*कनिष्ठ आणि वरिष्ठ तथा खालचे आणि वरचे*
आपल्याला मराठीच्या पुस्तकात एक धडा होता.. आतले आणि बाहेरचे..रेल्वेच्या गर्दी असलेल्या डब्यात आतले प्रवासी शक्यतो बाहेरच्या प्रवाशाला सहजासहजी बाहेरून आतमध्ये येऊ देत नाही त्यामुळे बाहेरचा प्रवासी वैतागलेला असतो, कसाबसा बाहेरचा प्रवासी आत गेला की तो 'आतला' होऊन जातो आणि त्याची मानसिकता आणि भूमिका आतल्यासारखी होते आणि तो बाहेरच्यांची मानसिकता विसरून जातो!!
प्रशासनामध्येसुद्धा असंच असतंय... खालचे आणि वरचे.. प्रशासनामध्येसुद्धा जी पदांची उतरंड असते त्यामध्ये एक behaviour pattern तयार झालेला दिसतो. वास्तविक खालचे आणि वरचे ह्या फार relative टर्म आहेत... प्रत्येक साहेब कुणाच्या तरी वर आणि कुणाच्यातरी खाली असतो पण तरीसुद्धा बऱ्याच साहेबांना मी कोणाच्यातरी वर आहे याचा अभिमान असतोच. किंबहुना काही जण फक्त कोणीतरी खाली असणार म्हणूनच साहेब झालेले असतात!( काही दिवसांनी साहेबाला खालचे आणि वरचे दोन्ही नको नको होतात तो भाग वेगळा!!). खरं तर खालचे आणि वरचे हे दोन्ही एकाच पाण्यातील मासे तरी एकमेकांना 'पाण्यात' पाहतात.
प्रशासनामध्ये जसे जसे खालून वर जाल तशी जबाबदारी कमी होते , जबाबदारीची जाणीव फक्त वाढत जाते! याउलट वरून खाली जाताना जबाबदारी वाढत जाते, जबादारी निश्चित होण्याची शक्यताही वाढत जाते पण बेजबाबदारपणासुद्धा बऱ्यापैकी वाढत जातो.. खरं तर जबाबदारी ही घसरगुंडीसारखी असते.. ती या प्रशासकीय उतरंडीवरून घरंगळत येऊन प्रशासनातील सगळ्यात खालच्या व्यक्तीवर निश्चित होते!! पण प्रशासनात अत्यंत जबाबदार आणि कार्यक्षम अधिकारी तोच असतो जो फार शिताफीने जबाबदारी ढकलतो! त्यामुळे फार तर तो अपयशाचा धनी होऊ शकतो पण कारवाईचा नाही!! जर एखादा critical matter असेल आणि त्यामध्ये राजकारणातील एखादा वजनदार व्यक्ती दुखावला जाणार असेल तर तो विषय विद्युत वेगाने वरून खाली या उतरंडीवरून घरंगळत येतो. तसे निर्णय घ्यायचे अधिकार सर्वानाच असतात पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? ( म्हणजे निर्णय तर घेणार नाही आणि साहेब व्हायची हौस जाणार नाही!!!). मग अशा वेळी सगळ्यात खालचा आत्तापर्यंत बेजबाबदार समजला जाणारा घटक सगळ्या साहेबाना अचानक जबाबदार आणि निर्णायक वाटतो! शेवटी ती भानगड खालच्यांच्याच गळ्यात येते. जेंव्हा अस एखादा जबाबदार अधिकारी अत्यंत जबाबदारीने जबाबदारी एका बेजबाबदार समजल्या जाणाऱ्या घटकाकाकडे जबाबदारीने ढकलतो, हे चित्र पाहण्यासारख असतंय. कधी कधी तर अस वाटत हे ग्रामपंचायत चे कर्मचारी , तलाठ्यांच्या हाताखालचे (candidate), कोतवाल , इतर गावातील निमशासकीय कर्मचारी हेच सरकार चालवतात, बाकीचे फक्त कोंबडे हानीत फिरतात!
वरच्या लोकांना कोणी नोटीस वगैरे जास्त काढत नाही. त्यांना समज देणे, DO letter असलं काही तरी sophisticated तर खालच्याना direct नोटिसा, निलंबन, increment थांबविणे असलं काही तरी धारदार असतंय.. पण वरच्या साहेबांवर कारवाई होत नाही आणि खालचे कर्मचारी कारवाईला घाबरत नाही!! वरच्यांना वाटतं खालचे कामाबद्दल अजिबात गंभीर नाहीत आणि खालच्याना वाटत वरचे फक्त गंभीर आहेत पण काम काहीच करत नाही.. खालच्यांना वाटतं वरचे फक्त ऑफिसात बसून पत्र काढतेत, whatsapp वर mesaage टाकतेत बाकी काहीच काम करत नाही(बऱ्यापैकी तस असतंय सुद्धा!!). वरच्यांना वाटत आपल्याला खालचे म्हणावा तेवढा respect देत नाहीत आणि खालच्यांना वाटत आम्ही तरी कोणाकोणाला respect द्यावा त्यामुळे ते कोणालाच मोजत नाहीत( पण तसं दाखवत नाहीत!!). वरच्या साहेबाला खालच्या साहेबांचा आढावा घेण सोपं जातं कारण quantity कमी असते आणि quality पन जरा बरी असते( तशी quality प्रशासनात येताना सगळ्या साहेबांची चांगली असते पण एकदा का 'साहेब' झाले, मग अनुभवाने quality घसरत जाते). पण खालच्या साहेबाला त्याच्या खालच्या field वरील कर्मचाऱ्यांचा आढावा घेण म्हणजे challenge च असतंय.. कारण quantity भरपूर आणि quality पण सुमार!! तस वरच्या लोकांचा आढावा तसा sophisticated होतो पण जस जसे खाली जाल तसे तसे आढाव्याचे शब्द अजून धारदार बनत चालतात(या धारदार शब्दांमुळे काही साहेब अडचणीत पण येतात!).
खालच्यांना वाटत आम्ही ground लेवल ला काम करतो, आम्हाला कोणी समजून घेत नाही, practically काम करताना खूप अडचणी असतात वगैरे वगैरे पण वरच्या साहेबाने पण खालच्याना जरा जास्त समजून घेतलं की ते कामच करत नाही आणि वरच्याला अडचणीत आणतात!! कधीकधी खालचे कर्मचारी वरच्या साहेबाला मार्गदर्शन मागतात पण ते वरच्या साहेबाला अजिबात आवडत नाही! मग वरचा साहेब खालच्यांना नियमानुसार कार्यवाही करण्याचा सल्ला देतो. आता खालच्याना एवढे नियम एवढे समजत असते तर ते अधिकारी नसते का झाले?(साहेब नाही बरं का, अधिकारी म्हंटलो!!). पण असो...वरच्या साहेबाला खरं तर कामापेक्षा टेंशन घेण्याचा पगार मिळतो. खालचा कर्मचारी मात्र टेंशन पण घेत नाही आणि कामही करत नाही असा साहेबांचा समज असतो. खालचे लोक टेन्शनच घेत नाही हे साहेबांचं खरं टेंशन असतंय!! खालच्या सगळ्यांना टेंशन मध्ये ठेऊन स्वतः निवांत राहणारा साहेब खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणला पाहिजे! आणि काहीच टेंशन न घेता काहीच काम न करणारा कर्मचारी सुद्धा यशस्वीच म्हणला पाहिजे( पण वरचा साहेब आणि खालचा कर्मचारी दोघे यशस्वी झाले तर प्रशासनाच वाटोळं अटळ आहे!!). तसा रजा हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा.. पण वरच्या साहेबाला कोण रजा देत नाही आणि खालचे कर्मचारी तर रजा मागण्याच्या भानगडीत पण पडत नाही, direct गायब!!( त्यामुळे दोघांच्या पण खात्यावर 300 रजा कायम शिल्लक!).
खालच्या कर्मचार्यांच्या संघटना चांगल्याच जोरदार असतात.. यांची शासनस्तरावर चांगलीच चलती असते. यांचे आंदोलन पण खतरनाक!! हे एकदा पेटले तर मग '*** आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा' , '.....घेतल्याशिवाय राहणार नाही..' असली तुफान घोषणाबाजी करतात. याउलट साहेबांची संघटना म्हणजे एकदम मूळमुळीत!! एक तर यांनी आंदोलन पुकारलेले निम्म्या साहेबांना आंदोलन संपल्यावर समजतंय! त्यात आंदोलन म्हणजे काळ्या, लाल फिती असला timepass. यांच्या आंदोलनाकडे शासनाने नुसतं डोकून पाहिलं तर याना वाटतं शासन आपल्या मागण्या मान्य करणार आणि आंदोलन स्थगित होत! पण संघटनेच्या नावाखाली मोकार फिरणारे खालच्यामध्ये आणि वरच्यामध्ये दोन्हीकडे आढळतात.
एकंदरीत तात्पर्य अस की वरच्यांना वाटत खालचे काहीच करत नाही, खालच्यांना वाटत वरचे काहीच करत नाहीत, दोघांना वाटत सगळं आम्हीच करतो आणि जनतेला वाटत कोणीच काही करत नाही आणि सरकार म्हणत आमच्या काळात जेवढ काम झालं तेवढं कोणत्याच काळात झालं नाही!!!!! ...क्रमशः
© गोविंद खामकर
(सदरील लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने व सर्व अधिकारी ,कर्मचारी, संघटना यांच्याशी संपूर्ण आदर बाळगून लिहिला आहे तसेच हे लिखाण अत्यंत मर्यादित व अपवादात्मक अनुभवावर आधारित आहे)
प्रशासनातील वास्तव मोजक्या आणि विनोदशैलीत रेखाटले आहे..लेखातील आवडलेले वाक्य "खरं तर खालचे आणि वरचे हे दोन्ही एकाच पाण्यातील मासे तरी एकमेकांना 'पाण्यात' पाहतात."😊
ReplyDelete