काल राहुरीतील एक पत्रकार सांगत होता गेल्या 5-10 वर्षात प्रशासन फार गतिमान झालंय ...पण त्याला या गतिमानतेची मूळ मेख माहीतच नाही.....त्याला तरी कसं कळणार!! ही प्रशासन तथा कोंबडशाहीतील गोपनीयता टिकवण्यासाठी हा कोंबड्यांचा खेळ office copy वर असतो,कार्यालयातून बाहेर जाणाऱ्या प्रतीवर नसतो!!
प्रशासनात काम करताना एक सामान्य आणि सर्वमान्य गैरसमज असा असतो की खालच्याना वाटत वरचे सगळं तपासतात आणि वरच्यांना वाटतं खालून सगळं तपासूनच आलंय!! ह्या एकमेकांवरील दृढ (अंध) विश्वासावरच प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान होतंय...साहेब खालच्या कर्मचाऱ्याला चार चार वेळा विचारतो बरोबर केलंय ना, काही चुकीचं तर नाही ना, नक्की ना etc... पण साहेब वाचायची ' Risk' घेत नाही...नियम कायदे वाचायला या गतिमान प्रशासनात वेळच नाही... त्यामुळे बहुतेक वेळा common (non)sense वरच कार्यक्रम चालू असतो...पण यामध्ये सही तथा स्वाक्षरी तथा कोंबडा याचा फार महत्वाचा रोल असतो. साहेबाच्या सहीच्या शेजारी छोटे छोटे दोन चार कोंबडे असल्याशिवाय साहेबाला सही करायला comfortable वाटतच नाही. याठिकाणी साहेबांची ती सही आणि बाकीच्यांचा तो कोंबडा ही धारणा पक्की आहे....
बाकीच्यांचे कोंबडे साहेबांच्या शिक्क्याच्या शेजारी गर्दीत, दाटीवाटीत, वाकडेतिकडे उभे असतात आणि साहेबांचा कोंबडा ऐटीत मोरासारखा शिक्यावर बसलेला असतो. साहेबाला खालच्या कोंबड्यावर कितीही विश्वास असला तरी वेळ आल्यावर खालचे कोंबडे नेमके कुणाचे हे cocktail ( cocktail शब्दाचा उगम इथंच असावा!!)समजतच नाही आणि ऐटीत बसलेल्या साहेबाच्या कोंबड्यामुळे साहेबांचा कार्यक्रम होतो. पण गतिमान प्रशासनात असल्या तुश्च विचारांना थारा नाहीच....त्यात एखादे प्रकरण जरा अवघड दिसलं की साहेबाच्या खालचे एक तर कोंबडा हानीत नाहीत आणि हाणला तर त्याची size पार सेंटीमीटर वरून मिलीमीटर वर आणतेत.....पण साहेबाच्या कोंबड्याला लपायची सोय नाहीच.....
कालांतराने अनुभवातून(कोंबडे हाणण्याच्या) साहेबांचं confidence वाढत जातो आणि तो बाजूला कोंबडे आहेत की नाही ते पण बघत नाही.....मग साहेब खऱ्या अर्थाने गतिमान प्रशासनाचा जनक होतो.. साहेबाचा table कधी पण मोकळाच, कर्मचारी कागद घेऊन येतो की लगेच साहेब पण शिक्का दिसला की हान कोंबडा....... ह्या गतिमानतेमुळे साहेबाच्या खालची मंडळी जॅम खुश असते. साहेबांनी सही करताना लै बारीक पाहिलं की ते कुणालाच आवडत नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी सुद्धा साहेब पटापट कोंबडे हाणतो.
....ह्या गतिमान प्रशासनाच्या राड्यात साहेबाच्या 'सहीचा' कधी कोंबडा होतो ते कळतच नाही.... आणि चुकून गटारी आली तर कोंबडा मात्र साहेबाचाच कापला जातो....
- श्री. गोविंद खामकर