एकदा ऑडिटची टिम कार्यालयात आली की मग थोड्याशा प्राथमिक चर्चेचा सोपस्कार!! त्यात एखादा ऑडिटर 'जे काम करतात त्यांच्याच चुका होतात' असला नेहमीचाच डायलॉग मारून मोकळा होतो!! आता याचा अर्थ नेमका काय काढायचा? ..काम करायचं सोडायचं की चुका करायचं सोडायचं की दोन्ही .??
मग ऑडिट सुरू होत.. रेकॉर्ड ची शोधाशोध, कागदांची जुळवाजुळव , जे कागदच अस्तित्वात नाहीत ते तयार करणे, काही कागद आहेत पण साहेबाचे कोंबडे हानायचे राहिले आहेत तिथे साहेबांचे कोंबडे पटापट मारून घेणे वगैरे असले उद्योग सुरू होतात. साहेब पण अशावेळी जास्त डोकं न लावता( नेहमीप्रमाणे!) कर्मचाऱ्याने आणलेल्या कागदावर कोंबडा हाणत असतो. या काळात कर्मचारी असं काय काय साहेबाच्या सहिसाठी घेऊन येतात की साहेबाला प्रश्न पडतो आपल्याला एवढ्या दिवस यांनी हे का दाखवलं नाही.. पण आता साहेबसुद्धा खिंडीत अडकलेला असतो त्यामुळे तो कोंबडे हाणून टाकतो. काही काही कर्मचार्यांनी काहीच रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले नसल्याने ते ऑडिटरसोबत लपाछपीचा खेळ सुरू करतात!!
ऑडिट टीम च्या गरजेनुरूप त्यांच्या राहण्याची आणि इतर 'अनुषंगिक' बाबींची व्यवस्था हा देखील प्रथेचा भाग आहे. याकामी साहेबाच्या ऑफिसचे एक दोन कर्मचारी तैनात केलेले असतात. हे तैनात केलेले कर्मचारी शक्यतो एवढ्याच कामात तरबेज असतात त्यामुळे ही जबाबदारी वेळोवेळी त्यांच्याकडेच येते.
मग एक दोन दिवसात या टीमच आणि साहेबाच्या ऑफिसच 'सूत' जमलं की मग जास्त अडचण येत नाही. मग एकमेकांमध्ये 'सहकार्या'ची भावना वृद्धिंगत होऊ लागते. 'सहकार्याशिवाय' यशस्वी ऑडिट जवळजवळ अशक्य आहे..खरं तर 'सहकार्य' हा एवढा 'बहुआयामी' शब्द असेल आणि त्याला इतके कंगोरे असतील याचा प्रत्यय प्रशासनात आल्यावरच येतो. म्हणजे अमुक अमुक ऑडिटरच आम्हाला नेहमीच खूप सहकार्य असत यातून काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "हे ऑडिटर अथवा साहेब खूप चांगले आहेत" हे वाक्यच मुळी फार अद्भुत आहे!! एक मात्र नक्की की या वाक्यातून साहेबाचा खरा स्वभाव नक्कीच कळत नाही. ' चांगला साहेब' या विशेषणातून मला आतापर्यंतच्या शासकीय सेवेतून समजलेला अर्थ असा आहे की साहेब मध्यम मार्गाने चालणारा माणूस! हे 'चांगले' साहेब शक्यतो कोणालाच नाराज करत नाही.!! बऱ्यापैकी customized!! जर आपल्याविषयी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला बोलताना आपले सहकारी अथवा कर्मचारी जेंव्हा आपला उल्लेख 'चांगला साहेब' असा करतात तेंव्हा आपण जास्त हुरळून न जाता आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करण्यास आणि आत्मपरीक्षण करण्यास प्रचंड वाव आहे असा साधा, सोपा, सरळ अर्थ घेण्यास हरकत नाही. म्हणजे एक चांगला साहेब आणि एक चांगला ऑडिटर ही जोडगोळी एकत्र आली तर काहीही करू शकते!!(इथे सकारात्मक अर्थ घ्यायला हरकत नाही)
...पण देशाचं खरं वाटोळं या एकमेकांबद्दलच्या सहकार्याच्या भावनेनेच होते पण बोलायची सोय आहे का? म्हणजे 'एकमेका साहाय्य करू, करूया वाटोळं सकळ जणांचे'...या उक्तीप्रमाणेच हा सहकार्याचा कार्यक्रम चालू असतो...आणि मग काय ..तेच तेच आवडते परिच्छेद...सालाबादप्रमाणे ..ज्याचं रेकॉर्ड सापडत नाही किंवा समाधानकारक नाही त्याचा आक्षेप न घेणे, जे रेकॉर्ड सापडतय त्यालाच 'रेकॉर्ड' आढळून आले नाही असा आक्षेप लावणे.. एक दोन आक्षेप वगळता सगळं कॉपी पेस्ट!!!
हाफ मार्जिन, लेखी सूचना वगैरे हे असले सोपस्कार फक्त यशदापुरतेच मर्यादित असतात. म्हणजे आक्षेप घेताना सुद्धा एकमेकांचं कमालीचं understanding असल्याने साधारणपणे जे परिच्छेद सहज वगळता येतील असेच घेतलेले असतात त्यामुळे memo reading वगैरे बहुदा औपचारिकता म्हणूण पार पाडल्या जातात..
बरं एवढंच सहकार्याची भावना असेल तर एकही आक्षेप घेतला नाही तर चालणार नाही का? पण यामुळे ऑडिटरच्या च्या वरचा साहेब नाराज होऊ शकतो... आपल्या खालची टीम 'कार्यक्षम' नाही असा 'चुकीचा' मेसेज वरच्या साहेबाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या रामाच्या देशात एवढ्या पारदर्शक कारभाराच 'रामराज्य' अस्तित्वात असेल यावर ऑडिटरच्या वरचा साहेब विश्वास तरी कसा ठेवणार? बरं असेल एखादं रामराज्य तर त्यात वरच्या साहेबाला काय 'राम' आहे? . त्यामुळे एवढे एवढे आक्षेप आलेच पाहिजे असा अलिखित नियमच असतो..
'चांगल्या' साहेबाला ऑडिट मध्ये विशेष अडचण येत नाही(कारणे आपणच शोधा!!). तसेच
बिनधास्त बॅटिंग करणाऱ्या साहेबांमध्ये 'सहकार्याची' भावना जास्त असल्याने त्यांनाही शक्यतो ऑडिटमध्ये जास्त अडचण येतंच नाही.. मात्र ऑडिटमध्ये सगळ्यात जास्त अडचणी 'तत्वनिष्ठ' साहेबाला येतात हा प्रशासनातील(वाईट) नियम आहे. तत्वनिष्ठ साहेबाकडून 'सहकार्याची' अपेक्षा नसल्याने त्याला विनाकारण सहकार्य कसे प्राप्त होईल? एक तर तत्वनिष्ठ साहेबाला सहजासहजी 'चांगल्या' साहेबाचा दर्जा मिळत नाही(चांगले साहेब 'तत्त्वनिष्ठ ' नसतात असा निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही). तत्वनिष्ठ साहेबाच्या जास्त बातम्या देखील वृत्तपत्रात येत नाहीत( ज्यांच्या बातम्या सारख्या वृत्तपत्रात येत असतात ते तत्वनिष्ठ नसतात असला आगाऊ अर्थ आपण काढणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे!) खरं तर तत्वनिष्ठ साहेब हा विद्यमान व्यवस्थेमध्ये एक प्रशासकीय , राजकीय आणि काही प्रमाणात सामाजिक अडचण ठरतोय का यावर विचारमंथन व्हायला पाहिजे, नाहीतर ही दुर्मिळ जमात नष्ट होऊ शकते!!(ही जमात दुर्मिळ आहे किंवा कसे याची आकडेवारी उपलब्ध नाही!)..
एकदाच ऑडिट होऊन जात!! ऑडिट नोट प्राप्त होते..बऱ्यापैकी आक्षेप 'ठरल्याप्रमाणे' असतात, काही आक्षेप जस 'ठरलं' होत त्यापेक्षा वेगळेच असतात, एकंदरीत संमिश्र चित्र!! ही ऑडिट नोट वर उल्लेखलेल्या 'दमदार' प्रक्रियेने तयार झालेली असते तरीसुद्धा तिला कायद्यात विशेष महत्व आहे. पोलीस विभाग असो की कोर्ट, या ऑडिट रिपोर्ट वर प्रचंड प्रेम!! काही झालं की आधी ऑडिट रिपोर्ट विचारणारच! (अपराधसिद्धीसाठी ते आवश्यकही असेल). कधी कधी तर अपचारी सुद्धा त्याच्या बचावाच्या प्रतिवेदनात लिहितो की माझ्यावर जे घोटाळ्याचे आरोप लावले आहेत त्याचे यापूर्वीच ऑडिट झाले आहे आणि त्यामध्ये कोणताही आक्षेप निघालेला नव्हता!! मात्र अशा वेळी ऑडिटर ने हा आक्षेप का घेतला नव्हता हे विचारण्याची प्रथा आढळून येत नाही.
ऑडिट नोट आली तरी तिच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. एक तर त्या आक्षेपांच अनुपालन लवकर करावं असं कुणालाच वाटत नाही. यातील सर्वोच्च विनोद असा की 1970-80 च्या दशकातील आक्षेपांचे अनुपालन सुद्धा अद्याप प्रलंबित आहे. हे जुने आक्षेप म्हणजे नुसता वैताग!! बरं ज्यांच्या काळातील हे आक्षेप आहेत त्यातले किती हयात आहेत? फौजदारी गुन्हे सुद्धा एखादा गुन्हेगार मयत झाल्यावर निकाली निघतात मात्र ऑडिट आक्षेपांच्या बाबतीत ही सुद्धा सोय नाही.गेल्या 40- 50 वर्षात जेवढे साहेब होऊन गेले त्यांनी याच अनुपालन केलं नाही किंवा अनुपालन दिले पण स्वीकारले नाही त्या अधिकाऱ्यांच काय झालं , त्यांच्यावर कारवाई झाली का, मग आपल्यावर तरी कशी होईल..यातूनच प्रेरणा घेऊन हे आक्षेप निकाली काढण्याचं कोणी मनावर घेत नाही.. एक तर 1970 च्या दशकातील आक्षेपांचे चे अनुपालन आत्ताचा कार्यरत साहेब करतो, अद्भुत आहे हे सगळं.!!..माझा काय संबंध हे म्हणायची तर अजिबात सोय नाही.!! बरं एकदा बदली झाली की सुटले!! नवीन ठिकाणी नवीन आक्षेप तयार करण्यासाठी मोकळे!! जोपर्यंत ज्या अधिकाऱ्याचा काळातील आक्षेप आहेत त्याच अधिकाऱ्याने निकाली काढण्याच दायित्व त्या अधिकाऱ्यावर पडणार नाही तोपर्यन्त या आक्षेपांच्या विळख्यातून प्रशासन मुक्त होणार नाही.
बरं या अनुपालनाची वेगळीच गंमत आहे. जे आक्षेप बऱ्याच वर्षापूर्वीपासून प्रलंबित आहेत बऱ्याचदा त्यांचे फक्त आकडेच सापडतात, ऑडिट नोटचा शोध लागत नाही आणि अनुपालन पाहिजे!!खुद्द ऑडिटर च्या कार्यालयात सुद्धा या जुन्या ऑडिट नोट सापडत नाहीत!! एक तर या प्रलंबित आक्षेपांचे अनुपालन करण्यात फार कोणाला रस नसतो. एखादा हौशी साहेब येतो ज्याला वाटत माझ्या कार्यालयात काहीच pending नको... सगळं ok मध्ये पाहिजे!! मग तो या आक्षेपांच्या मागे लागतो. या साहेबाच्या कार्यालयातील मंडळी सुद्धा या 'बिनकामाच्या' कामामुळे वैतागून जातात. मग रेकॉर्ड ची शोधाशोध. नुसतं अनुपालन केलं ,दोन चार कागद जोडले म्हणजे प्रश्न सुटतो का? इथे सुद्धा 'सहकार्याची' भावना पाहिजेच!! नाहीतर काही अनुपालन करा, निष्फळ!! 'सहकार्याची' भावना असेल तर मात्र कसल्याही चॉकलेट अनुपालनांनी आक्षेप वगळला जातो! उदा. यापुढे असे होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल किंवा अमुक अमुक करण्याची कार्यवाही सुरू आहे किंवा आता रेकॉर्ड उपलब्ध झाले आहे. अशा वेळी आतापर्यंत रेकॉर्ड सापडत नव्हते आता अचानक कुत्र्यांच्या छत्र्यासारखे कुठून प्रकट झाले किंवा कार्यवाही सुरू आहे मग संपणार कधी किंवा यापुढे दक्षता घेण्यात येईल मग आतापर्यंत काय...... असो , असे अल्पप्रज्ञाधिष्टीत आणि कॉमन सेन्सला आवाहन देणारे प्रतिप्रश्न विचारण्याची प्रथा अस्तित्वात नाही. कधी कधी तर अनुपालनासोबत जोडण्यात येणारे पुरावे मानीव पद्धतीने जोडले जातात ,म्हणजे ऑडिटर ते पुरावे जोडले नसले तरी जणू काही जोडलेच आहेत असे गृहीत धरून अनुपालन मंजूर करतो!!
कधी कधी ऑडिटर आणि साहेब दोघांचीही आक्षेप काढण्याची निकड प्रचंड वाढते, यातून 'कॅम्प' प्रणालीचा जन्म होतो..कॅम्प हे दोघांच्या गरजेच प्रतीक असते. इथे quality पेक्षा quantity ला जास्त महत्व असते, इथे सगळं ' wholesale ' मध्ये असते. या प्रणालीमध्ये सुद्धा बरेच आक्षेप निकाली निघतात....
अशा प्रकारे हा ऑडिट चा कार्यक्रम सालाबादप्रमाणे चालू असतो , राहील आणि ऑडिट मध्ये जे आक्षेप येतात(आणि येतच राहतील!) ते पुन्हा येणार नाहीत याबाबत यापुढेही 'सदैव दक्षता घेण्यात येईल' आणि ही कार्यवाही 'अविरत' चालू राहील....क्रमशः
©गोविंद खामकर