आज काल प्रशासकीय कामकाज करताना साहेबाच्या मागे किती कामे असतात ते तर आपण पाहतच आहोत(आणि साहेब त्यातली किती करतो ते पण!). पण एवढ्यावर साहेबाला सोडील ते शासन कुठलं.. साहेब वर्षभर राबता राबता ज्या विविध योजना राबवतो त्याच मूल्यमापन अथवा फलश्रुती तपासण्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळ्या कमिटी फिल्डवर भेटी देत असतात. एक तर शंभर रुपयांची योजना राबवताना ज्या दोनशे अटींचे पालन करावे लागते, त्यामध्ये साहेब आणि यंत्रणा पूर्ण बेजार होते, तरीसुद्धा कामात काहीतरी चुका राहून जातातच....
असंच एखादं पत्र येऊन पडत, कमिटी येणार(सहाजिकच हे पत्र whatsapp वरच!!), साहेबाच्या दृष्टीने कमिटी म्हणजे घरच झालं थोडं अन... पण असो. यंत्रणा कामाला लागते(म्हणजे यापूर्वी अगदीच काम करत नव्हती अस नाही!). तसे कमिटी हा प्रकार नेहमीचाच असल्याने साहेब आणि त्याची यंत्रणा या कामात सराईत(सराईत शब्द जरा जड वाटेल पण राहुद्या आता!) झालेले असतात. कमिटी direct राज्य सरकारला अथवा विभागाला reporting करणार आहे असलं काहीतरी वरचे साहेब सांगत असतात, पण हे नेहमीचंच असल्याने साहेब त्याच जास्त tention घेत नाही . कमिटी येणार म्हणलं तर सगळ्यात आधी साहेबाच्या डोक्यात काय येत असेल तर यावेळी कमिटीचे 'नियोजन' कोणाच्या गळ्यात मारायचं! मग मागच्या वेळी हे नियोजन कोणी केलं होतं किंवा हे करण्यास कोण 'सक्षम' आहे या बाबींचा अभ्यास करून साहेब कोणाच्या तरी गळ्यात हे 'नियोजन' मारून टाकतो!! काही कर्मचारी नियोजन म्हणलं की दूरदूर पळतात, असले कर्मचारी साहेबाला अजिबात आवडत नाहीत. किंबहुना असले कर्मचारी साहेबाच्या 'चांगल्या' कर्मचाऱ्याच्या व्याख्येत बसतच नाही! कमिटीच सगळं 'नियोजन' व्यवस्थित करा असा निरोप वरचा साहेब आवर्जून देऊन मोकळा होतो. या नियोजनाला विशेष अशी तरतूद नसतेच.वरच्या साहेबाला विचारलं तर ते सांगणार ते तुमच्या 'लेव्हल' ला करून घ्या... एवढ्या वर्षात हे 'लेव्हल' नावाच लेखशीर्ष कुठंच सापडलं नाही, तरी पण होऊन जातं सगळं! (आता हे कसं होतं याची चर्चा इथं नकोच!). जे साहेब प्रशासनात नवीन नवीन आलेले असतात त्यांना हे'नियोजन' लवकर कळत नाही, ते वरच्या साहेबाला अजून खोदूखोदू विचारतात, मग वरच्या साहेबाची पण अडचण होते!! मग वरचा साहेब थेट खालच्या साहेबाच्या खालच्या कर्मचाऱ्याला संपर्क करून योग्य ते 'नियोजन' करण्यास सांगतो.. त्यामुळे नवीनच प्रशासनात आलेल्या साहेबाला कमिटीच प्रकरण जरा जडच जात कारण साहेबाला प्रशिक्षण संस्थेत शिकवलेले तत्वज्ञान आणि हे कमिटीच प्रकरण यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. त्यात वरचा साहेबच जर प्रशासनात नवीन तथा interview mode मधून बाहेर आलेला नसेल तर तो खालच्या साहेबांकडे आलेल्या कमिटीच्या भानगडीत अजिबात पडत नाही, तसेच खालचा साहेब हे सगळं कसं manage करतो हे पण त्याला विचारत नाही( हे पारदर्शक प्रशासनाच्या तत्वात कसं बसत ते वरच्या साहेबलाच माहीत). कमिटी नेमक्या कोणत्या गावांना भेट देणार ते शक्यतो आधीच ठरलेल असतंय.. गावातील लोक कसे आहेत, गावातील कर्मचारी कसे आहेत, गावातील कामाचा दर्जा, गावातल्या भानगडी, तक्रारकर्ते, राजकीय गटतट , 'सहकार्याची भावना' इत्यादी parameter पाहून गावे final केलेली असतात... मग कोणती कमिटी आली की त्याच गावात!!! दुसऱ्या गावांना संधीच(की शिक्षा?) नाही! अगदी दुष्काळ पाहणीसाठीएखादी कमिटी आली आणि तिला सगळ्या रस्त्याने सगळया गावांमध्ये जरी नुसता फुफाटा आणि कुसळच दिसली तरी पण साहेब रिस्क घेत नाही,त्या कमिटी ला पण नेहमी ठरलेल्याच गावात नेणार!...show fail नाही झाला पाहिजे ही प्रामाणिक भावना!!
एकदाची कमिटी गावात येते.. साहेब आणि यंत्रणा वाटच पाहत असतात (नाईलाजाने पण आतुरतेने).कमिटी आल्याबरोबर गावात जमलेले तथा वैतागलेले लोक त्यांचं स्वागत करतात. याकामी शक्यतो एका शिक्षकाची नेमणूक केलेली असते(तो पण ठरलेलाच). तो शिक्षक कमिटीच स्वागत करण्यापूर्वी थोडी गावातील इकडची तिकडची माहिती सांगतो. मध्ये मध्ये दोन चार शेर ट#2335;ाकतो , त्यातली त्यात 'यु ही पंख होणे से कूच नही होता, हौसलो से उडान होती है!' हे तर famous!(अतिशय संदर्भहीन पण सगळे गप ऐकून घेतात कारण Timepass करणे हा मूळ हेतू). नंतर हार तुरे देऊन फोटो बिटो काढून मग फील्ड visit कडे रवाना... तिथं पण तेच ठरलेले दोन चार 'पोपट' लाभार्थी... काही पण फेकतेत...हे लाभार्थी काय फेकणार हे त्या समितीतील दोन चार टाळके सोडले तर सगळ्यांना पाठ झालेलं असतंय. या गावात साहेबाने राबविलेल्या योजना प्रचंड यशस्वी झालेल्या असतात!(बाकीच्या गावात काय झालं ते साहेबाला निवांत विचारा!). एखाद्या योजनेमुळे तर एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्यच बदललेलं असत...त्याच उत्पन्न एवढं वाढलेल असतंय की कमिटीमधील एखाद्या सदस्याला frustration येतंय , मी शेतकरी असतो तर किती बरं झालं असत! त्यात एखादा कमिटी सदस्य सल्ला देणार की तुम्ही जे पिकवत आहात ते तुम्ही डायरेक्ट एखाद्या मॉल सोबत tie up करून अजून दोन चार पट कमवू शकता(हा सल्ला सगळेच कमिटी वाले देत असतात). साहेब पण मग जणू त्या कमिटी सदस्याने गुरुत्वाकर्षणचा शोध लावल्यासारखा impress झाल्याच दाखवतो(तस हे ऐकून ऐकून साहेबाचे कान पिकलेले असतात).एखादा कमिटीतील सदस्य तर input output च समीकरण सगळ्यांसमोर मांडतो, आपण खर्च कसा कमी करू शकतो याबद्दल माहिती देतो.. सगळे impress झाल्यासारख दाखवतात...एखाद्या योजनेमुळे त्या गावात सुरुवातीला पावसाळ्यात पण पाणी नसायचं आता उन्हाळ्यात पण फुल्ल पानी...सगळे impress... सगळीकडे असंच.. नुसती फेकफेकी... कमिटी शासकीय घर मिळालेल्या लाभार्थी ला विचारणार नवीन घरात गेल्यापासून आपला अनुभव काय... मग लाभार्थी म्हणणार fresh वाटतंय, बरं वाटतंय, पोराचं लग्न होत नव्हतं आता जुळलंय.. पण कमिटी च एवढ्यावर समाधान होत नाही.. मग लाभार्थी सांगणार पाहिले आम्हाला दररोज साप चावायचे आता कधीकधीच चावतात वगैरे वगैरे....
एखाद्या कमिटी सदस्याला या गावात राबविलेल्या योजना खूपच आवडतात, तो लगेच साहेबाला यावर success story बनवायला सांगतो, साहेब पण नक्की नक्की म्हणून म्हणून होकार दर्शवतो... पण Success story दिली की ते गाव पहायलाअजून कमिट्या येणार हे साहेबाच्या डोक्यात पक्क असल्यामुळे साहेब या भानगडीत पडतच नाही. सगळ्याच साहेबांचा याबाबत awareness वाढल्यामुळे आता शासनाने बऱ्याच योजनांमध्ये suuccess story सुद्धा compulsory सादर करण्यास सांगितले आहे! मग ती success story उत्कृष्ट ठरली तर अजून रिस्क वाढते त्यामुळे ती शक्यतो थातुरमातुर प्रकारची केली जाते...
त्यानंतर कमिटीला परिसरातील एखाद प्रसिद्ध देऊळ त्यांना दाखवायचं. काही कमिटी सदस्य तर फक्त देव देव करायला कमिटीत हिंडतेत का ते पण कळत नाही, कारण ते बाकी कशातच interest दाखवत नाही... देवदर्शनामुळे कमिटीला पण कामात काम झाल्यासारखा वाटत(साहेबाला कामात बिनकामच काम आल्याचं समाधान वाटतं!). एकदा मी कमिटीतील एका सदस्याला म्हटलो की इथल्या देवाच्या पाया पडलं तर घरात भांडण होत नाही, त्याचा दोन तास तिथून पायच निघेना... असो. कमिटी ची इच्छा असो अथवा नसो तिथं आरती वगैरे करायचीच ,timepass जास्तीत जास्त करायचा हे धोरण.
नंतर जेवणाचा कार्यक्रम...त्यासाठी साहेबाची काही यंत्रणा इकडे कार्यरत असते. ही मंडळी या कामात अनुभवी असल्याने सारख ते त्यांच्याच गळ्यात येत..हे काम जर व्यवस्थित झालं तर कमिटी नाराज होण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्या ठिकाणी जे जेवण मिळत तेच त्या परिसरातल best आहे असा कमिटीचा समज तयार केला जातो. मग अशा प्रकारे कमिटीला नमस्कार करून राम राम केला जातो( पुन्हा येऊ नये या अपेक्षेने!) . मग साहेबाला त्या गावातील लोक विनंती करतात साहेब पुढच्या वेळेस दुसरं गाव बघा, त्या गावात काम करणारे कर्मचारी तर पार वैतागून गेलेले असतात , ते पण सांगतात साहेब दुसरं गाव घ्या पुढच्या वेळेस...!! साहेब नुसताच हो हो म्हणतो .....मग थोडे दिवस जातात... मग दुसरी कमिटी.. तेच गाव.. तेच लाभार्थी... तेच देऊळ..
- गोविंद खामकर