साहेबाचा दौरा
साहेबाला शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे दौरे ,तपासण्या, पाहणी वगैरे नियमानुसार कराव्या लागतात. हे नियम किमान दोन दशकापूर्वीचे असतात , तेंव्हाच प्रशासनाच स्वरूप आणि आजच प्रशासनाच स्वरूप यात जमीन अस्मानाचा फरक आहे पण शासनाचे धोरण नक्की आहे, तुम्ही नियम मोडले तरी चालतील पण आम्ही नियम बदलणार नाही!!!(यामुळेच नियम मोडण्यासाठीच असतात ही धारणा पक्की होत जाते!!). याबाबतीतील एक उदाहरण द्यायच झालं तर तालुकास्तरावरील एखाद्या अधिकाऱ्याने वर्षभरात गावात जाऊन 60- 90 मुक्काम केले पाहिजे असा शासन निर्णय उपलब्ध आहे!! हे जर नियमप्रिय जनतेला समजलं तर एकतर आपल्यातल्या एका पण साहेबांचं लग्न होणार नाही आणि साहेब जर नियमप्रिय असेल तर एका पण साहेबांचं लग्न टिकणार नाही!!!. आजच्या प्रशासनाच स्वरूप म्हणजे साहेब मूळ काम सोडून इतर आनुषंगिक कामानेच बेजार होतो.. सगळ्यात मोठी शोकांतिका तर ही आहे की साहेब दिवसभर प्रोटोकॉल, फोन, तक्रारी, मीटिंग, VC , उपोषण, आंदोलन आणि इतर बारा भानगडी दिवसभर करतो त्याचा कधीच आढावा होत नाही किंबहुना हे विषय कधी agenda वरच नसतात. हे काहीही असलं तरी साहेबाने एवढे एवढे दौरे केलेच पाहिजे, एवढ्या भेटी दिल्याच पाहिजे, एवढ्या तपासण्या केल्याचं पाहिजे हा अट्टाहास असतोच.
मग साहेब कधी कधी ज्यादिवशी ऑफिसला काहीच विशेष उद्योग नाही अथवा एखादी अशी भानगड आहे ज्यामुळे साहेबाला ऑफिसला जाऊ वाटत नाही त्यादिवशी साहेब दौऱ्यावर निघतो!
साहेब जेंव्हा नवीन पोस्टिंग ला जॉईन होतो तेंव्हा साहेबाच्या दौऱ्याच प्रमाण जरा जास्त असतंय मात्र जसाजसा साहेब त्या पोस्टिंग च्या ठिकाणी जुना होत जातो तसतस दौऱ्यांची संख्या कमी कमी होत जाते. साहेब फिल्ड वरील कर्मचाऱ्यांच्या ऑफिसला सुरुवातीच्या काळात Surprise भेटी देण्याचा प्रयत्न करतो मात्र तिथले कर्मचारी शक्यतो जागेवर सापडत नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्याला surprise करण्याच्या नादात साहेब स्वतःच surprise होतो!! मग साहेब चिडचिड करणार, त्या कर्मचाऱ्याला दम देणे, नोटीस काढणे वगैरे वगैरे( अर्थात पुढे काहीच होत नाही!!). साहेब असल्या प्रकरणातून धडा घेऊन संबंधित कर्मचारी जागेवर आहे का हे पाहूनच दौऱ्यावर निघतो म्हणजे कोणीच surprise व्हायला नको! साहेबाला सकाळी दौऱ्यावर जाणे थोडे सोयीचे असते कारण हे खालचे कर्मचारी जागेवर सापडण्याची शक्यता जरा जास्त असते. कारण दुपारनंतर ही खालची मंडळी काहीच कारण नसताना साहेबाच्या ऑफिसच्या अवतीभवती पिंगा घालत बसलेली असतात. साहेबाने त्यांना दुपारी कॉल केला ते कर्मचारी म्हणणार साहेब मी इथंच आहे ,आलो दोन मिनिटात केबिनला!! त्यामुळे दुपारी दौऱ्याला जाण्याच सुख साहेबाला जास्त मिळत नाही. जसा जसा साहेबाचा त्या पोस्टिंग च्या परिसरातील अभ्यास वाढत जातो तसा साहेबाला अंदाज यायला लागतो की नेमकी कोणती गावे तक्रारीची, कटकटीची, भानगडीची आहेत, कोणती गाव भाऊ दादाची आहेत, कोणती गावं संवेदनशील आहेत वगैरे वगैरे.. अशी गावे मग साहेबाच्या दौऱ्याच्या गावाच्या यादीतून हळूहळू गायब होयला लागतात!! म्हणजे विषय पार इथपर्यंत जातो की साहेब तसल्या भानगडीच्या गावात गाडीसुद्धा थांबवत नाही!!साहेबाच्या त्या ठिकाणच्या पोस्टिंगच्या काळातील शेवटच्या टप्प्यात तर साधारणपणे तीस टक्केच गावे भेट देण्याच्या criteria मध्ये शिल्लक राहतात तर काही गावं पूर्ण पोस्टिंगच्या कालावधीत untouched राहतात!
एकदाचा साहेबाच्या दौऱ्याला मुहूर्त लागतो. साहेब त्या गावात पोहचतो. साहेबाचा फिल्डवरील कर्मचारी साहेबाची 'आतुरतेने' वाट पाहत असतो(काही काही कर्मचारी आधी कल्पना देऊनसुद्धा साहेबाच्या नंतर 'साहेबासारखे' येतात!). साहेब त्या गावात पहिल्यांदाच जात असेल तर हारतूऱ्याच नाटक पण होत. मग तो कर्मचारी साहेबाला इकडची तिकडची माहिती सांगतो(साहजिकच माहिती मोघमच!). कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक आणि अंतिम हेतू एवढाच असतो की साहेबाने आपल्याला रेकॉर्ड दाखवायला लावू नये! त्यासाठी तो बरेच प्रयत्न करतो पण साहेबाला पण थोडंफार रेकॉर्ड पाहिल्याशिवाय दौरा केल्यासारखं वाटत नाही. मग साहेब त्याला विचारणार अमुक अमुक रेकॉर्ड दाखवा..मग कर्मचारी सांगणार ते record online करायला दिलंय.... मग साहेब त्याला दुसरं record दाखवायला सांगणार ...मग कर्मचारी सांगणार ते काल पूर्ण करण्यासाठी घरी नेलंय.... मग सांगणार बाकीच आहे पण आजच नेमकी(नेमकी आजच?) कपाटाची चावी घरी राहिली... थोडा वेळ ही लपाछपी संपल्यावर साहेब वैतागून म्हणतो तुझ्याकड आत्ता जे रेकॉर्ड आहे ते दाखव.. मग कर्मचारी काहीतरी दाखवतो जे गेल्या दोनचार महिन्याच अपूर्णच असतंय!! मग साहेब म्हणणार तुमचं कामावर लक्ष नाही वगैरे वगैरे (पण साहेब त्याच्यावर कारवाई करणार नाहीच!). सर्वात महत्वाची बाब म्हणजे साहेब त्या कर्मचाऱ्यांच्या मागे असलेल्या आनुषंगिक भानगडीचा आढावा न घेता मूळ कामाचा आढावा घेतो(पण साहेबाला त्याच्या साहेबाने असल्या मूळ कामाचा आढावा घेतलेला आवडत नाही!). मग साहेब visit book मध्ये काहीतरी लिहून (सगळीकडे साहेब हेच लिहितो!) कोंबडा हाणून टाकतो. मग कर्मचारी साहेबाला जेवण वगैरे करून जाण्याची विनंती करतो.जुने साहेब सांगतात जुन्या काळात साहेब जेंव्हा दौऱ्याला जायचे तेंव्हा ते शंभर टक्के दौऱ्याला गेल्यावर तिकडून जेवण करूनच यायचे. त्यावेळी तिथला कर्मचारी आधी दोन दिवसपासूनच तयारीला लागून कोंबड्या शोधून ठेवणे, त्या बनवायची व्यवस्था करणे आणि इतर आनुषंगिक बाबी करायचा. त्या काळातल्या साहेबांनी एवढा कहर केला होता की कोंबड्याची प्रजाती जर नष्ट झाली तर यांच्यामुळेच होईल अशी परिस्थिती तयार झाली होती!! आता परिस्थिती एवढी बदलली की त्या काळचे साहेब 'कोंबड्या' हानायचे आणि आजचे साहेब फक्त 'कोंबडे' हानतेत.
महत्वाचं म्हणजे त्यावेळचे साहेब मूळ काम करायचे कारण आनुषंगिक बाराभानगडी जास्त नव्हत्या त्यामुळे साहेबांच्या तब्येती पण बऱ्या होत्या. आजचे साहेब दौऱ्याला गेले की सोबत छान छान नटूला नटूला डब्बा घेऊन जाऊन चिमणीसारखं खातात. साहेबाचा आकार जसा वाढत जातो तसा डब्याचा आकार बारीक होत जातो हे समीकरण ठरलेलं! मात्र काही साहेब दौऱ्याला गेल्यावर तिकडे जेवण करतातही पण पूर्वीप्रमाणे त्या संबंधित गावात नाही. एक तर गावात आता तसलं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे लोक शिल्लक नाही राहिले म्हणा किंवा आपले कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यामुळे तेवढी आपुलकी राहिली नाही म्हणा पण हा बदल झालाच! त्यामुळे ही नवीन जमात सगळी हॉटेलप्रेमी! आजकाल तर साहेबाला हॉटेल मध्ये त्याला लोक पाहतील म्हणून तिथं पण जेवू वाटत नाही( लोकांनी पाहिलं तर नेमका problem काय होतो हे अनाकलनीय आहे).
अशा प्रकारे दौरा संपून साहेब परतीच्या प्रवासाला निघतो. या दौऱ्यादरम्यान ऑफिसवरून बरेच फोन आलेले असतात, वरिष्ठांनी काही माहिती urgent मागवलेली असते तर कधी भाऊ दादांची मानस त्यांच्या कामासाठी साहेबाच्या कोंबड्याच्या प्रतीक्षेत ऑफिसला थांबलेली असतात. त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी साहेबाला ऑफिसला जावंच लागत..
पुन्हा पुढच्या वेळी असच एखाद सोयीचं गाव...असाच दौरा.. same pattern.... क्रमशः
©गोविंद खामकर
( टीप: कृपया "साहेब सिरीज" मधील लेखनप्रपंच कोणत्याही साहेबाने आपल्या गृहिणी पत्नीसोबत वाचू नये अथवा त्यांना share करू नये. कारण त्यामध्ये तुम्हाला साहेब म्हणून जी थोडीफार सहानुभूती मिळते ती सुदधा गमावण्याचा प्रचंड धोका आहे. असे काही घडल्यास ही संपूर्ण जबाबदारी वाचकाची असेल, लेखकाची नाही!!!)
🙏🏽🙏🏽🙏🏽 vastav ... Khara doura asach as to...
ReplyDelete