साहेबाने त्यांना दुपारी कॉल केला ते कर्मचारी म्हणणार साहेब मी इथंच आहे ,आलो दोन मिनिटात केबिनला!! त्यामुळे दुपारी  दौऱ्याला जाण्याच  सुख साहेबाला जास्त मिळत नाही. जसा जसा साहेबाचा त्या पोस्टिंग च्या परिसरातील अभ्यास वाढत जातो तसा साहेबाला अंदाज यायला लागतो की नेमकी कोणती गावे तक्रारीची, कटकटीची, भानगडीची आहेत, कोणती गाव भाऊ दादाची आहेत, कोणती गावं संवेदनशील आहेत वगैरे वगैरे.. अशी गावे मग साहेबाच्या दौऱ्याच्या गावाच्या यादीतून हळूहळू  गायब होयला लागतात!! म्हणजे विषय पार इथपर्यंत जातो की साहेब तसल्या भानगडीच्या गावात गाडीसुद्धा थांबवत नाही!!साहेबाच्या त्या ठिकाणच्या पोस्टिंगच्या काळातील शेवटच्या टप्प्यात तर साधारणपणे तीस टक्केच गावे भेट देण्याच्या criteria मध्ये शिल्लक राहतात तर काही गावं पूर्ण पोस्टिंगच्या कालावधीत untouched राहतात! 
एकदाचा साहेबाच्या दौऱ्याला मुहूर्त लागतो. साहेब त्या गावात पोहचतो. साहेबाचा फिल्डवरील कर्मचारी साहेबाची 'आतुरतेने' वाट पाहत असतो(काही काही कर्मचारी आधी कल्पना देऊनसुद्धा साहेबाच्या नंतर 'साहेबासारखे' येतात!). साहेब त्या गावात पहिल्यांदाच जात असेल तर हारतूऱ्याच नाटक पण होत. मग तो कर्मचारी साहेबाला इकडची तिकडची माहिती सांगतो(साहजिकच माहिती मोघमच!). कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक आणि अंतिम हेतू एवढाच असतो की साहेबाने आपल्याला रेकॉर्ड दाखवायला लावू नये! त्यासाठी तो बरेच प्रयत्न करतो  पण साहेबाला पण थोडंफार रेकॉर्ड  पाहिल्याशिवाय दौरा केल्यासारखं वाटत नाही. मग साहेब त्याला विचारणार अमुक अमुक रेकॉर्ड दाखवा..मग कर्मचारी सांगणार ते record online करायला दिलंय.... मग साहेब त्याला दुसरं record दाखवायला सांगणार ...मग कर्मचारी सांगणार ते काल पूर्ण करण्यासाठी घरी नेलंय.... मग सांगणार बाकीच आहे पण आजच नेमकी(नेमकी आजच?) कपाटाची चावी घरी राहिली... थोडा वेळ ही लपाछपी संपल्यावर साहेब वैतागून म्हणतो तुझ्याकड आत्ता जे रेकॉर्ड आहे ते दाखव.. मग कर्मचारी काहीतरी दाखवतो जे गेल्या दोनचार महिन्याच  अपूर्णच असतंय!! मग साहेब म्हणणार तुमचं  कामावर लक्ष नाही वगैरे वगैरे (पण साहेब त्याच्यावर कारवाई करणार नाहीच!). सर्वात महत्वाची बाब म्हणजे साहेब त्या कर्मचाऱ्यांच्या मागे असलेल्या आनुषंगिक भानगडीचा आढावा न घेता मूळ कामाचा आढावा घेतो(पण साहेबाला त्याच्या साहेबाने असल्या मूळ कामाचा आढावा घेतलेला आवडत नाही!). मग साहेब visit book मध्ये काहीतरी लिहून (सगळीकडे साहेब हेच लिहितो!) कोंबडा हाणून टाकतो. मग कर्मचारी साहेबाला जेवण वगैरे करून जाण्याची विनंती करतो.जुने साहेब सांगतात  जुन्या काळात साहेब जेंव्हा दौऱ्याला जायचे तेंव्हा ते शंभर टक्के दौऱ्याला गेल्यावर तिकडून जेवण करूनच यायचे. त्यावेळी तिथला कर्मचारी आधी  दोन दिवसपासूनच तयारीला लागून  कोंबड्या शोधून ठेवणे, त्या बनवायची व्यवस्था करणे  आणि इतर आनुषंगिक बाबी करायचा. त्या काळातल्या साहेबांनी एवढा  कहर केला होता की कोंबड्याची प्रजाती जर नष्ट झाली तर यांच्यामुळेच होईल अशी परिस्थिती तयार झाली होती!!  आता परिस्थिती एवढी बदलली की त्या काळचे साहेब 'कोंबड्या' हानायचे आणि आजचे साहेब फक्त 'कोंबडे' हानतेत. 
महत्वाचं म्हणजे  त्यावेळचे साहेब मूळ काम करायचे कारण आनुषंगिक बाराभानगडी जास्त नव्हत्या त्यामुळे साहेबांच्या तब्येती पण बऱ्या होत्या. आजचे साहेब दौऱ्याला गेले की सोबत छान छान नटूला नटूला डब्बा घेऊन जाऊन चिमणीसारखं खातात. साहेबाचा आकार जसा वाढत जातो तसा डब्याचा आकार बारीक होत जातो हे समीकरण ठरलेलं!  मात्र काही साहेब दौऱ्याला  गेल्यावर तिकडे जेवण करतातही पण पूर्वीप्रमाणे त्या संबंधित गावात नाही. एक तर गावात आता तसलं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे लोक शिल्लक नाही राहिले म्हणा किंवा आपले कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यामुळे तेवढी आपुलकी राहिली नाही म्हणा पण हा बदल झालाच!  त्यामुळे ही नवीन जमात सगळी हॉटेलप्रेमी! आजकाल तर साहेबाला हॉटेल मध्ये त्याला लोक पाहतील म्हणून तिथं पण जेवू वाटत नाही( लोकांनी पाहिलं तर नेमका problem काय होतो हे अनाकलनीय आहे). 
अशा प्रकारे दौरा संपून साहेब परतीच्या प्रवासाला निघतो. या दौऱ्यादरम्यान ऑफिसवरून बरेच फोन आलेले असतात, वरिष्ठांनी काही माहिती urgent मागवलेली असते तर कधी भाऊ दादांची मानस त्यांच्या कामासाठी साहेबाच्या कोंबड्याच्या प्रतीक्षेत ऑफिसला थांबलेली असतात. त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी साहेबाला ऑफिसला जावंच लागत..
पुन्हा पुढच्या वेळी असच एखाद सोयीचं गाव...असाच दौरा.. same pattern.... क्रमशः

©गोविंद खामकर

( टीप: कृपया "साहेब सिरीज" मधील  लेखनप्रपंच कोणत्याही साहेबाने आपल्या गृहिणी पत्नीसोबत वाचू नये अथवा त्यांना share करू नये. कारण त्यामध्ये तुम्हाला साहेब म्हणून जी थोडीफार सहानुभूती मिळते ती सुदधा  गमावण्याचा प्रचंड धोका आहे.  असे काही घडल्यास ही संपूर्ण जबाबदारी वाचकाची असेल, लेखकाची नाही!!!)

Tuesday, April 6, 2021

कनिष्ठ आणि वरिष्ठ तथा खालचे आणि वरचे

*कनिष्ठ आणि वरिष्ठ तथा खालचे आणि वरचे*

 आपल्याला मराठीच्या पुस्तकात एक धडा होता.. आतले आणि बाहेरचे..रेल्वेच्या गर्दी असलेल्या डब्यात आतले प्रवासी शक्यतो बाहेरच्या  प्रवाशाला सहजासहजी बाहेरून आतमध्ये येऊ देत नाही त्यामुळे बाहेरचा प्रवासी वैतागलेला असतो, कसाबसा बाहेरचा प्रवासी आत गेला की तो 'आतला' होऊन जातो आणि त्याची मानसिकता आणि भूमिका आतल्यासारखी होते आणि  तो बाहेरच्यांची मानसिकता विसरून जातो!!
प्रशासनामध्येसुद्धा असंच असतंय... खालचे आणि वरचे.. प्रशासनामध्येसुद्धा जी पदांची उतरंड असते त्यामध्ये एक behaviour pattern  तयार झालेला दिसतो.  वास्तविक खालचे आणि वरचे ह्या फार relative टर्म आहेत... प्रत्येक साहेब कुणाच्या तरी वर आणि कुणाच्यातरी खाली असतो पण तरीसुद्धा बऱ्याच साहेबांना मी कोणाच्यातरी वर आहे याचा अभिमान असतोच. किंबहुना काही जण फक्त कोणीतरी खाली असणार म्हणूनच साहेब झालेले असतात!( काही दिवसांनी साहेबाला खालचे आणि वरचे दोन्ही नको नको होतात तो भाग वेगळा!!). खरं तर खालचे आणि वरचे हे दोन्ही एकाच पाण्यातील मासे तरी एकमेकांना 'पाण्यात' पाहतात.
   प्रशासनामध्ये जसे जसे खालून वर जाल तशी जबाबदारी कमी होते , जबाबदारीची जाणीव फक्त वाढत जाते! याउलट वरून खाली जाताना जबाबदारी वाढत जाते, जबादारी निश्चित होण्याची शक्यताही वाढत जाते  पण बेजबाबदारपणासुद्धा बऱ्यापैकी वाढत जातो.. खरं तर जबाबदारी ही घसरगुंडीसारखी असते.. ती या प्रशासकीय  उतरंडीवरून घरंगळत येऊन प्रशासनातील सगळ्यात खालच्या व्यक्तीवर निश्चित होते!! पण प्रशासनात अत्यंत जबाबदार आणि कार्यक्षम अधिकारी तोच असतो जो फार शिताफीने जबाबदारी ढकलतो! त्यामुळे फार तर तो अपयशाचा धनी होऊ शकतो पण कारवाईचा नाही!! जर एखादा critical matter असेल आणि त्यामध्ये राजकारणातील एखादा वजनदार व्यक्ती दुखावला जाणार असेल तर तो विषय विद्युत वेगाने वरून खाली या उतरंडीवरून  घरंगळत येतो. तसे निर्णय घ्यायचे अधिकार सर्वानाच  असतात पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? ( म्हणजे निर्णय तर घेणार नाही आणि साहेब व्हायची हौस जाणार नाही!!!). मग अशा वेळी सगळ्यात खालचा आत्तापर्यंत बेजबाबदार  समजला जाणारा घटक सगळ्या साहेबाना अचानक जबाबदार आणि निर्णायक वाटतो! शेवटी ती भानगड खालच्यांच्याच गळ्यात येते.  जेंव्हा अस एखादा जबाबदार अधिकारी अत्यंत जबाबदारीने  जबाबदारी एका बेजबाबदार समजल्या जाणाऱ्या घटकाकाकडे जबाबदारीने ढकलतो, हे चित्र पाहण्यासारख असतंय. कधी कधी तर अस वाटत हे ग्रामपंचायत चे कर्मचारी , तलाठ्यांच्या हाताखालचे (candidate), कोतवाल , इतर गावातील  निमशासकीय कर्मचारी हेच सरकार चालवतात, बाकीचे फक्त कोंबडे हानीत फिरतात! 
      वरच्या लोकांना कोणी नोटीस वगैरे जास्त काढत नाही. त्यांना समज देणे, DO letter असलं काही तरी sophisticated  तर खालच्याना direct  नोटिसा, निलंबन, increment थांबविणे  असलं काही तरी धारदार असतंय.. पण वरच्या साहेबांवर कारवाई होत नाही आणि खालचे कर्मचारी कारवाईला  घाबरत नाही!! वरच्यांना वाटतं खालचे कामाबद्दल अजिबात गंभीर नाहीत  आणि खालच्याना वाटत वरचे फक्त गंभीर आहेत पण काम काहीच करत नाही.. खालच्यांना वाटतं वरचे फक्त ऑफिसात बसून पत्र काढतेत, whatsapp वर mesaage टाकतेत बाकी काहीच काम करत नाही(बऱ्यापैकी तस असतंय सुद्धा!!). वरच्यांना वाटत आपल्याला खालचे म्हणावा तेवढा respect देत नाहीत आणि खालच्यांना  वाटत आम्ही तरी कोणाकोणाला respect द्यावा त्यामुळे ते कोणालाच मोजत नाहीत( पण तसं दाखवत नाहीत!!). वरच्या साहेबाला खालच्या साहेबांचा आढावा घेण सोपं जातं कारण  quantity कमी असते आणि  quality पन जरा बरी असते( तशी quality प्रशासनात  येताना सगळ्या साहेबांची चांगली असते पण एकदा का 'साहेब' झाले, मग अनुभवाने quality घसरत जाते). पण खालच्या साहेबाला त्याच्या खालच्या field वरील कर्मचाऱ्यांचा  आढावा घेण म्हणजे challenge च असतंय.. कारण quantity भरपूर आणि quality पण सुमार!! तस वरच्या लोकांचा आढावा तसा sophisticated होतो पण जस जसे खाली जाल तसे तसे आढाव्याचे शब्द अजून धारदार बनत चालतात(या धारदार शब्दांमुळे काही साहेब अडचणीत पण येतात!).
खालच्यांना वाटत आम्ही ground लेवल ला काम करतो, आम्हाला कोणी समजून घेत नाही, practically काम करताना खूप अडचणी असतात वगैरे वगैरे पण वरच्या साहेबाने पण खालच्याना जरा जास्त समजून घेतलं की ते कामच करत नाही आणि वरच्याला अडचणीत आणतात!! कधीकधी खालचे कर्मचारी वरच्या साहेबाला मार्गदर्शन मागतात पण ते वरच्या साहेबाला अजिबात आवडत नाही! मग वरचा साहेब खालच्यांना नियमानुसार कार्यवाही करण्याचा सल्ला देतो. आता खालच्याना एवढे नियम एवढे समजत असते तर ते अधिकारी नसते का झाले?(साहेब नाही बरं का, अधिकारी म्हंटलो!!). पण असो...वरच्या साहेबाला खरं तर कामापेक्षा टेंशन घेण्याचा पगार मिळतो. खालचा कर्मचारी मात्र टेंशन पण घेत नाही आणि कामही करत नाही असा साहेबांचा समज  असतो. खालचे लोक टेन्शनच घेत नाही हे साहेबांचं खरं टेंशन असतंय!!   खालच्या सगळ्यांना टेंशन मध्ये ठेऊन स्वतः निवांत राहणारा साहेब खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणला पाहिजे! आणि काहीच टेंशन न घेता काहीच काम न करणारा कर्मचारी सुद्धा यशस्वीच म्हणला पाहिजे( पण वरचा साहेब आणि खालचा कर्मचारी दोघे यशस्वी झाले तर प्रशासनाच वाटोळं अटळ आहे!!). तसा रजा हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा.. पण वरच्या साहेबाला कोण रजा देत नाही आणि खालचे कर्मचारी तर रजा मागण्याच्या भानगडीत पण पडत नाही, direct गायब!!( त्यामुळे दोघांच्या पण खात्यावर 300 रजा कायम शिल्लक!). 
खालच्या कर्मचार्यांच्या संघटना चांगल्याच जोरदार असतात.. यांची शासनस्तरावर चांगलीच चलती असते. यांचे आंदोलन पण खतरनाक!!  हे एकदा पेटले तर मग '*** आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा'  , '.....घेतल्याशिवाय राहणार नाही..'  असली तुफान घोषणाबाजी करतात. याउलट साहेबांची संघटना म्हणजे एकदम मूळमुळीत!! एक तर यांनी आंदोलन पुकारलेले निम्म्या साहेबांना आंदोलन संपल्यावर समजतंय! त्यात आंदोलन म्हणजे काळ्या, लाल  फिती असला timepass. यांच्या आंदोलनाकडे शासनाने नुसतं डोकून पाहिलं तर याना वाटतं शासन आपल्या मागण्या मान्य करणार आणि आंदोलन स्थगित होत!   पण संघटनेच्या नावाखाली मोकार फिरणारे खालच्यामध्ये आणि वरच्यामध्ये दोन्हीकडे आढळतात. 
एकंदरीत तात्पर्य अस की वरच्यांना वाटत खालचे काहीच करत नाही, खालच्यांना वाटत वरचे काहीच करत नाहीत, दोघांना वाटत सगळं आम्हीच करतो आणि जनतेला वाटत कोणीच काही करत नाही आणि सरकार म्हणत आमच्या काळात जेवढ काम झालं तेवढं कोणत्याच काळात झालं नाही!!!!!   ...क्रमशः

© गोविंद खामकर

(सदरील लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने व सर्व अधिकारी ,कर्मचारी, संघटना यांच्याशी संपूर्ण आदर बाळगून लिहिला आहे तसेच हे लिखाण अत्यंत मर्यादित व अपवादात्मक अनुभवावर आधारित आहे)

Thursday, April 1, 2021

साहेबाचं ट्रेनिंग

साहेबाच ट्रेनिंग:
साहेब परीक्षा पास झाल्यापासून हार, तुरे, गुलाल, धुराळा आणि   वरून लोकांना ज्ञानाचे डोस पाजत हिंडत असतो(एकच ध्यास, जनतेचा विकास वगैरे वगैरे). एकदाच जॉइनिंग येत. साहेब प्रशिक्षण संस्थेत रुजू होतो. साहेबाला त्याच्यासारखे समविचारी बरेच साहेब भेटतात. अद्याप बिनलग्नाचे उमेदवार लग्न या विषयावर ट्रेनिंगचा 25-30 टक्के वेळ बरबाद करतात. खरं तर एखाद्याच व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया जेवढ्या लहान वयात सुरू होईल तेवढं चांगलं उदा. NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी वय जास्तीत जास्त 17 वर्ष पाहिजे.. आता आपले साहेब सगळे 25  ते 38 च्या रेंज मधले! आता 38 वर्षाच्या साहेबांचं 'बाल'मन बद्दलविण्याचं धाडस तरी प्रशिक्षण संस्थेने का करावं? बरं यांना ट्रेनिंग नाय द्यायचं तर मग प्रशिक्षण संस्थांनी तरी काय करायचं.. त्यापेक्षा असल्या  वैज्ञानिक आणि तात्विक भानगडीत न पडता 'अधिकारी' घडविण्याचा कार्यक्रम पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे सुरूच ठेवायचा. मग साहेब प्रशिक्षण संस्थेत रुजू झाल्यापासून एकदम शेड्युल मध्ये कार्यक्रम सुरू होतो. अभ्यासिकेत बसून बसून out of shape झालेल्या साहेबांचा लूक जरा 'अधिकाऱ्यासारखा ' दिसावा म्हणून सकाळी सकाळी यांना ग्राउंड वर बोलावलं जात(खरं तर हे फिल्ड वर जाऊन एकदा  साहेब झाल्यावर यांचा shape पुन्हा बिघडणारच आहे तर हा अट्टाहास कशासाठी?). काहीही झालं तरी सगळे ग्राउंडवर  वेळेत येऊच शकत नाही( साहेबाचे गुण यांच्यात उतरण्यास इथून सुरुवात होते). तिथं काहीतरी टीवल्या बावल्या करून हे नाश्ता वगैरे करायला जाणार. तसं प्रशिक्षण संस्थेत नाश्ता पाण्याची सोय बरी असते(सुरुवातीला बर वाटत पण नंतर मात्र याच  नाश्त्याला सगळे वैतागून जातात!). हे सगळं घडत असताना साहेब लोकांना फिल्ड वर जायची प्रचंड घाई झालेली असते, कधी इथलं ट्रेनिंग संपवतो आणि एकदाच साहेबासारखं खुर्चीवर जाऊन बसतो यासाठी  साहेबांचं मन अधीर झालेलं असतंय, पण इथलं ट्रेनिंग उरकण्याशिवाय पर्याय नसतो. मग साहेबाच classroom ट्रेनिंग चालू होतंय. त्यामध्ये साहेबाच्या कामकाजासंबंधीचे नियम, कायदे याच्या अभ्यासाचा समावेश असतो(पण साहेबाचा नियमांपेक्षा common sense वर जास्त भर असतो!).तसेच साहेबाला तंत्रस्नेही करण्याचा सुदधा आटोकाट प्रयत्न केला जातो. थोडं फार व्यक्तिमत्व विकास, motivation असलं पण शिकवलं जातं. या सगळ्यांमध्ये एकच सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा असतो की या नवनियुक्त अधिकाऱ्यांना शिकवायला पण साहेबच असतात!!!( यात हसण्यासारखं काहीच नाही, साहेब हे काम करू शकत नाही का??). म्हणजे पार motivational speech, व्यक्तिमत्व विकास असले lecture पण साहेबच देणार!!  
खरं तर हे सगळं शिकविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी व ज्यांना अध्यापनाच्या क्षेत्रात विशेष रस आहे त्यांना संधी दिली पाहिजे(माझं वैयक्तिक मत!)  पण नाहीच, शासनाचा साहेबाच्या capacity वर प्रचंड विश्वास, त्यामुळे दुसर्यांना संधी  द्यायचा विषयच नाही! ( उद्या जर एखादी नुसतं डोकं फुटण्याची साथ आली तर शासन मेंदूच operation सुद्धा  साहेबाला करायला लावू शकत, त्यात काय एवढं!). 
मग एकामागून एक PPT चा मारा,  ट्रेनी अधिकाऱ्यांच्या  सगळं डोक्याच्या वरून चाललेलं असतंय( ह्या 15-20 PPT च्या जीवावर तिथं शिकवणाऱ्या साहेबाची एक टर्म निवांत निघते पण त्यावर इथं कशाला चर्चा!). कोणतं पण lecture संपलं की एखादा  उत्साही ट्रेनी अधिकारी त्या शिकवणाऱ्या साहेबाला फील्ड वरचे अनुभव विचारणार, आपण काम करताना काय तपासलं पाहिजे, निर्णय घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे वगैरे वगैरे. पण शिकवणारा साहेब पण शातीर!(शेवटी तो पण साहेबच!!). तो सांगणार तुम्ही त्या खुर्चीवर बसले की सगळं आपोआप येतंय(आता शिकवणारा साहेब अस direct थोडंच  सांगणार  आहे का की खुर्चीवर बसून नुसते कोंबडेच हानायचे असतात!!!!), पण असो ..विषयांची तोंडओळख तेवढी होते!! एखादा दर्दी ट्रेनी अधिकारी खोदूखोदू विचारणार   ' आर्थिक' बाबींमध्ये सही करताना अथवा निर्णय घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे.(या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी एव्हाना झोपलेले साहेब पण खडबडून जागे झालेले असतात!!). एखादा शिकवणारा साहेब सांगतो अमुक अमुक काळजी घेतली पाहिजे पण एखादा शिकवणारा  साहेब नुसती smile देतो! आणि वरून सांगतो तिथं गेल्यावर सगळं समजत!! शिकवणाऱ्या साहेबाचे expression पाहून ट्रेनिंग हॉल मध्ये चांगलीच खसखस पिकते( हे सगळे 'बाल'मनाचे अधिकारी 'आर्थिक' विषयावर एवढे का हसले असतील बरं!!). अशा प्रकारे अधिकाऱ्यांची टोळी घडत चालते. व्यक्तिमत्त्व विकास वाले तज्ञ येऊन वेगवेगळे खेळ खेळायला लावतात. सगळे ट्रेनी अधिकारी या खेळांमध्ये खुल्या दिलाने सामील होतात. मग ट्रेनिंग देणारा त्या खेळातून निघालेलं आदर्शवादी moral सांगतो, ट्रेनी साहेब पण साक्षात्कार झाल्यासारखा expression देतात( काही दिवसानंतर ट्रेनी अधिकाऱ्यांना  फक्त खेळ आठवतो, moral विसरलेल असतंय, नंतर खेळ पण विसरून जातो!). साहेबाची संगणक कौशल्ये वाढविण्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत प्रशिक्षण संस्था घेते पण स हे ट्रेनी अधिकारी त्याला विशेष दाद देत नाही( जेंव्हा हे  साहेब होऊन फिल्ड वर जातात तेंव्हा तर सगळंच विसरलेले असतात! साधी VC join करायची असली आणि operator वेळेवर सापडला नाही तर साहेबाचा जीव पार खालवर होतो ! जे साहेब मूळचे engineer आहेत त्यांची पण हीच अवस्था! 99% साहेब त्यांची digital signature कधीच स्वतः वापरत नाहीत!!!).
दिवसामागून दिवस जात असतात , हे ट्रेनी  अधिकारी खुर्चीवर बसण्याची आतुरतेने वाट(वाट लावण्यासाठी.. नाही नाही!!) पाहत असतात. 
शेवटी  ट्रेनी अधिकारी काय शिकला हे ज्या साहेबाने शिकवलंय त्याला पण कळत नाही आणि जो शिकलाय त्याला तर काहीच कळत नाही. तरीसुद्धा शेवटच्या दिवशी प्रशिक्षण संस्था त्यांनी एकदम refined product तयार केल्याचा दावा करत असते. म्हणजे पार त्यांनी तयार केलेल्या साहेबाला " You are the best " म्हणण्यापर्यंत यांची मजल जाते!!! पण वस्तुस्थिती अशी असते की नवनियुक्त उमेदवारांना  चांगले 'अधिकारी' घडविण्याचा विडा उचललेली प्रशिक्षण संस्था शेवटी  त्यांना 'साहेब' करून सोडते( आता साहेब म्हणल्यावर काय... जाऊद्या आता!!)...
मग एकदाचा साहेब इथून सुटतो आणि खुर्चीवर जाऊन बसतो. दोन चार  वर्षात साहेबाला खरा गेम लक्षात यायला लागतो.. जनतेचे प्रश्न, जनकल्याण, जनसंपर्क, गाडी, शिपाई(तो शिपाई  नाही, शिपाईसाहेब असतो हे पण साहेबाच्या लक्षात येत) ही सगळी हौस बऱ्यापैकी झालेली असते.  मग साहेबाला समजत आपल्याला प्रशिक्षण संस्थेत शिकवणारे साहेब प्रशिक्षण संस्थेत एवढे का आनंदी दिसायचे!! मग साहेबाला कधी कधी दोन चार  दिवस थोडं relax होण्यासाठी एखादं ट्रेनिंगच नाटक करून प्रशिक्षण संस्थेत जावं वाटत पण तशी फारशी संधी सुद्धा मिळत नाही. मग साहेब फक्त त्या जुन्या आठवणींना उजाळा देत  त्याला गुणगुणन्याचा मोह आवरत नाही.." जाने कहा गये ओ दीन....!!!!!"

©गोविंद खामकर

(संबंधित लेखनप्रपंच हा सर्व प्रशिक्षण संस्था आणि त्यातील सर्व अध्यापक यांचा पूर्ण आदर राखुन निवळ विनोदबुद्धीने व्यक्त केला असून हा अत्यंत मर्यादित व अपवादात्मक अनुभवावर आधारित आहे. यामधून कोणत्याही साहेबाला अथवा अधिकाऱ्याला discourage तर नाहीच पण  encourage करण्याचा सुद्धा अजिबात हेतू नाही!!)

Tuesday, March 30, 2021

साहेबाची बदली

साहेब हा एक भटका प्रवर्ग आहे( Gypsy). साहेबाची इच्छा असो अथवा नसो,ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासन  बदली करणारच! एकीकडे शासन स्थलांतर थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना साहेब कम्युनिटीला असं  जाणीवपूर्वक शासन निर्णय काढू काढू भटकं  करणं कितपत योग्य आहे?( साहेबांचं काम नाही पण किमान त्याच ठिकाण बदलून तरी साहेबाला फ्रेश करावं असा शासनाचा इरादा असावा!)सोयीच्या ठिकाणी बदली झाली नाही तर साहेबाला बरीच भटकंती करावी लागते. भटकंतीचे  दोन  तीन प्रकार आहेत. काही साहेब सहकुटुंब भटकंती करत फिरतात मग बदली कुठं का होईना. काही साहेब कुटुंब एका ठिकाणी ठेऊन स्वतः भटकत असतात, हे साहेब मुख्यालयातून शुक्रवारी दुपारी गायब होऊन सोमवारी दुपारपर्यंत मुख्यालयी प्रकट होतात. काही गृहप्रेमी साहेब शंभर दीडशे किलोमीटर दररोज  भटकून भटकून   घरी येतात, असले साहेब सकाळी 11:00 वाजता ऑफिस ला पोहचून सायंकाळी 4:00 वाजता ऑफिसमधून गायब होतात, या साहेबांची अर्धी जिंदगी प्रवासात बरबाद होते! (शिवाय प्रवासाने मणक्याच्या त्रास वगैरे हे सर्व additional benefits)...पण असो...

      साहेबाची टर्म पूर्ण होत आलेली असते बदलीचे वेध लागलेले असतात. काही साहेबांच्या अवगुणांमुळे किंवा  अतिचांगुलपणामुळे  त्यांची 'अवकाळी'  बदली सुद्धा होते. आता  बदलीचे दिवस तथा काहींच्या कंगालीचे दिवस तथा काहींचे सुगीचे दिवस जवळ येत असतात. साहेबांचं मन काही ऑफिसात रमत नाही(अगदी नेहमीप्रमाणेच!). जवळपास गेल्या तीन वर्षांपासून साहेबाचे त्याच्या कर्मचाऱ्यासोबतचे संबंध चांगलेच दृढ झालेले असतात.    कर्मचाऱ्यांचे लग्न, बारसे, वाढदिवस, जागरण गोंधळ , कंदूऱ्या ला जाऊन जाऊन साहेबाचे असे संबंध तयार झालेले असतात की  कर्मचाऱ्यांची चूक झाली असेल तरीसुद्धा साहेब कारवाई पण करू शकत नाही! साहेबांचा resistance पार संपलेला असतो! प्रकरण किती पण किचकट असलं तरी  नाय व्हय करीत शेवटी कोंबडा मारावाच लागतो.काही काही साहेब शेवटी शेवटी ओव्हर संपत आल्यामुळे स्कोर वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. त्यातली त्यात  शेवटचे सहा महिने तर साहेब सगळ्यांना काही पण  आश्वासन देत सुटतो, शंभर टक्के करून देतो ,नक्की करतो, थोडे दिवस थांबा, मी आहे ना चिंता करू नका वगैरे वगैरे. साहेबाच्या डोक्यात एवढंच की बदली होईपर्यंत चालढकल करायची आणि मग एकदाच सुटायचं!(बदली नाही झाली तर मात्र काय खरं नाही).  थोडक्यात बदली ही सुद्धा साहेबाची गरजच असते. काहींना मात्र आत्ता आहे ते ठिकाण चांगलंच 'मानवलेल' असतंय त्यामुळे ते टर्म संपली तरी तिथंच पाय रोवून बसण्यासाठी प्रयत्न करतात. काही साहेब जास्त भानगडीत न पडता कुठं तरी side posting ला बसून पेन्शन मिळण्याची वाट पाहत बसत असतात( फिल्ड वर काम केल्यावर पेन्शन मिळणं अवघड असतंय हे त्याना कुणीतरी सांगितलं असावं!! DCPS वाले पेन्शन ची  पण वाट पाहू शकत नाही!).
बरं बदली काय अशीतशी होत नसते. मुळात ते सुद्धा एक स्किल आहे. काही काही साहेब ज्यांच्यात हे स्किल नसतंय ते आयुष्यभर महाराष्ट्राच्या कडाकाठानेच भटकंती करत  राहतात. म्हणजे एकदा सिंधुदुर्ग की लगेच थेट गडचिरोली की लगेच नंदुरबार पुन्हा यवतमाळ अशा पद्धतीने.. जिकडे फेकील तिकडे!!!  काही काही साहेब मात्र दरवेळेस 'सोयीच्या आणि सायीच्या ' ठिकाणीच, एकदम reservation करून ठेवल्यासारखं!  काही साहेब नुसते वरच्या कार्यालयात(म्हणजे कुठे समजून घ्या) हेलपाटे मारतेत, तिथं  जातेत पण काही मेळच लागत नाही, मेळ लागला तरी 'समीकरण' न जुळल्यामुळे   संध्याकाळी ट्रेन पकडून गप   माघारी येतात. काही साहेब बदलीविषयी कोणाशीच काही बोलत नाही(एकदम आतल्या गाठीचे), कुठून सेटिंग लावली याची पण चर्चा करत नाहीत, एकदम सोंबडीत कार्यक्रम करून टाकतेत!  काही साहेब तर कहरच!! ते जिथं बदली पाहिजे तिथे प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन स्थळनिरीक्षण करून येतात, सगळं 'व्यवस्थित' आहे ना याची सखोल चौकशी करून मग आकडा लावतात.(जनरली साहेब एवढा अभ्यास कधीच करत नाही!).काही साहेब मोठे वजनदार लोकं यांच्याशी 'बळच' जोडलेल्या संबंधाच्या आधारे याच पत्र घे,त्याच पत्र घे..आजारी नसलेल्याना बळच 'गंभीर' आजारी पाडून त्याच सर्टिफिकेट जोडून.... शर्तीचे प्रयत्न..पण तेवढ्यावर काय काम होत नाही!!
सगळे 'योग' जुळून आल्यावर एकदाची बदली होते! काही महाराष्ट्राच्या कडाकाठाने, काही सायीच्या  आणि सोयीच्या पोस्टिंग ला,  काही घराच्या जवळ वगैरे वगैरे. काहींच सगळं व्यवस्थित करून पण ऑर्डर मध्ये नावच नसतंय, यांची अवस्था बघण्यासारखी  असते!! 
आता साहेबांच मन एकदम कोऱ्या पाटीसारख झालेल असतंय, किमान जिथून चाललाय तिथलं तरी तो टेन्शन घेत नाही! साहेब जर अवघड क्षेत्रात काम करत असेल तर त्याला कार्यमुक्त होण्याचं challenge पार करावं लागतं,  त्यासाठी सुद्धा बराच आटापिटा करावा लागतो(काही unskilled  साहेब अवघड क्षेत्रात अडकून सेवानिवृत्त सुद्धा तिथंच होतात!). एकदाचा साहेब तिथून कार्यमुक्त होतो!
गेले तीन वर्षे साहेब जरी कुटुंबापासून दूर असला तरी तो सगळ्या कर्मचाऱ्यांना आपलं कुटुंब   समजून काम करत असतो. साहेबाला बऱ्याचदा त्याच्या व्यस्त कामकाजामुळे नातेवाईकाच्या लग्नाला, कार्यक्रमाला जायला जमत नाही मात्र साहेब हा कर्तव्यस्थानी सगळ्या कर्मचार्यांच्या सुखदुःखात सामील होतो. साहेबाच्या अडचणीच्या काळात सुद्धा हीच मंडळी घरातल्या मानसासारखी उभी असतात! साहेब आयुष्यभर हीच माणसं जोडत चालतो, हीच खरी साहेबाची कमाई !!(बाकी कमावलेले पुढच्या पिढीला ऐश करायला!!) कित्येक साहेबाच्या पोरांच्या लग्नात नातेवाईक कमी आणि हीच 'कुटुंबातील' मानस जास्त दिसतात(ही शंभर टक्के वस्तुस्थिती आहे). हे सर्व सोडून जाताना कोणत्याही साहेबाचे पाय जड होतात, कार्यालयातुन जरी साहेब कार्यमुक्त झाला तरी कर्मचार्यांच्या ऋणातून तो कधीच कार्यमुक्त होऊ शकत नाही!! साहेबांवर जीवापाड प्रेम आणि आदर असलेल्याना तर साहेबाची बदली पचविणे चांगलंच जड जात...
आता या 'भटक्याला' आपला पाल उचलण्याची वेळ आलेली असते. नवीन पोस्टिंग च्या ठिकाणी पाल कुठं मारायचा ते पुढचे 'कुटुंबीय' ठरविण्याच्या कामाला कधीच लागलेले असतात.आता साहेब पुन्हा एकदा नवीन ठिकाणी 'नवीन साहेब' होण्याच्या तयारीत रवाना होतो...मग पुन्हा बदली... पुन्हा तेच.... क्रमशः
© गोविंद  खामकर

Monday, March 22, 2021

फील्ड कर्मचारी आढावा बैठक

    साहेबाची मीटिंग  वरचा साहेब कशी घेतो ते  आपण पाहिलच आहे.. पण साहेब जेंव्हा त्याच्या फील्डवरील कर्मचाऱ्यांची मीटिंग  घेतोती  फारच रंगतदार असते....!!

एक तर साहेबाने मीटिंग लावलीरे लावली की त्याच दिवशी नेमकं साहेबाला VC असणारवरचा साहेब मीटिंग लावणारप्रोटोकॉल असलं काहीतरी लफडं मागे  लागणार! अस दोन तीन वेळा मीटिंग  रद्द होऊन एकदाचा मुहूर्त लागतो...

मीटिंग ची वेळ सकाळी 10:00 वाजता...पण 11:00 च्या आत कुणिच येणार नाही!!. साहेब पण नाही!( तसं तर साहेबाला वेळेवर मीटिंग सुरू करण्याची तीव्र इच्छा असते पण वेळेवर कुणी येतच नाही तर साहेब एकटा येऊन काय करणार?).  मग कुठं तरी खालचे कर्मचारी यायला सुरुवात होणार पण ते सुद्धा मीटिंग  हॉल  ची ऍलर्जी असल्यासारखे बाहेरच इतर अशासकीय विषयावर गप्पा मारत निवांत बसणार.  थोडक्यात जोपर्यंत साहेब मीटिंग हॉल ला येणार नाही तोपर्यंत हे अजिबात मीटिंग ला बसणार नाही( नेमकं साहेब हे आहेत की मी असं साहेबाला वाटून जात!). बरं हे खालचे कर्मचारी मीटिंगला  काय माहिती घेऊन येतात हा संशोधनाचा विषय होऊ  शकतो! काही काही प्रतिभावान  कर्मचारी तर हातात काहीच आणत नाहीत!

 मग मीटिंगला सुरुवात होते.  साधारणपणे पन्नास ते साठ टक्के उपस्थिती पाहिल्यावर साहेब चिडचिड करणार.. मग खालचे कर्मचारी त्यांच्या कर्मचारी सवंगड्यांना फोन करून  बोलावण्याचा प्रयत्न करणार..नेमकं मीटिंगच्या दिवशीच दहा वीस टक्के लोक त्यामध्ये कोण आजारी पडणार( अगदी planning करून)कोण लग्नालाकोण साखरपुड्यालाकोण  अत्यंत जवळच्या पाहुण्याच्या मयतीला तर कोण दहाव्यालाकोण मिटींगला येताना गाडीवरून पडणार  वगैरे वगैरे कारणं शोधून गायब. काही तर नेहमीप्रमाणे काहीच न सांगता गायब! नेहमी गायब असणाऱ्याना साहेबाने  स्वतःच्या समाधानासाठी  2-3 नोटीस दिल्यावर ते एकदा मीटिंग ला येतातसाहेब खुश होतो पण पुढच्या मीटिंग ला ते पुन्हा गायब! .. एक तर साहेबाला त्याच्या साहेबाने मीटिंग मध्ये झापझाप झापल्यामुळे साहेबाला पण त्याच्या खालच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग एकदम कडक घ्यायची इच्छा असते पण  पाच पंचवीस टक्के  लोक  गैरहजर  असल्यामुळे  साहेबाचा प्लॅन fail जातो. मागच्या मीटिंग ला कोण कोण गैरहजर होत ते साहेब रागाने विचारतो पण ते कर्मचारी या मीटिंगला सुद्धा गैरहजर असतात त्यामुळे साहेब हा विषय इथंच सोडून देतो!(साहेबाला वाटतं विषय वाढवला तर बाकीच्यांना लक्षात येईल की साहेब नुसता दम देतो ,कारवाई काहीच करत नाही  व त्यांचा पण confidence वाढून जे मीटिंग ला येतात ते  पण मीटिंग ला यायचं बंद करतील!).   

तरीसुद्धा साहेब एकदम कडक सुरुवात करतो! मीटिंग ला येताना साहेब अहवाल घेऊन यायला सांगतो पण जोपर्यंत साहेब विचारत विचारत नाही तोपर्यंत त्याच्या पिशवीतून ते काय बाहेर निघत नाही! मग साहेबाने सांगितल्यावर त्यातले निम्मे अर्धे अहवाल देतात...  पण साहेबाला मात्र सगळ्या लोकांचा म्हणजे जे मीटिंग ला आले नाही त्यांचा अथवा जे मीटिंगला येऊन पण अहवाल देत नाहीत त्या सगळ्यांचा अहवाल मात्र  वरच्या साहेबाला द्यावाच लागतो(खालचे कर्मचारी गैरहजर राहतातवेळेवर येत नाही ही कारणे  खालचा साहेब वरच्या साहेबाला तर सांगूच शकत नाही!!).. मग साहेबाला असाच काहीतरी आकड्याचा झोल करून वरच्या साहेबाला द्यावा लागतो(साहेबाची अस करण्याची इच्छा नसते पण साहेबांचा नाईलाज असतो). साहेबाला 50 ते 60 विषयाचा आढावा घ्यायचा असतो पण एवढ्या लोकांचा पहिल्या विषयाचा आढावा घ्यायलाच पहिला तास दीड तास जातो. काही तंत्रस्नेही साहेब थोडस चांगलं planning करून projector वर सुद्धा मीटिंग घेण्याचा प्रयत्न करतो पण हे नाटक थोड्याच दिवसात बंद पडत. पहिल्या विषयाचा आढावा तसा कडक होतो. हॉल मधील वातावरण थोडंफार तापलेल असतंय .त्यात पुन्हा निम्म्या लोकांची उत्तर दोन दिवसात करून घेतो, online केलंय पण दिसत नाही वगैरे वगैरे( वरच्या साहेबाला साहेब असलीच उत्तर देतो ही सवय साहेबाला इथूनच लागते).मग साहेब त्यांना ओरडतो हे अस चालणार नाहीमी कारवाई करील वगैरे वगैरे.

या पहिल्या एक दीड तासात साहेबाला अतिशय गंभीर मुद्रा धारण करावी लागते कारण साहेब नुसता थोडं हसला तरी मीटिंग मधला दम निघून जातो.  एवढं सगळं सुरू असताना उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची  हळूहळू आवक सुरू असतेच(संघटनेला वाहून घेतलेले बहुधा उशिरा येतात). साहेब त्यातल्या काहींवर चिडतो पण मीटिंग च्या मूळ विषयाची link तुटते त्यामुळे साहेब उशिरा येणाऱ्याला हटकायच पण सोडून देतो! तसं तर सगळेच उशिरा येतात पण नेमकं किती वाजताच्या नंतर आलं म्हणजे उशिरा समजायचं हा यक्षप्रश्न कधीच सुटत नाही...  मग दुसरा विषय ..त्याच्यात पण हीच अवस्था ...मीटिंग  कितीही विषयावर असली तरी खालच्या कर्मचाऱ्याकडे  तेच कागदतीच डायरी( काहींना एक डायरी पाच पाच वर्ष संपत नाही!) . काही विचारलं की  तेवढेच दोन पान उचकायचे काही तरी फेकायचंसगळा  वेळ मारून न्यायचा कार्यक्रम !! (अगदी साहेबासारखंच) . साहेब त्यानी सांगितलेलं कुठं तरी लिहून घेतो जे त्याला पुन्हा कधीच सापडत नाहीपण सगळं नोंद घेतल्यासारखं दाखवावं लागतं.  या खालच्या कर्मचार्यांचा basic problem हा असतो की ते नाही कशालाच म्हणत नाहीत आणि करत पण  काहीच नाहीत !  अशा पद्धतीने  पहिल्या एक दोन तासात 2-3 विषय संपत नाही तोच जेवणाची वेळ होते.  मग जेवणाची सुट्टी!! अर्धा तासाची सुट्टी म्हणजे सगळ्यांनी एक तास गृहीत धरलेला असतोच! त्यात पण साहेबावर विश्वास असलेले तथा साहेबाची पोथी ओळ्खलेले    दुपारीच गायब होतात. 

 मग पुन्हा बैठक सुरू होतेसाहेब meeting ला आल्यानंतर मग लोक मीटिंग ला बसून घ्यायला सुरुवात करतात. काही VIP कर्मचारी तर थेट दुपारच्या सत्रातच meeting ला येतात!!  मग अजून फार तर 2-3 विषयावर आढावा होतो(आढावा काही पण असोउत्तर ठरलेलीच..दोन दिवसात करतो वगैरे वगैरे..).. आता  मीटिंगला बऱ्यापैकी पठारावस्था प्राप्त झालेली असते..सगळ्या विषयात अतिशय सुमार दर्जाचा परफॉर्मन्स असल्यामुळे उर्वरित विषयातील कोणता विषय आधी घ्यावा ते साहेबाला समजत नाही. तरी पण  आळीपाळीने झपाझापिचा कार्यक्रम सुरूच असतो. त्यातली त्यात प्रोटोकॉलकमिटी असल्या कार्यक्रमात 'सहकार्यन करणार्यांना साहेब जरा जास्तच झापतो(दुसरं  करणार तरी काय?...)

बरेच विषय आढावा घ्यायचे बाकी असतातओरडू ओरडू साहेबाचा घसा दुखायला लागतो... पण विषय संपतच नाही... मग शेवटी बैठक आटोपती घ्यावी लागते..बहुतांशी विषयाला हात पण लागलेला नसतो...एवढा वेळ बैठक घेऊन साहेबाला मात्र समाधान वाटत नाही पण इलाज नसतो. उर्वरित विषय साहेब अक्षरशः फक्त वाचून दाखवतोआता ह्या राहिलेल्या विषयात खालचे काय दिवा लावणार ते साहेबाला माहितीच असतंय तरी साहेब भोळी अपेक्षा ठेऊन सूचना देत असतो...सायंकाळी  पाच साडेपाच वाजता  बऱ्यापैकी   चुळबुळ सुरू होते... घरी जायची घाई!!  साहेब सोडून शक्यतो कोणी मुख्यालयी  राहत नाही कारण मुख्यालयी फक्त साहेबानेच राहायचं असतंय हे ठरलेलं! कारण बाकीच्या  सर्वांना चांगल्या सोयीसुविधा पाहिजे असतात त्या मुख्यालयी असतीलच असे नाही... पण साहेब बिचारा adjust करून घेतो! अशा प्रकारे मीटिंग ची सांगता होते.. खालच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तथा फेकलेल्या आकड्यांच्या आधारे साहेब त्याचा report तयार करतो...तेच वरच्या साहेबाला फेकतो... असच वरचा साहेब पण..

 

गोविंद खामकर

Saturday, March 20, 2021

कमिटी

 आज काल प्रशासकीय कामकाज करताना साहेबाच्या मागे किती कामे असतात ते तर आपण पाहतच आहोत(आणि साहेब त्यातली किती करतो ते पण!). पण एवढ्यावर साहेबाला सोडील ते शासन कुठलं.. साहेब वर्षभर राबता राबता ज्या विविध योजना राबवतो  त्याच मूल्यमापन अथवा फलश्रुती तपासण्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळ्या कमिटी फिल्डवर भेटी देत असतात. एक तर शंभर  रुपयांची योजना राबवताना ज्या दोनशे अटींचे पालन करावे लागतेत्यामध्ये साहेब आणि यंत्रणा पूर्ण बेजार होते,  तरीसुद्धा कामात  काहीतरी चुका राहून जातातच....

असंच एखादं पत्र येऊन पडतकमिटी येणार(सहाजिकच हे पत्र whatsapp वरच!!)साहेबाच्या दृष्टीने कमिटी म्हणजे घरच झालं थोडं अन... पण असो.  यंत्रणा कामाला लागते(म्हणजे यापूर्वी अगदीच काम करत नव्हती अस नाही!). तसे कमिटी हा प्रकार नेहमीचाच असल्याने साहेब आणि त्याची यंत्रणा या कामात सराईत(सराईत शब्द  जरा  जड वाटेल पण राहुद्या आता!) झालेले असतात. कमिटी direct  राज्य सरकारला अथवा  विभागाला reporting करणार आहे असलं काहीतरी वरचे साहेब सांगत असतातपण हे नेहमीचंच असल्याने साहेब त्याच जास्त tention घेत नाही . कमिटी येणार म्हणलं तर सगळ्यात आधी साहेबाच्या डोक्यात काय येत असेल तर यावेळी कमिटीचे 'नियोजनकोणाच्या गळ्यात मारायचं! मग मागच्या वेळी हे नियोजन कोणी केलं होतं किंवा हे करण्यास कोण 'सक्षमआहे या बाबींचा अभ्यास करून साहेब कोणाच्या तरी गळ्यात हे 'नियोजनमारून टाकतो!! काही कर्मचारी नियोजन म्हणलं की दूरदूर पळतातअसले कर्मचारी  साहेबाला अजिबात आवडत नाहीत. किंबहुना असले कर्मचारी साहेबाच्या 'चांगल्याकर्मचाऱ्याच्या व्याख्येत बसतच नाही! कमिटीच सगळं 'नियोजनव्यवस्थित करा असा निरोप वरचा  साहेब आवर्जून देऊन मोकळा होतो. या नियोजनाला विशेष अशी तरतूद नसतेच.वरच्या साहेबाला विचारलं तर ते सांगणार ते तुमच्या 'लेव्हलला करून घ्या... एवढ्या वर्षात हे 'लेव्हलनावाच लेखशीर्ष कुठंच सापडलं नाहीतरी पण होऊन जातं सगळं! (आता हे कसं होतं याची चर्चा इथं नकोच!).  जे  साहेब प्रशासनात नवीन नवीन आलेले असतात त्यांना हे'नियोजनलवकर कळत नाहीते वरच्या साहेबाला अजून खोदूखोदू विचारतातमग वरच्या साहेबाची पण अडचण होते!! मग वरचा साहेब थेट खालच्या साहेबाच्या खालच्या कर्मचाऱ्याला संपर्क करून योग्य ते 'नियोजनकरण्यास सांगतो..  त्यामुळे नवीनच प्रशासनात आलेल्या  साहेबाला  कमिटीच प्रकरण जरा जडच जात कारण  साहेबाला प्रशिक्षण संस्थेत शिकवलेले तत्वज्ञान  आणि हे कमिटीच प्रकरण यांचा दुरान्वयेही संबंध नसतो.  त्यात वरचा साहेबच जर प्रशासनात नवीन तथा interview mode मधून बाहेर आलेला नसेल तर तो खालच्या साहेबांकडे आलेल्या कमिटीच्या भानगडीत अजिबात पडत नाहीतसेच खालचा साहेब हे सगळं कसं manage करतो हे पण त्याला विचारत  नाही( हे पारदर्शक प्रशासनाच्या तत्वात कसं बसत ते वरच्या साहेबलाच माहीत). कमिटी  नेमक्या कोणत्या गावांना भेट देणार ते शक्यतो आधीच ठरलेल असतंय.. गावातील लोक कसे आहेतगावातील कर्मचारी कसे आहेतगावातील कामाचा दर्जागावातल्या भानगडीतक्रारकर्तेराजकीय गटतट , 'सहकार्याची भावनाइत्यादी parameter पाहून गावे final केलेली असतात... मग कोणती कमिटी आली की त्याच गावात!!! दुसऱ्या गावांना संधीच(की शिक्षा?) नाही! अगदी दुष्काळ पाहणीसाठीएखादी  कमिटी आली आणि तिला सगळ्या रस्त्याने सगळया गावांमध्ये जरी  नुसता फुफाटा आणि कुसळच दिसली तरी पण साहेब रिस्क  घेत नाही,त्या कमिटी ला पण नेहमी ठरलेल्याच गावात नेणार!...show fail नाही झाला पाहिजे ही प्रामाणिक भावना!! 

एकदाची कमिटी गावात येते.. साहेब आणि यंत्रणा वाटच पाहत असतात  (नाईलाजाने पण आतुरतेने).कमिटी आल्याबरोबर गावात   जमलेले तथा वैतागलेले लोक  त्यांचं स्वागत करतात. याकामी शक्यतो  एका शिक्षकाची नेमणूक केलेली असते(तो पण ठरलेलाच). तो शिक्षक कमिटीच स्वागत करण्यापूर्वी थोडी गावातील इकडची तिकडची माहिती सांगतो. मध्ये मध्ये दोन चार शेर ट#2335;ाकतो त्यातली त्यात  'यु ही पंख होणे से कूच नही होताहौसलो  से उडान होती है!हे तर famous!(अतिशय संदर्भहीन पण सगळे  गप ऐकून घेतात कारण Timepass करणे हा मूळ हेतू). नंतर हार तुरे देऊन फोटो बिटो काढून मग फील्ड visit कडे रवाना... तिथं पण तेच ठरलेले  दोन चार  'पोपटलाभार्थी... काही पण  फेकतेत...हे लाभार्थी काय फेकणार हे त्या समितीतील दोन चार टाळके सोडले तर सगळ्यांना पाठ झालेलं असतंय. या गावात साहेबाने राबविलेल्या योजना प्रचंड यशस्वी झालेल्या असतात!(बाकीच्या गावात काय झालं ते साहेबाला निवांत विचारा!). एखाद्या योजनेमुळे तर एखाद्या  शेतकऱ्याचं आयुष्यच बदललेलं असत...त्याच उत्पन्न एवढं वाढलेल असतंय की कमिटीमधील एखाद्या सदस्याला frustration येतंय मी शेतकरी असतो तर किती  बरं झालं असत!  त्यात एखादा कमिटी सदस्य सल्ला देणार की तुम्ही जे पिकवत आहात ते तुम्ही डायरेक्ट एखाद्या मॉल सोबत tie up करून अजून दोन चार  पट कमवू शकता(हा सल्ला सगळेच कमिटी वाले देत असतात). साहेब पण मग  जणू त्या कमिटी सदस्याने गुरुत्वाकर्षणचा शोध लावल्यासारखा impress झाल्याच दाखवतो(तस हे ऐकून ऐकून साहेबाचे कान पिकलेले असतात).एखादा कमिटीतील सदस्य तर input output च समीकरण सगळ्यांसमोर मांडतोआपण खर्च कसा कमी करू शकतो याबद्दल माहिती देतो.. सगळे impress झाल्यासारख दाखवतात...एखाद्या योजनेमुळे त्या गावात   सुरुवातीला पावसाळ्यात पण पाणी नसायचं आता उन्हाळ्यात पण फुल्ल पानी...सगळे impress... सगळीकडे असंच.. नुसती फेकफेकी... कमिटी शासकीय घर मिळालेल्या लाभार्थी ला विचारणार नवीन घरात गेल्यापासून आपला अनुभव काय... मग लाभार्थी म्हणणार fresh वाटतंयबरं वाटतंयपोराचं लग्न होत नव्हतं आता जुळलंय.. पण कमिटी च एवढ्यावर समाधान होत नाही.. मग लाभार्थी सांगणार पाहिले आम्हाला दररोज साप चावायचे आता कधीकधीच चावतात वगैरे वगैरे....

एखाद्या कमिटी सदस्याला या गावात राबविलेल्या योजना खूपच आवडताततो लगेच साहेबाला यावर  success story बनवायला सांगतोसाहेब पण नक्की नक्की म्हणून म्हणून होकार दर्शवतो... पण Success story दिली की ते गाव पहायलाअजून  कमिट्या येणार हे साहेबाच्या डोक्यात पक्क असल्यामुळे साहेब या भानगडीत पडतच  नाही. सगळ्याच साहेबांचा याबाबत awareness वाढल्यामुळे आता शासनाने   बऱ्याच योजनांमध्ये suuccess story सुद्धा compulsory सादर करण्यास सांगितले  आहे! मग ती success story उत्कृष्ट ठरली तर अजून रिस्क वाढते त्यामुळे ती शक्यतो थातुरमातुर प्रकारची केली  जाते... 

त्यानंतर कमिटीला  परिसरातील एखाद  प्रसिद्ध देऊळ त्यांना दाखवायचं. काही कमिटी सदस्य तर फक्त देव देव करायला कमिटीत हिंडतेत का ते पण कळत नाहीकारण ते बाकी कशातच interest दाखवत नाही... देवदर्शनामुळे कमिटीला पण कामात काम झाल्यासारखा वाटत(साहेबाला कामात बिनकामच काम  आल्याचं समाधान वाटतं!).  एकदा मी कमिटीतील एका सदस्याला म्हटलो की इथल्या देवाच्या पाया पडलं तर घरात भांडण होत नाहीत्याचा दोन तास तिथून पायच निघेना... असो. कमिटी ची इच्छा असो अथवा नसो तिथं आरती वगैरे करायचीच ,timepass जास्तीत जास्त करायचा हे धोरण. 

नंतर जेवणाचा कार्यक्रम...त्यासाठी साहेबाची काही यंत्रणा इकडे कार्यरत असते. ही मंडळी या कामात अनुभवी असल्याने सारख ते त्यांच्याच गळ्यात येत..हे काम जर व्यवस्थित झालं तर कमिटी नाराज होण्याची जास्त शक्यता असतेत्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्या ठिकाणी जे जेवण मिळत तेच त्या परिसरातल best आहे असा कमिटीचा समज तयार केला जातो. मग अशा प्रकारे कमिटीला नमस्कार करून  राम राम केला जातो( पुन्हा येऊ नये या अपेक्षेने!) . मग साहेबाला त्या गावातील लोक विनंती करतात साहेब पुढच्या वेळेस दुसरं गाव बघात्या गावात काम करणारे कर्मचारी तर पार  वैतागून गेलेले असतात ,  ते पण सांगतात साहेब दुसरं  गाव घ्या पुढच्या वेळेस...!! साहेब नुसताच हो हो म्हणतो .....मग थोडे दिवस जातात... मग दुसरी कमिटी.. तेच गाव.. तेच लाभार्थी... तेच देऊळ..

गोविंद खामकर

Wednesday, March 17, 2021

कार्यशाळा

नुसतं कार्यशाळा शब्द ऐकला तरी  कोणत्यापण साहेबाला गुदगुल्या झाल्यासारख वाटत! ह्या शब्दातच जादू आहे...जर  पत्रामध्ये चुकून 'कार्यशाळा आणि आढावा बैठक असा शब्दप्रयोग आला तरी साहेबाला करमत नाही!! फक्त कार्यशाळा पाहिजेआढावा नकोच(साहेब मीटिंग मध्ये आढावा कसा देतो ते माहितीच आहे!).कार्यशाळेच्या नावाखाली आढावा घेणार्यांना तर  साहेब कम्युनिटी कधीच माफ करणार नाही...!!  कार्यशाळा घेण्याचा शासनाचा उद्देश एखादे अभियान समजावून सांगणेत्या  राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविणे इत्यादी असला तरी साहेबाचा प्राथमिक आणि अंतिम  हेतू दिवसभराच्या ऑफिसच्या कटकटीतून मुक्त  होण्याचा असतो.. नुसतं कार्यशाळेच पत्र अथवा निरोप आला तरी साहेबाचे दोन तीन दिवस खूपच आनंदात जातात.. काही काही साहेब कार्यशाळेच्या आधल्या दिवशीच  कार्यशाळेच्या  ठिकाणी सर्व "नियोजनाच्या" तयारीने पोहचलेले असतात. कार्यशाळेला जाताना साहेब कोणतीच माहिती सोबत नेत नाहीफार तर साहेबासारखं दिसावं म्हणून  एखादी डायरी(न उघडण्याच्या अटीवर) सोबत घेतो. कार्यशाळा घेणारा पण शेवटी साहेबच असल्याने त्याला हे खालच्या साहेबाचे गुण माहीत असतात,   त्यामुळे तिथं एखादा पेन( शक्यतो रुपयांच्या आतील)एखादं फोल्डर माहितीपुस्तिका(साहेब असलं कधी वाचणार!) असलं तिथं गेल्यागेल्या हातात ठेवल जात. कार्यशाळेला पोहचल्यानंतर साहेब त्याच्या इतर साहेबमित्रांना भेटतोचहापाणी करता करता कार्यशाळेचा मूळ विषय सोडून इतर सर्व विषयावर चर्चा करतो..मग कार्यशाळेच्या हॉल मध्ये प्रवेश केल्यावर साहेब त्याचे दोन चार जोडीदार पाहून  शक्य तेवढं stage पासून लांब बसण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपापसात मनमोकळेपणाने चर्चा करता येईल. हॉलमध्ये सजवलेलं स्टेज, background ला सुरू असलेले instrumental  music,   मोठा प्रोजेक्टर इत्यादी पाहून साहेबाला अजून प्रसन्न वाटतं. नंतर मोठे मोठे 2-4 साहेब येतातत्यांचा  त्यांच्यातली त्यांच्यातच  एकमेकांचा बुके देऊन सत्कार केला जातोसाहेब पण  फुल energy ने टाळ्या कुटतो. स्वागत आणि प्रस्ताविक शक्यतो एखाद्या अशासकीय निवेदकाकडे असतेशासकीय साहेब  हे काम करण्यासारखे कालांतराने   राहत नाहीत!  नंतर कार्यशाळेच्या मूळ विषयाकडे वळताना प्रोजेक्टरवर presentation द्वारे  विषय समजून सांगितला जातो,पण साहेबाचा काही समजून घेण्याचा मुडच नसतोच!! (हे presentation सुद्धा बहुदा त्या अभियानासाठी नेमलेला कंत्राटी  staff करत असतो. असंही प्रशासनात हे कंत्राटीच करत आहेतबाकी शिपायापासून तर साहेबापर्यंत सगळेच साहेब !!). त्यातली त्यात जर presentation सुरू असताना चुकून  light गेली, mike बंद झाला, जो presentation करतोय त्याला एखादा फोन आला वगैरे असं काही घडलं तर साहेबाची भावमुद्रा वरकरणी गंभीर दिसत असली तरी आतून मात्र सुखद लाडू फुटत असतात... Presentation मध्ये  काही साहेबांनी योजना राबविताना ज्या success story तयार झालेल्या असतात त्या सर्वांना दाखवल्या जातातत्याच presentation एवढं छान केलेलं असतंय की प्रत्यक्ष ते काम केलेला साहेब पण confuse होतो की हे नक्की मीच केलंय का.!! नंतर हे अभियान राबविताना आपल्याला कोणत्या activities करायच्या आहेत, record कसं ठेवावं लागेलकोणाची काय जबाबदारी असेल , data entry कशी करावी लागेलते करताना काय काळजी घ्यायची कोणत्या अडचणी येऊ शकतात या सर्व बाबींवर चर्चा केली जाते पण हे सगळं साहेबाच्या डोक्यावरून जात असतंय! साहेब विचार करतो हे मला का सांगत आहेतमाझ्या खालच्या कर्मचाऱ्यांना यांनी training द्यायला पाहिजेसगळं काय साहेबानी बघायचं का?  एकंदरीत आतापर्यंत सगळंच डोक्यावरून गेलेलं असतंयपण साहेबाला त्याच्या खालच्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांवर विश्वास असतोसाहेबाचे कर्मचारी  कार्यशाळेला न येतासुद्धा हे नक्की करू शकतात याची साहेबाला खात्री असते. कार्यशाळेमध्ये साहेबाच मन काही लागत नाहीपण सगळं समजल्यासारखं आणि अगदी मन लावून ऐकल्यासारखी acting मात्र करावीच लागते.त्यातली त्यात जर साहेबाची जागा stage पासून जरा जास्तच जवळ असेल तर साहेबाला कार्यशाळा असून पण दिवस वाया गेल्यासारखा वाटतो!त्यातली त्यात जर साहेबाचा साहेब सुद्धा कार्यशाळेला उपस्थित असेल तर साहेबाला अजून जबाबदारपणे ही acting करावी लागते! तसही  मधे मधे आत बाहेर  येणे जाणे हा timpass चालू असतोचअधून मधून मोबाइल चाळने चालूच असते. ऑफिसच्या  कामासंदर्भात  बरेच फोन नेहमीप्रमाणे चालूच असतात पण साहेब कार्यशाळेच्या नावाखाली कोणालाच दाद देत नाही.. जरा वजनदार माणसाचा फोन असला तरी फोन उचलून अगदी हळू आवाजात सांगणार(जरी मोठ्याने बोलणे अथवा बाहेर जाऊन बोलणे शक्य असले तरीही!) मीटिंग मध्ये आहे,आणि फोन कट करून टाकणार. Stage वरचा एखादा साहेब पण कार्यशाळेच्या मुख्य विषयाला हात न घालता(मोठया साहेबाला पण विषय कितपत समजलेला असतो यावर भाष्य नकोचपण साहेब असल्यामुळं जमून जातंय!) फक्त एवढंच  सांगतो की  आपण काम खूप करतो पण ते data entry करत नाही , online करत नाही  त्यामुळे आपला performance कमी दिसतोहे वाक्य प्रत्येक कार्यशाळेत ठरलेलंच...या वाक्याला खाली बसलेले सगळे साहेब अशी  दाद देतात जणू काही हे सगळं काम 100 टक्के करून बसले फक्त online करायचं राहील!! हे सगळं करता करता साहेबाच्या पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात आणि मार्गदर्शन करणारा काहीतरी न समजणार सांगत सुटलेला असतो. तो मार्गदर्शन करणारा खाली बसून पुन्हा एखादा नवीन माणूस  मार्गदर्शन करायला उठला तर मात्र साहेबाची अक्कल जाते...काही हुशार संधीसाधू साहेब   Lunch break होण्यापूर्वीच  जेवणाला सुरुवात करतात.   साहेब पण कार्यशाळेच्या दिवशी dieting वगैरे च्या भानगडीत न पडता जेवणावर तुटून पडतो. जेवणानंतर कार्यशाळेच रूप बघण्यासारखं असतं... निम्मे अर्धे शिस्तप्रिय साहेब जेवण केल्याबरोबर गायब होतात.. उरलेले पण हॉल मध्ये जाऊ का नकोनाही गेलं तर काय होईलगेलो तर निघता येईल का,  खूप वेळ बसावं लागेल का या विचाराने ग्रासलेले असतात. कार्यशाळा घेणारे पण सगळ्यांना बसून घ्या बसून घ्या आपण लगेच संपून टाकू अस प्रलोभन देत असतात पण साहेब लोक लवकर दाद देत नाहीत.. एकंदरीत सगळेच ढेपाळलेले असतात.. कसातरी कार्यक्रम सुरू असतो..मग presentation दाखवणारा  कसं तरी presentation पळवत पळवत कडेला न्यायचा प्रयत्न करतो..  आता परिस्थिती कोणाच्याच नियंत्रणात  राहिलेली नसते. हा अटीतटिचा क्षण साधून कार्यशाळेची  सांगता केली जाते!! जर चुकून एखाद्या साहेबाला विचारलं की नेमकं काय शिकवलं कार्यशाळेतत्याची विकेट गेलीच म्हणून समजा. कार्यशाळा संपल्याबरोबर साहेबाला  मुक्त झाल्यासारख वाटत... इथून पुढंचा सगळा 'कार्यक्रममात्र  ठरल्याप्रमाणे होतो... काही काही कर्तव्यदक्ष साहेब आजचा दिवस 'गेलाया नकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात  तर ओरिजनल साहेब आजचा दिवस 'निघालाया सकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात....पुढच्या कार्यशाळेची वाट पाहत.... क्रमशः

( ' *साहेब* series मधील 'प्रशासनातील कोंबडशाहीशिपाईसाहेब,  नवीन साहेबसाहेबाची मीटिंगमामाच पत्र हरवलंकार्यशाळा... क्रमशः)

*©* गोविंद खामकर

 


Sunday, March 14, 2021

मामाचं पत्र हरवलं...

शासनामध्ये टपालातुन पत्र वेळेत येईल असे कोणत्याच साहेबाला  वाटत नाही..हे एकमेकांच्या  कार्यक्षमतेवर आणि कर्तव्यतत्परतेवर असलेल्या प्रचंड विश्वासाच प्रतीक आहे.. सामान्यपणे एखाद पत्र साहेबाला त्या पत्राचा उगम झाल्यापासून पंधरा  दिवसांनातर हातात येत... त्या पत्रात लिहिलेले असतंय तीन  दिवसात अहवाल सादर करावाविलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहीलकिंवा हे अतिशय गंभीर आहेआपण व्यक्तिशः लक्ष घालावेतक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी,अर्जदाराला  परस्पर तुमच्या स्तरावरून कळून टाकावे इकडे कळवू सुद्धा  नये वगैरे वगैरे.....आता पत्रच  15 दिवसांनी आल्यावर कधी अहवाल आणि कधी कार्यवाही  ..असो.  एरव्ही ही तर  फॅशनच झाली आहेसर्वस्वी जबाबदारी आपली राहील हे प्रत्येक पत्रात नमूद असतंय.. हे असले पत्र  काढनाऱ्या साहेबांवर नेमकी कोणती जबाबदारी असते ते पण पाहिलं पाहिजेकारण नुसते पत्र काढायला शक्यतो शासन एवढा पगार देणार नाही असं वाटतं(देऊ पण शकतत्यात काय एवढं)!! 

एखादं पत्र वरच्या साहेबाच्या ऑफिसमधून  type झाल्यापासून तर ते Target तथा  खालच्या साहेबाच्या हातात(कार्यलयात नाही!!)  पडेपर्यंतच प्रवास फारच रोमांचक असतो... या पत्राचा प्रवास टपाल कक्षातील  अतिकार्यक्षम कर्मचार्यांमुळे अजून खडतर होतो!! एक तर ते पत्र type करणारा दिवसभरात एकच पत्र करतो.. इतर उर्वरित तथा फावल्या वेळात 5-25 चहागप्पाटप्पा फरकइनक्रिमेंटशेती,प्लॉटिंग आणि इतर राष्ट्रीय विषयावर चर्चा.... मग ते पत्र साहेबाच्या टेबल वर 2-4 दिवस कोंबड्याच्या प्रतीक्षेत!! 

साहेबांच्या कोंबडा तथा स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर जावक नंबर टाकून अथवा असाच  फेकून ते टपाल  कक्षात जाणार.... साहजिकच टपाल कक्षात   त्यावर प्रचंड विचारमंथनचर्चाआणि अंतिम  निर्णय घेणे  ही खूपच किचकट प्रक्रिया असल्याने या ठिकाणी घाई करून जमतच नाही!!!  या ठिकाणची छोटीशी चूक सुद्धा परभणीचे पत्र जर्मनीला पाठवू शकते वगैरे वगैरे....त्यात पुन्हा टपाल कक्षातील कर्मचारी हे अतिशय सामाजिक बांधिलकी जपणारे  असल्याने त्याना सर्व वाढदिवस,  आजारी पाहुण्याला भेटायला जाणेमित्राच्या मुलाला मुलगी पाहायला जाणेसुपारीसाखरपुढेदहावेसदिच्छा भेटीदेवदर्शननवसचुलत मेहुण्याच्या चुलत सासुच्या चुलत पोराचं लग्न वगैरे वगैरे  हे अटेंड करावेच लागतात. त्यामुळे त्या पत्राला तिथून निघण्यास उशीर झाला तर त्यात एवढं काय नवल आहेत्यानंतर ते  पत्र खालच्या ऑफिस च्या शिपाईसाहेबांच्या प्रतीक्षेत ... खालच्या ऑफिस चे शिपाई साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ते पत्र खालच्या साहेबाच्या टपाल कक्षात पोहच करतात... साहजिकच इथे सुद्धा अत्यंत अनुभवी (काहींनी तर आयुष्य टपाल कक्षात काढलय!)  दद्धाचार्यांच्या हातून ते थोडंच अस न तपासता जाणार आहे!!!

तिथं त्याची आवक रजिस्टर ला सांकेतिक  भाषेत( ही एक आवक जावक कक्षातील code language आहेही जो लिहितो त्यालाही शक्यतो वाचता येत नाहीबाकीच्यांचा तर विषयच नाही!! ) नोंद घेऊन ते पुढे साहेबांकडे जायला तयार...मग कार्यालयातील एखादा कर्मचारी ते पत्र marking करून(खरं तर पत्र साहेबाने मार्क केलं पाहिजे पण... साहेब..शेवटी साहेबच!!.. आता अजून काय बोलणार!) पुढे त्यासंबंधी टेबल वर शिपाईसाहेबामार्फत पाठवतो...एवढं सगळं systematic  जंजाळ असताना पत्र उशिरा पोहचणे  समजू शकतो पण पत्र न सापडणे हा गंभीर प्रकार शासकीय कार्यालयात नेहमीचाच.!!.. मी काही दिवस मंत्रालयात काम केलं तिथपासून तर फील्डवरील सगळ्या कार्यालयात हीच बोंब.... साहेबाकडे येणारे अभ्यागत तथा पत्रकारलाभार्थीकार्यकर्ते,  कार्यालयाच्या अवती भवती कायम पडीक दिसणारे एखादा कागद घेऊन येतातत्यावर साहेबाच्या कार्यालयाची पोहच असते...साहेबाने तो कागद पाहिलेला नसतोच(अगदी नेहमीप्रमाणे!)..मग साहेब संबंधित टेबल वरच्या कर्मचाऱ्याला बोलावतो... साहजिकच नेहमीप्रमाणे  तí#2379; पण म्हणतो त्यानेही तो कागद पाहिलेला नाही...मग कागद गेला कुठं??  साहेब चिडचिड करायला लागतोतस सगळे तो कागद सापडवण्याचा प्रयत्न करतात अथवा किमान तस भासविण्याचा तरी प्रयत्न करतातकागद  काय सापडत नाही.... बरं हे  नेहमी असंच!!!

पण साहेबाला काय मेळ लागत नाही कागद जातेत तरी कुठं!! कधी कधी तर साहेबाला वाटत सरसकट सगळ्यांच्या सोनोग्राफया तरी करून पहाव्या कोण कागद खात बित तर  नाही ना हे तर समजेल!!..... पण आता साहेबाने याला तोडगा काढला...जो व्यक्ती ती पोहच घेऊन येतो त्याचीच झेरॉक्स काढायची आणि तिथून पुढे त्या कागदावर काम सुरू करायचं(हे तत्व मंत्रालयापासून तर सगळ्यात खालच्या ऑफिस पर्यंत लागू आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय)!! 

पण आता लोक पण हुशार झालेतते पत्रावर पोहच घेऊन दिवसांनी माहिती अधिकारात विचारतात की अमुक अमुक तारखेला दिलेल्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील द्यावा. मग आता काय शोधणार... कुठं  शोधणार...शोधून तरी काय होणार...!!!

...बरं  ज्या पत्रांचा उगम साहेबाच्या ऑफिस मध्ये होतो तिथं पण तीच बोंब!! जर साहेबाला असं वाटलं की एखादा फील्ड वरील कर्मचारी कामाकडे फारच दुर्लक्ष करतोय(थोडफार  चालतय!) तर साहेब त्याला नोटीस काढतोपण नोटिसला उत्तर सुद्धा येत नाहीमग साहेब दुसरी नोटीस काढतोतिला पण उत्तर येत नाहीसाहेबाला त्या कर्मचाऱ्याच्या मुजोरपणाचा खूप  राग येतो मग साहेब प्रथेनुसार तिसरी आणि अंतिम नोटीस काढतो( तीन नोटीस देण्याची प्रथा आहेनियम नाही)...पण त्याला पण उत्तर नाही... त्यांनतर 2-3 दिवसांनी योगायोगाने नोटीस दिलेला कर्मचारी दुसऱ्या  कामानिमित्त साहेबांकडे येतो... साहेबाला तो एकदम chill दिसतोनोटिसचा लवलेशसुद्धा चेहऱयावर नाही!!! मग साहेब आवक जावक विभागातील तज्ञ कर्मचाऱ्याला बोलावतो.... तिन्ही नोटीस त्याच्याकडेच पडलेल्या!!!!  बरं त्याला बोलून काय फायदा.. तो बऱ्याच वर्षांपासून अध्यात्माच्या मार्गावर घसरलेला असल्याने कमालीची स्थितप्रज्ञता त्याच्या अंगी असतेकाही बोलाफरकच नाही..असो!!

हे झालं कागदी घोड्यांचं..

Email च तर लै अवघड...इकडचे म्हणणार पाठवलातिकडले म्हणणार आला नाही... मग एकच तोडगा...पुन्हा पाठवा!!...मग  येतो बरोबर.!!...हे कसं काय होत ते त्या सुंदर पिचाईलाच माहिती..आम्ही असलं एकदा Engineering च्या पहिल्या वर्षात 2006 साली केलं होतंफोन करून विचारल होत email आला का... पण 2021 मध्ये तरी हे थांबलं पाहिजे!!.....

लहानपणी एक खेळ खेळायचो..... मामाच पत्र हरवलं... ते कोणाला सापडलं....आता समजतंय तो मामा साहेब होता!!!!

 

 

(काही शासकीय कार्यालयातील कर्मचारी  टपाल कक्षामध्ये अत्यंत चांगलं काम करीत आहेतकाही ठिकाणी ई टपाल पद्धती  सुद्धा चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे..हे लिखाण अगदी अपवादात्मक अनुभवावर आधारित आहेजरी कोणाला वाटलं की हे माझ्या ऑफिसशी match होतंय त्यांनी सुधारणा करावीइलाज नाही)

 

 

गोविंद खामकर

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...