साहेब आणि whatsapp!!!
माहितीच्या अधिकारानंतर प्रशासनात अमूलाग्र बदल करणारा घटक म्हणजे Whatsapp !! क्रांतीच म्हणा ना! एक महत्वाची गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की whatsapp ला अजूनही email सारखा official communication चा दर्जा नाही मात्र whatsapp शिवाय सध्या शासनाच पानही हालत नाही( पण शासन हा बदल लवकर करणार नाही हे ठरलेलं!!). या App च्या माध्यमातून प्रशासनातील 'कार्यक्षम' टपाल यंत्रणेच अपयश झाकण्यास मदत होते. साहेबाला टपालातून पत्र वेळेवर जाणार नाहीच याची खात्री असल्याने साहेब पत्र कोंबडा हाणल्याबरोबर( कधी उत्साहाच्या भरात कोंबडा हाणण्याच्या आधीच!) whatsapp च्या ग्रुप वर फेकून मोकळा!! पण एकंदरीत यामुळे प्रशासन गतिमान झाल्याचा भास तेवढा निर्माण होतो. म्हणजे अस की मंत्रालयातून एखादं पत्र निघालं की ते तात्काळ मोठ्या साहेबाच्या ग्रुप वर येत! तिथून मोठा साहेब ते उचलून खालच्या साहेबाच्या ग्रुप वर फेकून मोकळा होतो.. मग खालचा साहेब त्याच्या कर्मचारी ग्रुप वर फेकणार... पत्र निघाल्यापासून तर इथपर्यंतच प्रवास फारतर एक तासाचा!!! पण..... पण.... इथून पुढं काही खरं नाही!! खालचे अर्धे (संख्येने बरं का!) कर्मचारी ते 2-4 दिवस पाहतच नाहीत, ज्यांनी पाहिलं ते वाचत नाही, जे वाचतात त्यांना ते समजत नाही, ज्यांना समजत ते काहीच करत नाहीत... गतिमान प्रशासन जिंदाबाद!!!
पण ही गतिमानता वरच्या साहेबाना मात्र एकदम ओरिजनल वाटते! म्हणजे काही साहेब निद्रानाश झाल्यासारखे रात्री 12:00 वाजता message टाकून त्यांना सकाळी 8:00 वाजता माहिती आवश्यक असते. ते काही का असेना पण ही माहिती सकाळी 8:00 वाजता सगळे देतील ही अपेक्षा(भाबडी?) ठेवायला सुद्धा लै मोठ्ठ काळीज लागतं! जीवनात सकारात्मकपणा असावा पण इतका!!! पण तरीसुद्धा सगळ्या साहेबाना whatsapp च्या माध्यमातून सगळ्यांना 24 तास on duty असल्यासारखा फील येतो.
जेंव्हा वरचा साहेब एखादा message टाकतो त्याला लगेच कोणी reply देत नाही...पण ग्रुप मधलाच एखादा साहेब जबाबदारी घेऊन Yes Sir म्हणला रे म्हणला की टोळधाड पडल्यासारखी लगेच सगळे Yes Sir, Yes Sir म्हणून मोकळे होतात! Yes Sir चा जरा कंटाळा आला तर त्याच Advance Version म्हणजे Noted Sir चा वापर होतो. दिवसभर फक्त Yes Sir, Noted Sir, Sure Sir, Sir...मेलो सर!!! एवढंच चालू असतंय... कधी कधी तर एवढा बाका प्रसंग तयार होतो की reply द्यावा तर काय द्यावा हा प्रश्न!!! उदा. तुमचा performance अमुक अमुक विषयात अत्यंत ढिसाळ आहे असं वरचा साहेब लिहितो.... या ठिकाणी Yes Sir, Noted Sir ही आयुध उपयोगी पडत नाहीत आणि स्वतःला justify करण्याइतपत तर performance पण नसतो आणि reply नाही दिला तर वरच्या साहेबाचा ego hurt होऊन तो नाराज!! कधी कधी वरचा साहेब भली मोठी 60-70 पानांची pdf टाकतो आणि खाली लिहितो .. go through it!!(हे वरच्या साहेबांनी पण वाचलेले नसतंय तो भाग वेगळा!). इकडं साहेबाला कशावर सही करतो ते कळेना आणि हे असलं साहेब कधी वाचणार!! तरी पण साहेब ती pdf 100% वाचणार असल्यासारखं Yes Sir म्हणून टाकतो. काही काही साहेब ग्रुप वर उगाच एखादी जनहितार्थ पोस्ट ग्रुप वर टाकतात उदा. आरोग्य कसे जपावे वगैरे पण असल्या साहेबाच्या नादी वरचे साहेब पण लागत नाहीत!
कधी कधी वाटत whatsapp ने साहेबांमध्ये Rat Race लावण्याचा मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, काही वरचे साहेब याचा खुबीने वापर करतात. मग दिवसभर हे पटाईत साहेब कसले कसले report टाकून एकदम live commentary चालू असल्यासारखं ..this district performing excellent...this this team need to push hard.... come on... Last Lap... Sprint!!! ...या मायाजालात सगळे साहेब अडकतात... यामध्ये अडचण सांगायची सोयच नसते.. अमुक जिल्हा करतोय तर तुम्हाला काय अडचण आहे? अशा स्थितीत तळातल्या जिल्ह्याकडे, तालुक्याकडे क्षुद्र नजरेने पाहिले जाते.. सगळ्यात चांगला performance असलेल्या साहेबाला सातत्य ठेवण्यासाठी झोपेला उसंत मिळत नाही आणि सगळ्यात कमी performance असलेला साहेब टेंशन मूळ झोपू शकत नाही... दोघांचा निद्रानाश!! मध्यम performance असलेले साहेब आणि commentary वाला साहेब हे दोघे निवांत झोपतात!!!
ते जाऊद्या पण एरवी चांगली मराठी बोलणारे पण whatsapp वर इंग्रजीवर घसरतात! काही साहेब तर एकदम अवघड इंग्रजी लिहू लिहू सगळ्यांना impress करायचा प्रयत्न करतात. त्यांना असं अवघड लिहून स्वतःबद्दल एकदम भारी फील येतो...म्हणजे एकदम elite class मध्ये असल्यासारखं!! जे वाचल्यानंतर समजत नाही त्याला भारतीय लोक भारी म्हणतात या वृत्तीचा फायदा उठविण्याचा हे लोक प्रयत्न करतात. पण असले अवघड इंग्रजीतील message जशास तसे खालच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुप वर टाकण्याच धाडस खालचे साहेब करत नाहीत!! आणि तसला अवघड message ते खलच्यांना decode करून सांगण्याच्या भानगडीत पण पडत नाहीत. बरं ज्या साहेबांचं इंग्रजी जरा बरं आहे त्यांचं ठीक आहे पण ज्यांना इंग्रजी नीट येत नाही त्यांनी कशाला शायनिंग करावी? हे असले साहेब हाताने आपली माती करून घेतात!(म्हणजे ते मुळात लै भारी असतात असंही काही नाही!!). पण यांच्या चुकीच्या english वर कोणीच comment करत नाही अथवा smiley पण देत नाही ! त्यातली त्यात VC मध्ये वगैरे वरचे साहेब जे इंग्रजी शब्द वापरतात हाच यांच्या vocabulary चा प्रमुख स्रोत असतो. त्यामध्ये low hanging fruit, war footing , mission mode असल्या परवलीच्या शब्दांचा समावेश असतो पण spelling ची वाट लावलेली असते.. हे साहेब Arjent, Siriysly, Imigetly, Karona असलं बिनधास्त लिहितात पण त्यांना सगळे मोठ्या मनाने समजून घेतात!!! काही काही साहेब तर काहीच कारण नसताना hdkksuhdjdj असलं काहीतरी चुकून type करून post करतात , delete पण करत नाही!! whatsapp नसतं तर वरच्या काही साहेबाना ते काय काम करतात हे दाखविण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागली असती! आता मात्र साहेब दिवसभरात whatsapp वर वरून आलेलं सगळं गबाळ खाली ढकलत असतो त्यामुळे वरचा साहेब काहीच करत नाही असं म्हणायला वावं राहत नाही. अगदी सुटीच्या दिवशी सुद्धा दोन चार message इंग्रजीत type करून तो घरी निवांत बसून दिवस काढू शकतो.
बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांच्या ग्रुप मध्ये किमान वरच्या level ला तरी ग्रुपचा decorum पाळला जातो, पण जस जस वरून खाली याल तशी परिस्थिती बिकट होत जाते. Happy Birthday अमुक साहेब, congratulations तमुक साहेब, भावपूर्ण श्रद्धांजली , शुभेच्छा यांचा तर या ग्रुप वर महापुरच असतो! कधी कधी ग्रुप मधील साहेब कर्मचाऱ्यांवर चिडतो व लिहितो की हा official ग्रुप असून इथे फक्त शासकीय कामासबंधी messages टाकावेत ... मग एक दोन दिवस ग्रुपमध्ये शांतता!! पुन्हा तेच....Happy Birthday, शुभेच्छा, श्रद्धांजली!!! मग साहेब यांना पुन्हा असला सल्ला द्यायचा पण सोडून देतो... पण खालच्याना जर थोडाफार आवर घातला नाही तर मग पार " अमुक मुलगा हरवला असून त्याच्या आई वाडीलांपर्यंत हा message पोहचवा" किंवा " हा संदेश तात्काळ 21 लोकांपर्यंत पाठवा ,शुभ बातमी येईल अथवा वाटोळं होईल " किंवा " पहाटे 4:00 वाजता cosmic rays येणार...." असल्या पोस्ट टाकण्यापर्यंत यांची हिंमत वाढते!! ही नुसती कर्मचाऱ्यांच्या ग्रुप ची अवस्था नाही तर काही साहेब पण असले उद्योग करत असतात!!.
दोन वर्षांपूर्वी तर whatsapp च फारच अवघड असायचं. एकदा एखादा message/ video धनुष्यातुन सुटलेल्या बाणासारखा...सुटला की सुटला..माघारी घ्यायची सोयच नव्हती! जर चुकून एखादा 'योग्य' message 'योग्य' अथवा 'समविचारी' ग्रुपवर न जाता 'चुकीच्या' ग्रुप वर गेला रे गेला... मग काय खरं नव्हतं!! या असल्या भानगडीमुळे काही कर्मचारी, साहेब पार suspend झाले! ही भारतीय साहेबांची दयनीय अवस्था झुकेरबर्ग ला पाहवली नाही म्हणून त्याने ही post एक तासाच्या आत माघारी घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. पण तरीसुद्धा एखादा 'योग्य' message 'चुकीच्या' ठिकाणी गेला तर एखादा कर्मचारी पार panic होऊन जातो आणि तो 'delete for everyone ' ऐवजी 'delete for me' करून करून मोकळा होतो! मग मात्र वाटोळं अटळ आहे!!!
बरं साहेब हा पण शेवटी एक सामाजिक प्राणी असल्यामुळे तो जिथं जॉईन होईल तिथले पायलीचे पन्नास ग्रुप, गावाकडंचे ग्रुप, पाहुण्या रावळ्यांचे ग्रुप, साहेबांचे ग्रुप असला सगळा ग्रुपचा बाजार झालेला असतो. सगळीकडे post चा पाऊस सुरूच.. एखादा सण असेल तर messages नी येड लागायची वेळ!!(जरा शुभेच्छा देणार्यांनी पण स्वतःला आवरायला पाहिजे हो!). एवढं कमी पडलं म्हणून काय तर साहेबाला status बघायचा नाद, status ठेवायचा नाद, याचे dp बघ, तिचे dp बघ , facebook बघ...असले mobile मध्ये कुटाने चालूच! मुळातच भारतीय माणसाच्या रक्तात दांभिकता कुटुकुटू भरलेली, त्यात साहेब झाल्यामुळे दांभिकतेचा अजून एक extra layer त्यावर add होणार... मग मी किती सुखी हे दाखवण्याचा नादात सुखाने घालवायचा वेळ पण बरबाद करणार!! ही दांभिकता जोपासण्याची, तेवत ठेवण्याची किंबहुना वर्धन करण्याचं काम सुद्धा whatsapp ,facebook च्या माध्यमातून जोरदार पार पाडलं जात! मग ऑफिसच्या कामाच्या नावाखाली साहेब असले timepass करत बसतो!!! परिस्थिती एवढी हाताबाहेर जाते की साहेब साहेब बायकोपेक्षा whatsapp ला जास्त वेळ देतो!! हे थांबलं पाहिजे!!! जरा शहाणपणान
वापर करायला शिकावं लागेल.....नाहीतर ही क्रांती एक दिवस सगळ्या साहेबांना मनोरुग्ण केल्याशिवाय राहणार नाही!!!!
© गोविंद खामकर