नुसतं कार्यशाळा शब्द ऐकला तरी कोणत्यापण साहेबाला गुदगुल्या झाल्यासारख वाटत! ह्या शब्दातच जादू आहे...जर पत्रामध्ये चुकून 'कार्यशाळा आणि आढावा बैठक ' असा शब्दप्रयोग आला तरी साहेबाला करमत नाही!! फक्त कार्यशाळा पाहिजे, आढावा नकोच(साहेब मीटिंग मध्ये आढावा कसा देतो ते माहितीच आहे!).कार्यशाळेच्या नावाखाली आढावा घेणार्यांना तर साहेब कम्युनिटी कधीच माफ करणार नाही...!! कार्यशाळा घेण्याचा शासनाचा उद्देश एखादे अभियान समजावून सांगणे, त्या राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविणे इत्यादी असला तरी साहेबाचा प्राथमिक आणि अंतिम हेतू दिवसभराच्या ऑफिसच्या कटकटीतून मुक्त होण्याचा असतो.. नुसतं कार्यशाळेच पत्र अथवा निरोप आला तरी साहेबाचे दोन तीन दिवस खूपच आनंदात जातात.. काही काही साहेब कार्यशाळेच्या आधल्या दिवशीच कार्यशाळेच्या ठिकाणी सर्व "नियोजनाच्या" तयारीने पोहचलेले असतात. कार्यशाळेला जाताना साहेब कोणतीच माहिती सोबत नेत नाही, फार तर साहेबासारखं दिसावं म्हणून एखादी डायरी(न उघडण्याच्या अटीवर) सोबत घेतो. कार्यशाळा घेणारा पण शेवटी साहेबच असल्याने त्याला हे खालच्या साहेबाचे गुण माहीत असतात, त्यामुळे तिथं एखादा पेन( शक्यतो 5 रुपयांच्या आतील), एखादं फोल्डर , माहितीपुस्तिका(साहेब असलं कधी वाचणार!) असलं तिथं गेल्यागेल्या हातात ठेवल जात. कार्यशाळेला पोहचल्यानंतर साहेब त्याच्या इतर साहेबमित्रांना भेटतो, चहापाणी करता करता कार्यशाळेचा मूळ विषय सोडून इतर सर्व विषयावर चर्चा करतो..मग कार्यशाळेच्या हॉल मध्ये प्रवेश केल्यावर साहेब त्याचे दोन चार जोडीदार पाहून शक्य तेवढं stage पासून लांब बसण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपापसात मनमोकळेपणाने चर्चा करता येईल. हॉलमध्ये सजवलेलं स्टेज, background ला सुरू असलेले instrumental music, मोठा प्रोजेक्टर इत्यादी पाहून साहेबाला अजून प्रसन्न वाटतं. नंतर मोठे मोठे 2-4 साहेब येतात, त्यांचा त्यांच्यातली त्यांच्यातच एकमेकांचा बुके देऊन सत्कार केला जातो, साहेब पण फुल energy ने टाळ्या कुटतो. स्वागत आणि प्रस्ताविक शक्यतो एखाद्या अशासकीय निवेदकाकडे असते, शासकीय साहेब हे काम करण्यासारखे कालांतराने राहत नाहीत! नंतर कार्यशाळेच्या मूळ विषयाकडे वळताना प्रोजेक्टरवर presentation द्वारे विषय समजून सांगितला जातो,पण साहेबाचा काही समजून घेण्याचा मुडच नसतोच!! (हे presentation सुद्धा बहुदा त्या अभियानासाठी नेमलेला कंत्राटी staff करत असतो. असंही प्रशासनात हे कंत्राटीच करत आहेत, बाकी शिपायापासून तर साहेबापर्यंत सगळेच साहेब !!). त्यातली त्यात जर presentation सुरू असताना चुकून light गेली, mike बंद झाला, जो presentation करतोय त्याला एखादा फोन आला वगैरे असं काही घडलं तर साहेबाची भावमुद्रा वरकरणी गंभीर दिसत असली तरी आतून मात्र सुखद लाडू फुटत असतात... Presentation मध्ये काही साहेबांनी योजना राबविताना ज्या success story तयार झालेल्या असतात त्या सर्वांना दाखवल्या जातात, त्याच presentation एवढं छान केलेलं असतंय की प्रत्यक्ष ते काम केलेला साहेब पण confuse होतो की हे नक्की मीच केलंय का.!! नंतर हे अभियान राबविताना आपल्याला कोणत्या activities करायच्या आहेत, record कसं ठेवावं लागेल, कोणाची काय जबाबदारी असेल , data entry कशी करावी लागेल, ते करताना काय काळजी घ्यायची , कोणत्या अडचणी येऊ शकतात या सर्व बाबींवर चर्चा केली जाते पण हे सगळं साहेबाच्या डोक्यावरून जात असतंय! साहेब विचार करतो हे मला का सांगत आहेत, माझ्या खालच्या कर्मचाऱ्यांना यांनी training द्यायला पाहिजे, सगळं काय साहेबानी बघायचं का? एकंदरीत आतापर्यंत सगळंच डोक्यावरून गेलेलं असतंय, पण साहेबाला त्याच्या खालच्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांवर विश्वास असतो, साहेबाचे कर्मचारी कार्यशाळेला न येतासुद्धा हे नक्की करू शकतात याची साहेबाला खात्री असते. कार्यशाळेमध्ये साहेबाच मन काही लागत नाही, पण सगळं समजल्यासारखं आणि अगदी मन लावून ऐकल्यासारखी acting मात्र करावीच लागते., त्यातली त्यात जर साहेबाची जागा stage पासून जरा जास्तच जवळ असेल तर साहेबाला कार्यशाळा असून पण दिवस वाया गेल्यासारखा वाटतो!त्यातली त्यात जर साहेबाचा साहेब सुद्धा कार्यशाळेला उपस्थित असेल तर साहेबाला अजून जबाबदारपणे ही acting करावी लागते! तसही मधे मधे आत बाहेर येणे जाणे हा timpass चालू असतोच, अधून मधून मोबाइल चाळने चालूच असते. ऑफिसच्या कामासंदर्भात बरेच फोन नेहमीप्रमाणे चालूच असतात पण साहेब कार्यशाळेच्या नावाखाली कोणालाच दाद देत नाही.. जरा वजनदार माणसाचा फोन असला तरी फोन उचलून अगदी हळू आवाजात सांगणार(जरी मोठ्याने बोलणे अथवा बाहेर जाऊन बोलणे शक्य असले तरीही!) मीटिंग मध्ये आहे,आणि फोन कट करून टाकणार. Stage वरचा एखादा साहेब पण कार्यशाळेच्या मुख्य विषयाला हात न घालता(मोठया साहेबाला पण विषय कितपत समजलेला असतो यावर भाष्य नकोच, पण साहेब असल्यामुळं जमून जातंय!) फक्त एवढंच सांगतो की आपण काम खूप करतो पण ते data entry करत नाही , online करत नाही त्यामुळे आपला performance कमी दिसतो, हे वाक्य प्रत्येक कार्यशाळेत ठरलेलंच...या वाक्याला खाली बसलेले सगळे साहेब अशी दाद देतात जणू काही हे सगळं काम 100 टक्के करून बसले फक्त online करायचं राहील!! हे सगळं करता करता साहेबाच्या पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात आणि मार्गदर्शन करणारा काहीतरी न समजणार सांगत सुटलेला असतो. तो मार्गदर्शन करणारा खाली बसून पुन्हा एखादा नवीन माणूस मार्गदर्शन करायला उठला तर मात्र साहेबाची अक्कल जाते...काही हुशार संधीसाधू साहेब Lunch break होण्यापूर्वीच जेवणाला सुरुवात करतात. साहेब पण कार्यशाळेच्या दिवशी dieting वगैरे च्या भानगडीत न पडता जेवणावर तुटून पडतो. जेवणानंतर कार्यशाळेच रूप बघण्यासारखं असतं... निम्मे अर्धे शिस्तप्रिय साहेब जेवण केल्याबरोबर गायब होतात.. उरलेले पण हॉल मध्ये जाऊ का नको, नाही गेलं तर काय होईल, गेलो तर निघता येईल का, खूप वेळ बसावं लागेल का या विचाराने ग्रासलेले असतात. कार्यशाळा घेणारे पण सगळ्यांना बसून घ्या , बसून घ्या , आपण लगेच संपून टाकू अस प्रलोभन देत असतात पण साहेब लोक लवकर दाद देत नाहीत.. एकंदरीत सगळेच ढेपाळलेले असतात.. कसातरी कार्यक्रम सुरू असतो..मग presentation दाखवणारा कसं तरी presentation पळवत पळवत कडेला न्यायचा प्रयत्न करतो.. आता परिस्थिती कोणाच्याच नियंत्रणात राहिलेली नसते. हा अटीतटिचा क्षण साधून कार्यशाळेची सांगता केली जाते!! जर चुकून एखाद्या साहेबाला विचारलं की नेमकं काय शिकवलं कार्यशाळेत, त्याची विकेट गेलीच म्हणून समजा. कार्यशाळा संपल्याबरोबर साहेबाला मुक्त झाल्यासारख वाटत... इथून पुढंचा सगळा 'कार्यक्रम' मात्र ठरल्याप्रमाणे होतो... काही काही कर्तव्यदक्ष साहेब आजचा दिवस 'गेला' या नकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात तर ओरिजनल साहेब आजचा दिवस 'निघाला' या सकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात....पुढच्या कार्यशाळेची वाट पाहत.... क्रमशः
( ' *साहेब* series मधील 'प्रशासनातील कोंबडशाही, शिपाईसाहेब, नवीन साहेब, साहेबाची मीटिंग, मामाच पत्र हरवलं, कार्यशाळा... क्रमशः)
*©* गोविंद खामकर
लय भारी साहेब
ReplyDelete