Friday, November 18, 2022

प्रशासन आणि संघटना

लेख 20 वा : प्रशासन  आणि संघटना

शासनामध्ये संघटनांचे प्रचंड पेव फुटलेले आहे. असा कोणताच संवर्ग  नाही ज्यामध्ये  संघटनेचा शिरकाव झाला नाही.  अगदी पोलिसांना संघटना करता येत  नाही तर त्यांच्या पत्नींची संघटना निर्माण झाल्याचे ऐकिवात आहे.  मुळात संघटनेमध्ये सहभागी  होण्यासाठी काही गृहीतके मनाशी पक्की असणे आवश्यक आहे  अन्यथा आपली सतसतविवेकबुद्धी  जागरूक ठेवून संघटनेमध्ये सामील होणं ही थोडीशी  अवघड बाब आहे...
यातील सर्वात महत्वाचं गृहीतक म्हणजे आमच्या संवर्गावर  शासनाकडून प्रचंड अन्याय होत आहे ही धारणा पक्की असणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही शासनावर प्रचंड उपकार करतो, आमच्याशिवाय शासनाच पानही हालत नाही हा स्वतःशी  गैरसमज पक्का असणं सुद्धा फार गरजेचं  आहे!! शिवाय  लॉजिक   आणि मागण्या यांचा शक्यतो  फार जवळचा संबंध असू नये म्हणजे शासनाकडे एवढं मागितलं पाहिजे की त्यातलं दहा टक्के मान्य झालं तर समाधान वाटलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे मागण्या कधीच संपता कामा नये!! शासनाने देत जावे, संघटनेने मागत जावे, मागतच जावे!!  मुळात संघटना धारदार बनवायची असेल तर संघटनेकडे  सामंजस्यपणा थोडा कमीच असणे फायदेशीर ठरते, किंबहुना सामंजस्यपणा  असला तरी दाखवू नये!!
एकंदरीत प्रशासनातील  संघटनांची संरचना पाहता ती संघटना कोणत्या संवर्गाची आहे यावरून तिचा पॅटर्न  ठरतो. जर ती संघटना सर्वात कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची असेल तर ती खूप organised असते. त्यांच्यामध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्य या पातळीवरचे विविध प्रकारचे  पदाधिकारी,  विधीमंडळाच्या वर यांची अधिवेशने, त्यातील मुद्दे, प्रश्न आणि बरेच काही. शिवाय त्यातील पदाधिकार्यांचा रुबाब पाहून त्यांचे मोठे साहेब सुद्धा अवाक होतात!  बऱ्याचदा  तर या कर्मचाऱ्यांच्या एकाच संवर्गामध्ये दोन चार संघटना असतात!! याचं   कारण अस सांगितलं जातं की त्यांच्यामधील कार्यप्रणाली ,तत्वे, मागण्या  यामध्ये  असलेले मुलुभूत फरक!!   म्हणजे अगदी स्वातंत्रपूर्व काळातील  जहाल गट, मवाळ गट याप्रमाणे !! सांगायची कारणे काहीही असली तरी त्या संवर्गामध्ये असलेली प्रचंड सदस्य संख्या आणि नेतृत्व करण्यासाठी इच्छुक असलेली  गर्दी  यामुळे एकाच संवर्गातील  संघटनांची संख्या बिनकामाची वाढत असते.  यांच्या  संघटनामधील  बरेच कर्मचार्यांनी तर स्वतःला संघटनेसाठी वाहून घेतलेलं असते. यांच्या डोक्यात संघटना सोडून काहीच दिसत  नाही.  स्वतःचे काम सांभाळून संघटनेला वेळ देणारे सुद्धा  असतात , पण काहीजण मूळ काम अजिबातच करत नाही !!!  या संघटनांतील कर्मचाऱ्यांना ते राबवत असलेल्या चार शासकीय योजनांची कमी माहिती असेल पण संघटनांच्या मागण्यांबाबत ते प्रचंड जागरूक असतात. मुळात या कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे नेते सुद्धा चांगले राजकारणी होण्याच्या पात्रतेचे असतात मात्र  संधी न मिळाल्याने चुकून शासकीय नोकरीत आलेले असतात असे माझे मत आहे. 
याच्या अगदी  उलट म्हणजे साहेबांच्या संघटना!! कोणाचाच कोणाला मेळ नाही!! बाकीचे पदाधिकारी तर सोडाच पण त्यांच्या  संघटनेचा अध्यक्ष निम्म्या साहेबाना माहिती नसतो. एकच संघटना असून सुद्धा एवढी बोंब असल्याने यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त संघटना असण्याचा धोका उद्भवत नाही. यांच्या  संघटनेला एखादं निवेदन द्यायचं असेल तर बोटावर मोजण्याइतपात टाळके गोळा होत नाहीत आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे निवेदन द्यायला पार चेंगराचेंगरी!!! 
आंदोलन आणि संघटना यातील नातं अतूट आहे. आंदोलन केल्याशिवाय संघटनेला शासनदरबारी कोणी भाव देत नाही हा सार्वत्रिक समज आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आंदोलने तर डोळे दिपवणारी असतात!! या आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती  असते! भाषणे, घोषणा,आक्रोश यांनी परिसर दुमदुमून जातो. इथं मात्र ते वरिष्ठ वगैरे कोणाचीच भीड बाळगत नाही! एखाद्या त्रयस्थ कष्टकरी  व्यक्तीने जर ही आंदोलने पहिली तर त्याला सुद्धा वाटेल की एवढे अगणित अन्याय सहन करून हे  बिचारे नोकरी करत आहेत, यांच्या मागण्यांसमोर माझं दुःख काहीच नाही, यांचं आधी मिटवा!!!
याउलट साहेबांची आंदोलने म्हणजे अगदीच  मुळमुळीत!! सुरुवातीला मोठ्या थाटात काम बंद करण्याचे निवेदन द्यायचे , नंतर शासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर(साहजिकच चर्चेसाठी हेच शासनाकडे स्वतःहून जाणार!) आणि आश्वासनानंतर  त्यामध्ये अंशतः बदल करून काळ्या फिती लावून आंदोलन, निषेध नोंदविणे इत्यादी थातुरमातुर प्रकार.. ते पण फारतर एखादा दिवस वगैरे!!  ही आंदोलने संपले तरी बऱ्याच साहेबांना अस कुठलं आंदोलन होत याची कल्पनाही नसते. अशी  आंदोलने  सुद्धा साहेबांची आंदोलने म्हणजे जरा sophisticated वाटली पाहिजे याची दक्षता घेतली जाते...
बऱ्याचदा एखादी शासकीय योजना राबवताना शासनाकडून साहेबांवर प्रचंड pressure असतो आणि खालच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असते. वाईट प्रकार म्हणजे साहेबाला वरिष्ठांना ही सांगायची सोय सुद्धा नसते की खालच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. बरं साहेबाने जरी हे  कारण सांगितलं तरी वरचा साहेब त्याला हे प्रकरण तुमच्याच पातळीवर मिटविण्याचा सल्ला देऊन मोकळा होतो!!खालच्या साहेबाला जर संघटनेसोबत व्यवस्थित मेळ ठेवता आला नाही तर त्याचे वरिष्ठ  साहेब संघटनेला कधीच दोष देत नाहीत!!!, उलट साहेबालाच ते हँडल अथवा मॅनेज करणे जमले नाही असे म्हणून साहेबावर खापर फोडून मोकळे होतात. एखादा साहेब यांच्या  संघटनेसोबत डोकं लावायला लागलाच तर हे कर्मचारी बिनधास्त सांगतात हे आमचं आंदोलन वरच्या लेव्हल वरून सुरू आहे, तुम्ही त्यात पडू नका!  ! नंतर शासन या संघटनांशी स्वतःहून चर्चा करणार, मनधरणी करणार, एखादं आश्वासन देणार तेंव्हा कुठं यांचं आंदोलन मागे घेतलं जातं!! या  कर्मचार्यांच्या संघटनांनी फारच लावून धरलं तर मोठ्या मोठ्या साहेबांच्या शासन बदल्या करून टाकत!   कधी कधी साहेब या कर्मचाऱ्यांच्या संघटनांना पार वैतागून जातो! म्हणजे  साहेबाला कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा त्रास वाटतो आणि आपली संघटना मजबूत असायला पाहिजे असंही  वाटतं हा दुटप्पीपणा आहे !!! 
जेंव्हा एखाद मोठं पाहणी पथक, समिती अथवा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ येते तेंव्हा हेच साहेब ज्यांना संघटना अडचणीची वाटते त्यांना संघटना आधार वाटते!! थोडक्यात असं की  खालच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या सहजासहजी कोणी नादाला जात नाही, शासनसुद्धा नाही!!
  या संघटनांच्या बाबतीत बरेच गैरसमज देखील रुढ असतात. त्यापैकी एक म्हणजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळत असतात! खरंच हे असं घडतं का हा संशोधनाचा विषय आहे! दुसरा गैरसमज  म्हणजे संघटनेकडे भरपूर पैसा असतो, जणू काही संघटनेला foreign वरून फंडींग मिळत! पण हे दुःख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाच माहिती असतं. यातील सर्वात मजेशीर बाब अशी की एवढा गलेगट्ट पगार असणारे साहेब संघटनेच्या वर्गणीचा विषय निघाला की काढता पाय घेतात आणि तुलनेने तुटपुंजा पगार असणारे कनिष्ठ कर्मचारी संघटनेची वर्गणी नियमित जमा करतात!! अजून एक गैरसमज असा की आपल्या संघटनेपेक्षा इतर संवर्गाच्या संघटना खूप भारी आहेत!!. हे म्हणजे आपली बायको सोडून शेजाऱ्याच्या बायकोच कौतुक केल्यासारखा प्रकार आहे पण ज्याचं त्याच दुःख ज्याला त्याला माहिती!!!
   संघटनेमध्ये सदस्य असणाऱ्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या मानसिकता असतात. यातील बहुसंख्य वर्ग हा संघटनेवर सदैव टीका करणारा असतो. तसं यांचं संघटनेला विशेष योगदान तर काहीच नसतंय पण कोणतीही चळवळ न करता  नुसती वळवळ!!. याउलट काहींना संघनेकडून प्रचंड अपेक्षा! आपले वैयक्तिक कुटाने ,भानगडी सुद्धा संघटनेने  सोडवल्या पाहिजे अशी भोळी भाबडी आशा ठेऊन जगणारे सुद्धा बरेच अधिकारी, कर्मचारी आहेत. अगदी शेजाऱ्यासोबत झालेली भांडणे सुद्धा संघटनेने मिटवली पाहिजे इथपर्यंत!!  अजून एक प्रकार म्हणजे स्वयंभू साहेब!! संघटनेवर विश्वास म्हणजे अंधश्रद्धा असा समज असणारे! हे साहेब कुठेही व्यक्त होत नाहीत, मत मांडत नाहीत. असले साहेब  त्यांच्या भानगडी त्यांच्याच पातळीवर मिटवायची खात्री बाळगतात! असले साहेब शक्यतो जिथे मेवा तिथेच सेवा या तत्वावर काम करणारे असतात.   अजून एक नव्याने उदयास आलेला प्रकार म्हणजे फक्त whatsapp वर ऍक्टिव्ह साहेब!  यांच्यामुळेच संघटना जिवंत आहे असल्याचा फील येतो.  हे साहेब रिकाम्या वेळात काहीतरी पिल्लू काढून सगळ्यांना त्या विषयावर मत मांडण्यास प्रवृत्त करतात. मग त्यातून एखाद्या नव्या मागणीचा जन्म होतो आणि मग पुन्हा निवेदन!!
खरं  तर संघटना हे insecurity चे अपत्य समजले जाते, मात्र शासकीय नोकरी असलेला सर्वात secured घटक   जेंव्हा स्वतःला insecure समजून  संघटनेमध्ये सहभागी होतो ही बाबच फार मजेशीर आहे. हे संघटनांचे प्रस्थ  एका मर्यादेत ठेवणं आवश्यक आहे आणि शासनाने सुद्धा या संघटनांच्या किती आहारी जायचं ते ठरवलं पाहिजे अन्यथा फिल्डवर   काम करणं प्रचंड जिकिरीचे होईल.   नाहीतर एक दिवस या  सगळ्यांना वैतागून  सामान्य जनताच आंदोलन  करून ही संघटनेची स्कीम कायमची बंद करून टाकील ...

©गोविंद खामकर



Saturday, August 20, 2022

लेख 19 वा: ऑडिट

ऑडिट ही प्रत्येक साहेबाच्या पाचवीला पुजलेली गोष्ट आहे. साहेब  वर्षभर जे काही(कुटाने!)  करतो त्याचा लेखाजोखा ऑडिटच्या माध्यमातून घेतला जातो.  Principles of financial propriety हा परवलीचा शब्द जवळपास सगळ्याच साहेबांना त्यांच्या  परिविक्षाधीन कालावधीत कानावर पडतो, त्यातलं पाहिलं तत्व अस की शासकीय  पैसा हा अशा पद्धतीने खर्च केला पाहिजे जणू काही तो आपल्या स्वतःच्या खिशातील पैसा आहे.. पण काही  साहेब याचा  मतितार्थ लक्षात  न घेता  शब्दशः अर्थ घेतात आणि  अगदी स्वतःच्या खिशातील पैशाप्रमाणे शासनाचे पैसे खर्च करून टाकतात!! !!!  मग ऑडिटरला 'शक' येणारच ना? ऑडिटमध्ये  निघणाऱ्या आक्षेपांना  'शक' म्हणण्याची प्रथा हिंदी भाषेतून असावी असा माझा समज आहे, तो गैरसमजही असू शकतो!
एकदा ऑडिटची टिम कार्यालयात आली की मग थोड्याशा प्राथमिक चर्चेचा सोपस्कार!! त्यात एखादा ऑडिटर 'जे काम करतात त्यांच्याच चुका होतात' असला  नेहमीचाच  डायलॉग मारून मोकळा होतो!! आता याचा अर्थ  नेमका काय काढायचा? ..काम करायचं सोडायचं की चुका करायचं सोडायचं  की दोन्ही .??
  मग ऑडिट सुरू होत.. रेकॉर्ड ची शोधाशोध, कागदांची जुळवाजुळव , जे कागदच अस्तित्वात नाहीत ते तयार करणे, काही कागद आहेत पण साहेबाचे कोंबडे हानायचे राहिले आहेत तिथे साहेबांचे कोंबडे पटापट मारून घेणे वगैरे असले उद्योग सुरू होतात. साहेब पण अशावेळी जास्त डोकं न लावता( नेहमीप्रमाणे!) कर्मचाऱ्याने आणलेल्या कागदावर कोंबडा हाणत असतो. या काळात  कर्मचारी असं काय काय साहेबाच्या सहिसाठी घेऊन येतात की साहेबाला प्रश्न पडतो आपल्याला एवढ्या दिवस यांनी हे का दाखवलं नाही.. पण आता साहेबसुद्धा  खिंडीत अडकलेला असतो त्यामुळे तो कोंबडे हाणून टाकतो. काही काही कर्मचार्यांनी काहीच रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले नसल्याने ते ऑडिटरसोबत लपाछपीचा खेळ सुरू करतात!! 
    ऑडिट टीम च्या  गरजेनुरूप  त्यांच्या राहण्याची आणि इतर 'अनुषंगिक' बाबींची व्यवस्था हा देखील प्रथेचा भाग आहे. याकामी साहेबाच्या ऑफिसचे एक दोन कर्मचारी तैनात केलेले असतात. हे तैनात केलेले कर्मचारी शक्यतो एवढ्याच कामात तरबेज असतात त्यामुळे ही जबाबदारी वेळोवेळी त्यांच्याकडेच येते.
मग एक दोन दिवसात या टीमच आणि साहेबाच्या ऑफिसच 'सूत' जमलं की मग जास्त अडचण येत नाही. मग एकमेकांमध्ये 'सहकार्या'ची भावना वृद्धिंगत होऊ लागते. 'सहकार्याशिवाय' यशस्वी ऑडिट जवळजवळ  अशक्य आहे..खरं तर 'सहकार्य' हा एवढा 'बहुआयामी' शब्द असेल आणि त्याला इतके कंगोरे असतील याचा प्रत्यय प्रशासनात आल्यावरच येतो. म्हणजे अमुक अमुक ऑडिटरच आम्हाला नेहमीच खूप सहकार्य असत यातून काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "हे ऑडिटर अथवा साहेब खूप चांगले आहेत"  हे वाक्यच मुळी फार अद्भुत आहे!!  एक मात्र नक्की की या वाक्यातून साहेबाचा खरा स्वभाव नक्कीच कळत नाही.  ' चांगला साहेब' या विशेषणातून मला आतापर्यंतच्या शासकीय सेवेतून समजलेला अर्थ असा आहे की  साहेब मध्यम मार्गाने चालणारा माणूस!  हे 'चांगले' साहेब शक्यतो कोणालाच नाराज करत नाही.!! बऱ्यापैकी customized!!  जर आपल्याविषयी  एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला बोलताना आपले सहकारी अथवा कर्मचारी जेंव्हा आपला उल्लेख  'चांगला साहेब'  असा करतात तेंव्हा आपण जास्त हुरळून न जाता आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करण्यास आणि आत्मपरीक्षण करण्यास  प्रचंड वाव आहे असा साधा, सोपा, सरळ अर्थ  घेण्यास हरकत नाही.  म्हणजे एक चांगला साहेब आणि एक चांगला ऑडिटर ही जोडगोळी एकत्र आली तर काहीही करू शकते!!(इथे सकारात्मक अर्थ घ्यायला हरकत नाही)
...पण देशाचं खरं वाटोळं या एकमेकांबद्दलच्या सहकार्याच्या भावनेनेच होते  पण बोलायची सोय आहे का?  म्हणजे  'एकमेका साहाय्य करू, करूया वाटोळं सकळ जणांचे'...या उक्तीप्रमाणेच हा सहकार्याचा कार्यक्रम चालू असतो...आणि मग काय ..तेच तेच आवडते परिच्छेद...सालाबादप्रमाणे ..ज्याचं रेकॉर्ड सापडत नाही किंवा समाधानकारक नाही त्याचा आक्षेप न घेणे, जे रेकॉर्ड सापडतय त्यालाच 'रेकॉर्ड' आढळून आले नाही असा आक्षेप लावणे.. एक दोन आक्षेप वगळता सगळं कॉपी पेस्ट!!! 
हाफ मार्जिन, लेखी सूचना वगैरे हे असले सोपस्कार फक्त यशदापुरतेच मर्यादित असतात. म्हणजे आक्षेप  घेताना सुद्धा  एकमेकांचं कमालीचं   understanding असल्याने साधारणपणे जे परिच्छेद सहज वगळता येतील असेच घेतलेले असतात त्यामुळे memo reading वगैरे बहुदा  औपचारिकता म्हणूण पार पाडल्या जातात..
 बरं एवढंच सहकार्याची भावना असेल तर एकही आक्षेप घेतला नाही तर चालणार नाही का? पण यामुळे ऑडिटरच्या च्या वरचा साहेब नाराज होऊ शकतो... आपल्या खालची टीम 'कार्यक्षम' नाही असा 'चुकीचा' मेसेज  वरच्या साहेबाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या रामाच्या देशात एवढ्या पारदर्शक कारभाराच 'रामराज्य' अस्तित्वात असेल यावर ऑडिटरच्या वरचा साहेब विश्वास तरी कसा ठेवणार? बरं असेल  एखादं रामराज्य तर त्यात वरच्या साहेबाला काय 'राम' आहे?  . त्यामुळे  एवढे एवढे आक्षेप आलेच पाहिजे  असा अलिखित नियमच असतो..
'चांगल्या' साहेबाला ऑडिट मध्ये विशेष अडचण येत नाही(कारणे आपणच शोधा!!).  तसेच 
बिनधास्त बॅटिंग करणाऱ्या साहेबांमध्ये 'सहकार्याची' भावना जास्त असल्याने त्यांनाही  शक्यतो  ऑडिटमध्ये जास्त अडचण येतंच नाही..  मात्र   ऑडिटमध्ये  सगळ्यात जास्त अडचणी 'तत्वनिष्ठ' साहेबाला येतात हा प्रशासनातील(वाईट)  नियम आहे. तत्वनिष्ठ साहेबाकडून 'सहकार्याची' अपेक्षा नसल्याने त्याला  विनाकारण सहकार्य कसे प्राप्त होईल?  एक तर  तत्वनिष्ठ साहेबाला सहजासहजी 'चांगल्या' साहेबाचा दर्जा मिळत नाही(चांगले साहेब 'तत्त्वनिष्ठ ' नसतात असा निष्कर्ष काढण्याची आवश्यकता  नाही).  तत्वनिष्ठ साहेबाच्या  जास्त  बातम्या  देखील वृत्तपत्रात येत नाहीत( ज्यांच्या बातम्या सारख्या वृत्तपत्रात येत असतात ते तत्वनिष्ठ नसतात असला आगाऊ अर्थ आपण काढणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे!) खरं तर तत्वनिष्ठ साहेब हा  विद्यमान व्यवस्थेमध्ये  एक प्रशासकीय , राजकीय आणि काही  प्रमाणात सामाजिक अडचण ठरतोय का यावर विचारमंथन व्हायला पाहिजे, नाहीतर ही दुर्मिळ जमात नष्ट होऊ शकते!!(ही जमात दुर्मिळ आहे किंवा कसे याची आकडेवारी उपलब्ध नाही!)..
एकदाच ऑडिट होऊन जात!! ऑडिट नोट प्राप्त होते..बऱ्यापैकी आक्षेप  'ठरल्याप्रमाणे' असतात, काही आक्षेप जस 'ठरलं' होत त्यापेक्षा वेगळेच असतात, एकंदरीत संमिश्र चित्र!! ही ऑडिट नोट वर उल्लेखलेल्या 'दमदार' प्रक्रियेने तयार झालेली असते तरीसुद्धा  तिला कायद्यात विशेष महत्व आहे. पोलीस विभाग असो की  कोर्ट, या ऑडिट रिपोर्ट  वर प्रचंड प्रेम!! काही झालं की आधी ऑडिट रिपोर्ट विचारणारच! (अपराधसिद्धीसाठी ते आवश्यकही असेल). कधी कधी तर अपचारी सुद्धा त्याच्या बचावाच्या प्रतिवेदनात लिहितो की माझ्यावर जे घोटाळ्याचे आरोप लावले आहेत त्याचे यापूर्वीच ऑडिट झाले आहे आणि त्यामध्ये कोणताही आक्षेप निघालेला नव्हता!! मात्र अशा वेळी ऑडिटर ने हा आक्षेप का घेतला नव्हता हे विचारण्याची प्रथा आढळून येत नाही.
        ऑडिट नोट आली तरी तिच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. एक  तर त्या आक्षेपांच अनुपालन लवकर करावं असं कुणालाच वाटत नाही. यातील सर्वोच्च विनोद असा की 1970-80 च्या दशकातील आक्षेपांचे अनुपालन सुद्धा अद्याप प्रलंबित आहे. हे जुने आक्षेप म्हणजे नुसता वैताग!! बरं ज्यांच्या काळातील हे आक्षेप आहेत त्यातले किती हयात आहेत? फौजदारी गुन्हे सुद्धा एखादा गुन्हेगार मयत झाल्यावर निकाली निघतात मात्र ऑडिट आक्षेपांच्या बाबतीत ही सुद्धा सोय नाही.गेल्या  40- 50 वर्षात जेवढे  साहेब होऊन गेले त्यांनी याच अनुपालन केलं नाही किंवा अनुपालन दिले पण स्वीकारले नाही त्या अधिकाऱ्यांच  काय झालं , त्यांच्यावर कारवाई झाली का,  मग आपल्यावर तरी कशी होईल..यातूनच प्रेरणा घेऊन हे आक्षेप निकाली काढण्याचं कोणी मनावर घेत नाही.. एक तर 1970 च्या दशकातील आक्षेपांचे चे अनुपालन आत्ताचा कार्यरत साहेब करतो, अद्भुत आहे हे सगळं.!!..माझा काय संबंध हे म्हणायची तर अजिबात सोय नाही.!!  बरं एकदा बदली झाली की सुटले!! नवीन ठिकाणी नवीन आक्षेप  तयार करण्यासाठी मोकळे!! जोपर्यंत ज्या अधिकाऱ्याचा  काळातील आक्षेप आहेत  त्याच अधिकाऱ्याने निकाली काढण्याच दायित्व त्या अधिकाऱ्यावर पडणार नाही तोपर्यन्त या आक्षेपांच्या विळख्यातून प्रशासन मुक्त होणार नाही. 
     बरं या अनुपालनाची वेगळीच गंमत आहे. जे आक्षेप बऱ्याच वर्षापूर्वीपासून प्रलंबित आहेत बऱ्याचदा त्यांचे फक्त आकडेच सापडतात, ऑडिट नोटचा शोध लागत नाही आणि अनुपालन पाहिजे!!खुद्द ऑडिटर च्या कार्यालयात सुद्धा या जुन्या ऑडिट नोट सापडत नाहीत!!  एक तर या प्रलंबित आक्षेपांचे अनुपालन करण्यात फार कोणाला रस नसतो. एखादा हौशी साहेब येतो ज्याला वाटत माझ्या कार्यालयात काहीच pending नको... सगळं ok मध्ये  पाहिजे!! मग तो या  आक्षेपांच्या मागे लागतो. या साहेबाच्या कार्यालयातील मंडळी सुद्धा या 'बिनकामाच्या' कामामुळे वैतागून जातात. मग रेकॉर्ड ची शोधाशोध. नुसतं अनुपालन केलं ,दोन चार कागद जोडले म्हणजे प्रश्न सुटतो का? इथे सुद्धा 'सहकार्याची' भावना पाहिजेच!! नाहीतर काही अनुपालन करा, निष्फळ!! 'सहकार्याची'  भावना असेल तर मात्र कसल्याही चॉकलेट अनुपालनांनी आक्षेप वगळला जातो! उदा. यापुढे असे होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल किंवा अमुक अमुक करण्याची  कार्यवाही सुरू आहे किंवा आता रेकॉर्ड  उपलब्ध झाले आहे. अशा वेळी आतापर्यंत रेकॉर्ड सापडत नव्हते आता अचानक कुत्र्यांच्या छत्र्यासारखे कुठून प्रकट झाले  किंवा कार्यवाही सुरू आहे मग संपणार कधी किंवा यापुढे दक्षता घेण्यात येईल मग आतापर्यंत काय...... असो , असे अल्पप्रज्ञाधिष्टीत आणि कॉमन सेन्सला आवाहन देणारे  प्रतिप्रश्न विचारण्याची प्रथा अस्तित्वात नाही. कधी कधी तर अनुपालनासोबत जोडण्यात येणारे  पुरावे मानीव पद्धतीने जोडले जातात ,म्हणजे ऑडिटर ते पुरावे जोडले नसले तरी जणू काही जोडलेच आहेत असे गृहीत धरून  अनुपालन मंजूर करतो!!
   कधी कधी ऑडिटर आणि साहेब दोघांचीही आक्षेप काढण्याची निकड प्रचंड वाढते, यातून 'कॅम्प' प्रणालीचा जन्म होतो..कॅम्प हे दोघांच्या गरजेच प्रतीक असते.  इथे quality पेक्षा quantity ला जास्त महत्व असते, इथे सगळं ' wholesale ' मध्ये असते. या प्रणालीमध्ये सुद्धा बरेच आक्षेप निकाली निघतात....
अशा प्रकारे हा ऑडिट चा कार्यक्रम सालाबादप्रमाणे चालू असतो , राहील आणि ऑडिट मध्ये जे आक्षेप येतात(आणि येतच राहतील!) ते पुन्हा येणार नाहीत याबाबत यापुढेही 'सदैव दक्षता घेण्यात येईल' आणि ही कार्यवाही 'अविरत' चालू राहील....क्रमशः

©गोविंद खामकर

   











Saturday, July 9, 2022

साहेबाच प्रमोशन

लेख 18 वा : साहेबाच प्रोमोशन..
(यापूर्वीचे सर्व 17 लेख या   https://gamatijamati.blogspot.com   या लिंक वर उपलब्ध आहेत)

आधीच शासनातील पदांबाबत जनमानसात प्रचंड गैरसमज असतात... उदा. - मंत्रालयातील सहायकला सचिव म्हणणे, RTO inspector ला RTO म्हणणे, एकतर PSI  म्हणणे नाहीतर  डायरेक्ट SP ..मधलं काहीच नाही,  IAS ला आयुष्यभर collector म्हणणे वगैरे.. हे selection grade वगैरे असले(बिनकामाचे!)  प्रकार  तर साहेब सोडून कोणालाच माहीत नसतात.... त्यामुळे समाज आधीच साहेबाला मोठा साहेब  समजत असल्याने(गैरसमजाने का होईना!!) साहेबाला  त्याच promotion झाल हे सुद्धा सांगायची विशेष  सोय राहत नाही...!! काही पद तर शासनात अशी आहेत की जिथं 20-25 वर्ष प्रोमोशनच होत नाही, असल्या साहेबांना तर सार्वजनिक जीवनात प्रोमोशनवर बोलायचीच सोय नाही!!
 बरं promotion चा वेग आणि ज्या पदावर साहेब पदोन्नत होत आहे त्या  पदाच्या अधोगतीचा वेग समानुपाती असतो हे समीकरण तर ठरलेलच, त्यामुळे कामाचं स्वरूपही विशेष बदलत नाही..म्हणजे वरून आलेल साहेब सगळं खालीच ढकलायचा, आता आणखी जरा वरून खालीच ढकलनार एवढंच..... !!
 तरी पण साहेब आपल्या स्टाफ मध्ये तसेच त्याला  नियमित भेटणाऱ्या व्यक्तींसोबत हौसेने चर्चा करून त्यांना सांगत  असतो की आता promotion होणार, एक दोन महिन्यात होणार, थोड्याच दिवसात होणार वगैरे.... दोन महिन्याचे चार महिने,  सहा महिने, वर्ष होऊन जातं पण नुसत्याच चर्चा ....साहेबाला  आता या विषयाचा  पार वीट येतो ...मग साहेब हा विषय काढायचं सोडून देतो..!!   पण आधी साहेबानेच गावं पेटवले असल्यामुळे आता साहेबाला जो येतो तो विचारतो ..कधी होणार.!!.. घरचेसुद्धा गप बसून देत नाहीत ..नेमकं सांगा अजून किती दिवस लागणार.. किती दिवसाच पीठ दळून आणायचं , किती दिवसाचा किराणा आणायचा इथपर्यंत.. !! साहेब हतबल असतो!!..काही साहेब हे सगळं प्रकरण संघटनेवर विनाकारणच  शेकवत असतात, असले साहेब काही झालं की " संघटना काहीच करत नाही" असला बेचव डायलॉग मारून मोकळे होतात(संघटनेसाठी असले साहेब काय करत असतात तो संशोधनाचा विषय असतो पण याठिकाणी त्यावर चर्चा नको, संघटना हा  विषय वेगळ्या लेखात हाताळण्यात येईल.) शेवटी कंटाळून साहेब यावर चर्चा करायचं सोडून देतो..….
या चर्चांमुळे exit mode असलेल्या साहेबाच कामावर लक्ष नसतय आणि हा  साहेब जाणारच आहे हे स्टाफला माहीत असल्याने स्टाफ पण साहेबाने सांगितलेलं जास्त मनावर घेत नाही(एरव्ही देखील ते फार मनावर घेत होते असे काही नाही!!)..अशा अवस्थेत बऱ्यापैकी साहेबाच कार्यालयावरील नियंत्रण सुटलेलं असल्याने साहेबाला सुद्धा प्रोमोशन  होणं अत्यंत आवश्यक असते....
तसे प्रोमोशन हा प्रकार जरी ऐकायला कर्णमधुर वाटत असला तरी   हा प्रकार सगळ्याच साहेबाना आवडतो असा अजिबात भाग नाही..बऱ्याच विभागामध्ये अशी काही पद आहेत ज्यावरून पुढे साहेब प्रोमोशनच घेत नाहीत!! ..कारण काही साहेबांना   सध्या काम करत असलेले पद 'संपन्न' वाटत असल्याने  आणि तेथेच 'लक्ष्मी' कृपा असल्याने  promotion नकोच ही भावना काही साहेबांची असते ..(खरं तर  औदसेला लक्ष्मी म्हणण्याचा प्रकार गंभीर  आणि या 'लक्ष्मी'च  शास्त्रोक्त समर्थन करणे  अजून अतिगंभीर!!) )... तर काहींना चक्राकाराच्या चक्रात मान अडकण्याची भीती वाटत असल्याने promotion नको असते., तर काहींना प्रोमोशनने मिळणाऱ्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कटकटी नको असतात... म्हणजे आमची कोणाला पण साहेब म्हणायची तयारी आहे ..पण खरे 'साहेब' आम्हीच अशी ही promotion नाकारण्यामागची मानसिकता!!
पण हे सगळं चालू असताना   पदोन्नतीसाठी पात्र असलेले साहेबांची त्यासाठी आवश्यक असणारी कागद गोळा करायची लगबग सुरू असते...whatsapp चे नवे ग्रुप तयार होतात.. त्यावर नुसत्या गप्पा... असं करू, तसं करू... पण मुंबईला हेलपाटे मारायला कुणी तयार होत नाही( आणि काही गुपचूप जाऊन येतात ते कुणाला समजून पण देत नाहीत!)..अशा परिस्थितीत दोन चार   अतिउत्साही तथा सध्याच्या पदावर आणि विशेषतः posting ला वैतागलेले अथवा promotion नंतर चांगल्या ठिकाणी already setting लावलेले  असे  साहेब जरा पुढाकार घेऊन नेतृत्व हातात घेऊन मुंबईवाऱ्या करत असतात(असले प्रासंगिक नेते मुंबईकरांनाही आवडतात आणि सहकारी साहेबांणादेखील)....हे नेते मुंबईला जाऊन सर्वांच्या एकत्रित 'शुभेच्छा' देऊन येतात( हे नेतेच पुढील प्रक्रियेमध्ये 'सूत्रांच्या' भूमिकेत असतात)..काही साहेबांना असल्या 'सदिच्छा' त्यांच्या तत्वात बसत नसल्याने त्यात ते सहभागी होत नाहीत..काही साहेबांच्या हे तत्वात बसत असलं तरी कशाला 'सदिच्छा ' वाया घालवायच्या, बाकीच्यांच्या सदिच्छामधून आपला उदधार होणारच आहे  या भावनेतून ते पण सहभागी होत नाहीत......पण एकदा ' सदिच्छा' पोहचल्या की मग प्रशासन गतिमान होते,  प्रोमोशनच्या  प्रक्रियेचा वेग वाढतो, त्रुटींची संख्या आपोआप कमी होऊ लागते, फाईलचा प्रवास  top gear वर चाललेला असतो !! फाईलच्या location ची माहिती रेखांश अक्षांशा सहित सुत्रांमार्फत सगळ्या साहेबाना मिळत असते...सगळं एकदम Pro motion मध्ये!!!!   .(हे 'सूत्र' मात्र सहकारी साहेबांच्या फोनला मात्र पार वैतागून जातात, आणि सहकारी साहेब पण त्यांना जरा बोर झालं तरी काय करावं म्हणून या सूत्राना फोन करून त्यांना पण  बोर करत असतात .)
   एकदाची file clear होऊन येते!!
एवढ्या दिवस  एकजिवाने एकत्रित प्रयत्न करणारे साहेब अचानक  strategic mode वर जातात  आणि वैयक्तिक प्रयत्न सुरू करतात...!! विभागाचे options देण्यासाठी खलबत सुरू होतात, सगळे एकमेकांना पाण्यात पहायला लागतात, कोणीतरी प्रस्ताव मांडतो की आपण सर्वांनी एकत्रित विचार करून विभागाचे preferances भरू पण काही साहेब याला पण हरताळ फासतात..!!. जिथं posting पाहिजे तिथली फिल्डिंग लावण्याचा कार्यक्रम जोरदार सुरू होतो... हे साहेब एकमेकांना फोन करून तू कुठे पोस्टिंग  घेतोय वगैरे विचारून अंदाज बांधत  असतात....कोण किती खरं बोलतंय हे शेवटपर्यन्त समजत नाही!!  बरेच साहेब जास्तीत जास्त शिफारस पत्र गोळा करण्याच्या उद्योगात रमून जातात... तर काही साहेबांना असल्या पत्रावळ्यावर  भरोसा नसतो, ते थेट जाऊन एक घाव दोन तुकडे(आपण सुज्ञ आहात!)...हे असले उद्योग  करण्यासाठी बरेच साहेब या अटीतटीच्या काळात  medical leave वर असतात..याच पत्र घे, त्याच पत्र घे, याला भेट त्याला भेट...नुसती लगबग!!!
एकदाची posting ची order येते.. 
थोड्याफार साहेबांच्या मनासारखं झालेलं असतंय.. बाकीच्यांची अखिल महाराष्टात यथेच्छ फेकाफेक...!!
काही साहेब तर ही order आल्याबरोबर पुढच्या posting च planning सुरू करतात!! म्हणजे सेवेसाठी नोकऱ्या की बदल्यांसाठी नोकऱ्या हे सुद्धा कधी कधी समजत नाही...
अशा पद्धतीने साहेब नवीन ठिकाणी रुजू होतो...
आणि मग पुन्हा एकदा नवीन साहेब!!...मला असच पाहिजे, तसच पाहिजे,मी असच करणार, तसच करणार.... आणि मग काही दिवसांनी ... आपलं तस काय नसतय, आपल्याला कसं पण चालतय, तुम्ही म्हणताल तस वगैरे वगैरे!!!
क्रमशः
©गोविंद खामकर
(टीप:  'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व लेख   https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)

Monday, June 20, 2022

रजा

लेख 17 वा: रजा

ऑफिसमध्ये साहेबाला काम सुधरून देईना.. त्यात आठवड्याला 2-3 VC, वरच्या साहेबाच्या meeting, लोकांचे फोन, भानगडी, वरून शनिवार रविवार सुट्ट्या ,  शासकीय सुट्ट्या...कामाला वेळच मिळत नाही!!! साहेब पुरता जॅम झालेला...आणि त्यात पुन्हा कर्मचाऱ्यांच्या रजा!!!!
एकतर  साहेबाच्या ऑफिसला जरा कामाचे फक्त  दोन तीन कर्मचारी, त्यातले एक दोन  जण त्यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाच्या म्हणजे उदा. मेहुण्याच्या  चुलतसासुच्या पुतणीच्या लग्नाला जाण्यासाठी रजेवर... !! ,
साहेबाला लोकांच्या रजा काय सुधरून देत नाही!! त्यात या पाच दिवसाच्या आठवड्याने साहेबाची सगळी बोंब केली...सुट्टीदिवशी साहेब सोडून कुणीच मुख्यालयाला सापडत नाही! आणि आजकाल whatsapp च्या अतिरेकामुळे शनिवार रविवारी असो की शासकीय सुट्टी,  पण कार्यालय अघोषितरीत्या सुरुच असतंय....त्यात अमुक माहिती दोन  तासात पाठवा वगैरे असल्या message आले तर साहेबाचं डोकं जॅम होतंय...अशा वेळी  आता कोणाला ऑफिसला बोलवावं, कोण जास्त  नाटकं न करता येईल याच calculation करून साहेब कोणालातरी येऊन माझ्यावर उपकार कर या भावनेने बोलवत असतो..  तरीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात रजा हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असतो...
घरापासून बऱ्यापैकी  दूर कार्यरत असणारे म्हणजेच चक्राकाराच्या चक्रव्यूहात अडकल्याने  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  टाकलेले तथा फेकलेले अधिकारी शक्यतो  wholesale रजा घेतात. चक्राकाराचं  चक्रव्यूह सदैव भेदण्याची 'कला' प्राप्त झालेले साहेब सदैव योग्य ठिकाणी पोस्टिंग घेऊन  आयुष्याचा बहुतांशी  प्रवास किरकोळ रजेवरच करतात...
घरापासून जरा दूर असलेले साहेब नुसते   calender मध्ये लाल भडक तारखा शोधत असतात. . अशा साहेबाना कॅलेंडरमधील सुट्टीच्या   तारखांचा रंग लाल भडक करण्याचे प्रयोजन काय असेल हे लक्षात येत नाही, किमान शासकीय calender मध्ये तरी त्यांचा  रंग हिरवा अथवा प्रेमळ गुलाबी करायला काय हरकत आहे अशी यांची धारणा असते( कदाचित सरकारी कार्यालयात ज्या जनतेची  कामे pending आहेत त्यांच्यासाठी calender मधील शासकीय सुट्ट्यांच्या रंग लालभडक असावा!!).  मग आठवड्यातील एक दोन  लालभडक तारखा दिसल्या की साहेब आनंदित होतो... मग लगेच ती लालभडक तारीख आणि शनिवार रविवार यादरम्यान किरकोळ रजेच  फुल अलगदपणे   माळून साहेब सुट्टीवर जातो.!! किरकोळ रजा किती घ्यायच्या हे नियमात असलं तरी त्या मोजायच्या नसतात ही धारणा सर्व शासकीय कार्यालयांनी पक्की केलेली आहे., त्यामुळे  वर्षभरात 5-25 किरकोळ रजा घेणारे बरेच तज्ञ साहेब आणि कर्मचारी कार्यालयात असतात. किरकोळ रजा म्हणजे फारच किरकोळ हो!!!  किरकोळ रजेचा अर्ज सुद्धा बरेच कर्मचारी A4 size चा कागद निम्मा फाडून त्यावर करतात.. काही कार्यलयामध्ये सर्व कर्मचारी संगनमताने किरकोळ रजेचे अर्ज दुसऱ्या दिवशी काढून गायब करून टाकतात!!!
याच्या पुढचं version म्हणजे विनातारखेचा अर्ज सदैव देऊन ठेवायचा, एखादा मोठा साहेब चुकून हुकून  अचानक भेट द्यायला आला तर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्याचा हितचिंतक कर्मचारी  तत्परतेने त्या अर्जावर  त्यादिवशीची तारीख टाकून मोकळा होतो!!! 
रजेमध्ये पण सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे medical leave !! हे तर अवघड जागेवरच दुखणं आहे...साहेबाला अशा रजा इच्छा नसताना द्याव्या लागतात, त्यात पण त्या रजा genuine असेल तर ठीक नाहीतर काहीजण timing साधून आजारी पडतात, कुठून तरी certificate घेऊन येतात... मग साहेब check mate होतो...
सगळ्यात हास्यास्पद प्रकार म्हणजे जे प्रामाणिकपणे त्यांच काम पार पाडतात त्यांना रजा मिळत नाही आणि बिनकामाच्याना वरचा साहेब मनमोकळेपणाने रजा देऊन टाकतो... असल्या बिनकामच्यांवर साहेब कधी कधी एवढा 'मेहेरबान' होतो की त्यांना सक्तीच्या रजेवर सुद्धा पाठवतो!!!
साहेब जेंव्हा नवीन असतो तेंव्हा खालचे कर्मचारी अगदी शनिवारी रविवारी,सुट्टीच्या दिवशीसुद्धा   साहेबाला विचारून गावी वगैरे जातात! साहेब जरा जुना झाल्यानंतर मात्र टपालात परस्पर अर्ज टाकून गायब होण्याची प्रथा रुजू लागते. कधी कधी तर एखादा कर्मचारी रजेवर जाऊन 4-5 दिवसांनी माघारी येतो, त्यानंतर त्याच्या रजेचा अर्ज साहेबाच्या हातात पडतो, तेंव्हा साहेबाला समजत की  हा रजेवर गेला होता, गतिमान प्रशासन!! 
रजेसाठी कोणतं कारण दिलं पाहिजे म्हणजे साहेब रजा मंजूर करेल याचा अभ्यास अधिकारी कर्मचारी करत असतात. काही कर्मचारी तर  या रजेपायी कित्येक जवळचे, दूरचे नातेवाईक बिनधास्त scheme लागल्यासारखे मारून टाकतात!!! काही already मेलेले असतील त्यांना पण मरण्याचा second chance देऊन  टाकतात...कधी कधी साहेब विचार करतो याचे एवढे नातेवाईक मेले तरी अजून शिल्लक कसे!!
साहेबाकडे कोणी रजा मागायला आला तर साहेब आपलं उगाच त्याला विचारणार कशाला पाहिजे रजा ,इतके दिवस कशाला पाहिजे, एवढेच दिवस रजा घ्या.. पण साहेबाच्या असल्या dialogue चा काहीच उपयोग होत नाही, कर्मचारी जेवढी रजा घ्यायची तेवढी घेतोच!!! पण याच्या अगदी उलट अस की साहेबाला त्याच्या वरच्या साहेबाकडून रजा मंजूर करायला प्रचंड मेहनत करावी लागते..बऱ्याचदा साहेबाला वेळेवर सुट्टी मिळत नाही, साहेबाला वाटतं मी  कर्मचाऱ्यांना जशा  रजा  देतो तशा  त्याला त्याच्या साहेबाने दिल्या पाहिजे!!   स्वतः साहेब कितीही बेजबाबदार असला तरी तो स्वतःला जबाबदार समजत असतो आणि त्या दडपणाखाली तो स्वतःच रजा घेण्याचं बऱ्याचदा टाळतो!!
बरं साधारणवेळी रजेवर गेलं तर ठीक पण 
कधी कधी अधिकारी कर्मचारी एकदम timing साधून रजेवर जातात, म्हणजे भरपूर pendency झाली की रजा, एखादं क्लीष्ट भानगड समोर येणार आहे असं समजलं की रजा, वरचा साहेब रजेवरून आला की तो पुन्हा हात धुऊन काम करण्यासाठी मागे  लागणार म्हणून रजा वगैरे वगैरे, अशा वेळी साहेब पार हतबल होऊन जातो... सगळ्यात वाईट म्हणजे वरचा साहेब सारखा फोन करून progress विचारत राहतो(दुसरं तो तरी काय करणार!!) आणि खालच्या  साहेबाची so called यंत्रणा (आपल्याकडील त्रोटक ,अकुशल मनुष्यबळाला यंत्रणा का म्हणतात हे साहेबाला अजून समजलेल  नाही!  किमान एकाच पाण्यातील माशांनी अशी 'यंत्रणा' म्हणून थट्टा करू नये असे साहेबाला वाटत असते) म्हणजे कामाचे एक दोन कर्मचारी रजेवर गायब... साहेबाला हे सांगायची तर सोयच नाही की अमुक व्यक्ती रजेवर असल्याने मला अडचण येत आहे वगैरे... आणि जर चुकून साहेबाने वरच्या साहेबाला सांगितलच की अमुक व्यक्ती रजेवर आहे तर वरचा साहेब त्याला ' तुमची बाकीची यंत्रणा कामाला लावा' असला dialogue मारून मोकळा होतो... साहेब पण Yes Sir म्हणतो!!
काही काही साहेब  तर अद्भुत असतात, ते रजाच घेत नाहीत! अगदी शनिवार रविवारी पण हे  कामावर!! म्हणजे अस काय 'समाधान' त्यांना यातून लाभत याचा शोध घेतला पाहिजे..असले  साहेब retirement नंतर वेळ कसा घालवतात हे पण  पाहिलं पाहिजे..काही काही साहेब सेवनिवृत्तीच्या आधी 5-10 वर्षे जरा कमी सुट्ट्या घेऊन रजा रोखीकरनाचा लाभ मिळवतात आणि 5 वर्षे लवकर मरतात!! 
बरं  चुकून साहेबाला रजा मिळाली आणि साहेब रजेवर गेला तरी आज काल social media चा अतिरेक एवढा वाढलाय की साहेबाला office चे phone सुधरून देत नाही!!साहेब रजा घेऊन कुठं फिरायला गेला तरी या फोनमुळे तिथंच ऑफिस सुरू होऊन जातं!!  फिरायला नेलेली बायका पोरं साहेबाच्या फोनला वैतागून जातात..( हे प्रकरण साहेबाने कौशल्याने हाताळले नाहीतर जड जाऊ शकते !!)...
काही खाजगी अस्थापणामध्ये कर्मचाऱ्यांच  मानसिक संतुलन चांगलं राहावं यासाठी त्यांना compulsory  रजा दिली जाते, शासनाकडून एवढी  नाही पण किमान गरजेच्यावेळी हक्काने रजा मिळावी एवढी अपेक्षा!!!
क्रमशः
©गोविंद खामकर
(टीप: यापूर्वीचे सर्व 16 लेख  https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)

Saturday, April 23, 2022

16. साहेबाच ऑफिस

लेख 16 वा:  साहेबाच ऑफिस

साहेबाच ऑफिस कुठे असावं कुठे असु नये याबाबत बरेच मतप्रवाह असले तरी ते वर्दळीच्या ठिकाणाहून म्हणजे बस स्टँड, बाजार इ. पासून दूर असलं पाहिजे म्हणजे 'बिनकामाचे' लोक ऑफिसला येत नाहीत असा सार्वत्रिक गैरसमज पक्का आहे!!! खरं तर ज्याला यायचंयचं तो कुठं पण येतो हे बऱ्याच लपाछपीच्या प्रयोगानंतर सिद्ध झालेलेच आहे!!  साहेबाच ऑफिस स्वच्छ, सुंदर असावा की बकाल, ओसाड याबाबतही बरेच मतप्रवाह आहेत... ज्यांना त्यांच्यातला साहेब जिवंत ठेवायचा आहे त्यांना स्वच्छ सुंदर कार्यालय आवडत तर ज्याना प्रशासनात सिद्धी प्राप्त झाली आहे,  प्राप्त करायची आहे त्यांना कसलं पण ऑफिस चालतं(ते कुठेही चांगली batting करू शकतात... वयनिरपेक्ष, पदनिरपेक्ष, स्वयंसिद्ध!!).
        कार्यलयीन वेळेच्या बाबतीत साहेबाची माफक अपेक्षा एवढीच  असते की मी सोडून सगळ्यांनी वेळेवर कार्यालयात आलं पाहिजे!! कारण साहेबाला बाहेरची ,field वरची बरीच कामे असतात.!.. पण सगळ्याच कर्मचाऱ्यांना मात्र वेळेवर कार्यालयात येणारा साहेब आवडतो असे अजिबात नाही, कारण त्यांना पण वेळेत यावं लागेल !(असा गैरसमज!!). पण काही दिवसांनी साहेब त्या कार्यालयात जुना झाल्यावर साहेबाची पोथी सगळ्यांनी ओळ्खलेली असते , त्यामुळे साहेब वेळेवर आला तरी कर्मचारी वेळ पाळत नाहीत आणि  साहेबही त्यांचं विशेष काही करत नाही हे पण विशेष आहे! साहेब लवकर येऊनही   कर्मचारी  उशिरा येत असल्याने ते साहेबाला फारच awakrd वाटते, त्यामुळे अशी परिस्थिती उदभवू   नये म्हणून साहेब उशिराच येणे पसंद  करतो...काही काही कर्मचारी साहेब कधी पण येवो स्वतः मात्र वेळेत ऑफिसला  येऊन वेळेत घरी जातात त्यांना सलाम...
       साहेबाच ऑफिस 80:20 तत्वावर चालत, म्हणजे 20% कामाचे ,बाकीचे दिवस काढायला आलेले... साहेब पण 80% इकडं तिकडं 20% ऑफिसात...!!
साहेब त्या ऑफिसचा कुटुंबप्रमुख असल्याने साहेबाला कसली कसली प्रकरण हाताळावी लागतील याचा भरोसाच नाही..!! .म्हणजे पार एखाद्या कर्मचाऱ्याच्या मामाच्या पोराच्या पोराचं लग्न attend करण्यासाठी पण साहेबाला आग्रह  धरला जातो!!(साहेब एवढा रिकामा असतो का? काय माहिती.. असू पण शकतो). सर्वात महत्त्वाच म्हणजे ऑफिसमधील प्रत्येकाला वाटत साहेब मलाच खूप काम सांगतात, त्याला काहीच सांगत  नाही...अशा लोकांचे 'गैरसमज' साहेबालाच दूर करावे लागतात( गैरसमज हाच की तुमच्यातल एक पण कामाचं नाही!!) .कार्यालयात रिम, toner, printer, computer, internet connection यावरून नेहमी कुरबुर सुरू असते!! या समस्यांना फारच थोडे शासकीय  कार्यालये अपवाद असतील!! त्या computer मधलं त्या कर्मचाऱ्याला type करायचं सोडून काहीच समजत नाही  पण त्याला  computer एकदम भारीतला पाहिजे, वरून त्या computer ला password वगैरे  टाकून एकदम शासनाने  तो computer  आहेरामध्ये त्यालाच देऊन टाकल्यासारखा  अविर्भाव !!! कारण काय दिले जाते तर त्यात महत्वाच्या files आहेत वगैरे! शासनाच्या file मध्ये लपून ठेवण्यासारखं काही शिल्लक राहिलंय अस मला तरी काही वाटत नाही....बरं यातलं काही कमी पडल की चालले साहेबांकडे... रिम नाही, toner नाही, antivirus नाही, net slow आहे , माझे मागचेच xerox चे  बिलं अजून निघले नाहीत वगैरे....मोठे मोठे साहेब या असल्या मुलुभूत प्रश्नावर check mate होताना मी डोळ्यांनी पाहिलंय..!!!  मग साहेब    म्हणतो असले फालतू फालतू विषय माझ्याकडे आणायचे नाहीत( पण actually साहेबाकडून हे छोटे छोटे विषय पण सुटत नाहीत हे सत्य असतं!!)
     कार्यलयामध्ये काही modern भाट  असतात जे कायम साहेबाची सतत  स्तुती करत असतात.. साहेब हा color तुम्हाला छान दिसतो, साहेब तुमची personality लै भारी आहे, तल्लख बुद्धी, निडर  वगैरे वगैरे.... खरं एवढ्या रापलेल्या चेहऱ्यामागच सौदर्य पाहण्याची सौंदर्यदृष्टी त्याला प्राप्त झालेली असते की त्याचा उद्देश दुसराच काही असतो त्याच त्याला माहिती.!... पण सामान्यपणे ही स्तुतीसुमने उधळणाऱ्या व्यक्तीना फक्त साहेबामधेच सौन्दर्य का  दिसत यावर साहेबाने गांभीर्याने  विचार करायला हरकत नाही... पण अशा व्यक्ती या साहेबाच्या जवळच्या असतात असा गैरसमज असल्याने त्यांच्या  जास्त नादी कोणी लागत नाही!!
   साहेब जर कार्यलयात येणाऱ्या लोकांशी जरा  नीट बोलत असेल तर बहुतांशी कार्यालयातील  कर्मचारी त्यांच्याकडे आलेले  visitor साहेबांकडे पाठवून पाठवून देऊन मोकळे होतात, म्हणजे अगदी त्याला काही सांगायचा कंटाळा आला तरी तो काहीतरी अर्धवट सांगणार आणि वरून सांगणार वाटल्यास साहेबाला भेटून घ्या!! काही काही साहेबाना त्यांच्याकडे जास्त लोक आलेलं आवडत नाहीत, त्यामुळे तो खालच्याना सांगून टाकतो की  माझ्याकडं विनाकारण  कुणी आलं तर तुमची खैर नाही , त्यावेळी खालचा कर्मचारी कसाबसा किल्ला लढवायचा प्रयत्न करतो पण visitor ला पण साहेबाला भेटल्याशिवाय त्याचा हेलपाटा कारणी लागला असे वाटत नाही(पण शेवटी हेलपाटाच!)
काही काही कर्मचारी visitor आला की त्याच्याकडे बघतच नाहीत, Zero eye contact.!!...अशाने visitor वैतागून जातो(त्याला वैतागून सोडणे हा पण उद्देश असू शकतो!!)...मग कधीकधी त्या visitor चा पण बांध फुटतो, शाब्दिक चकमक होते... पण अशा चकमकींची सवय झालेली असल्याने  कर्मचाऱ्यांना याचा काहीच फरक पडत नाही..
कार्यालयामध्ये साहेब बेल मारून शिपायाला  बोलवुन सांगणार अमुक अमुक कर्मचाऱ्याला बोलावून आन लगेच शिपाई सांगणार साहेब ते चहा घ्यायला गेलेत!! सारख चहा ला जाणारे कर्मचारी  'चहा पाण्याचे' सगळे पैसे  प्रामाणिकपणे खरंच चहावरच  खर्च करतात का इथपर्यंत शंका येते..
बरं दुसऱ्या एखाद्याला बोलवायला सांगितले तर तो तिसऱ्याच टेबलला गेलेला... या टेबल कडून त्या टेबल कडे मग तिथला कर्मचारी तिसऱ्याच टेबल कडे असा संगीतखुर्चीचा कार्यक्रम दिवसभर चालू असतो... बरं हे कर्मचारी गप्पा काय मारतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे... म्हणजे युक्रेन युद्धापासून तर ह्याच आणि हीच कायतरी चाललंय इथपर्यंत सगळं cover करायचं पण ऑफिसमधील कामाबाबत चर्चा कटाक्षाने टाळली जाते!!
दुपारी जेवणाची सुट्टी कधी असावी याबाबत शासन निर्णय आहेच पण त्याची दखल कुणीच घेत नाही, खुद्द साहेब पण घेत नाही..!!.बरेच कर्मचारी सकाळीच जेवण करून येऊन दिवसभर 'चहा पाण्यावरच ' असतात...साधारणपणे  दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान हा भोजन सोहळा चालू असतो, या काळात साहेबाने कोणालाही बोलावलं तरी तो जेवायलाच गेलेला असतो!(नेमकं जेवायला जातो की गावजेवण घालायला जातो हे साहेबाला समजत नाही!).
कधी कधी  सहजच एखादा नेता,  कार्यकर्ता, पत्रकार इ.   साहेबाकडे येतो... तो सरळ सांगतो यापूर्वी जे साहेब होते  त्यांचं आम्हाला फार सहकार्य असायचं!! जुना साहेब एवढ्या सगळ्यांना 'सहकार्य' कसा करायचा हा प्रश्न साहेबाला शेवटपर्यंत सुटत नाही.
त्यांना साहेब कधी कधी विचारतो काही चहा वगैरे घेणार  का, मग न्हाय व्हय करता करता प्रकरण black tea जवळ येऊन मिटत!! नंतर इकडच्या तिकडच्या चर्चा( निव्वळ बिनकामच्या!!)..चर्चेचे विषय संपले तरी चहा येत नाही, तो मध्येच म्हणणार ,बरं जाऊद्या साहेब येतो आता,चहा नंतर घेऊ कधीतरी .. साहेब पण म्हणणार (फारच उथळ मनाने!) न्हाय आता चहा घेऊनच  जा!…चहा ला होणारा delay दोघांनाही असह्य होतो....त्यामुळे चहा सांगताना साहेबाने दरम्यानच्या काळात हे प्रकरण कसं हाताळावे याचा विचार पण केला पाहिजे!! काही ऑफिस मध्ये चहाच मशीन लावण्याचा प्रयोग काही  साहेबानी केला पण काही हौशी लोक चहासाठी साहेबाकडे यायला लागले!! विनाकारण OPD वाढली!! त्यामुळे बऱ्याच साहेबानी चालू मशीन काढून टाकलं!
हल्ली प्रत्येक कार्यालयात  Birthday नी पण धुराळा केलाय.!!..Birthday असला  की  ऑफिसमध्ये celebrate  होणारच.. पण जर  birthday सुट्टीच्या दिवशी आला तर त्याला साधा कोणी फोन सुद्धा करणार नाही !!! म्हणजे   Birthday च कौतुक फक्त कार्यालयीन वेळेतच!!  ज्या कर्मचाऱ्याला  एरव्ही कोणी काहीच विचारत नाही त्याला म्हणजे  'Birthday Boy' ला (अगदी वयनिरपेक्ष भावाने!!)    birthday दिवशी मध्ये  उभा करायचा, मग cake आणून कापायचा, नंतर संध्याकाळी  त्यालाच कापायचा!(याचसाठी केला होता अट्टाहास?)..त्यात birthday ला wish करताना अजून awkward परिस्थिती निर्माण होते, कारण cake कापताना एकदम गाण्याच्या सुरात Happy Bithday Dear अमुक तमुक म्हणताना 'Dear' शब्दाजवळ थोडासा break लागतोच!!  याला/हिला dear म्हणू की नको असा विचार करत असतानाच ही घटिका टळून जाते!!!(पण ज्याना dear म्हणायचच आहे ते म्हणून पण टाकतात!!)..(कृपया आपल्या कार्यालयात एखाद्याचा birthday असेल तर या लेखाची आठवण येऊ देऊ नये!!बिनधास्तपणे व्यक्त व्हा ही विनंती!!).
म्हणजे कार्यालयातील कामाचा वेळ(तसा बिनकामाचा!) असाच कसातरी timepass करण्यासाठी  घालविण्यासाठी सर्वांची धावपळ असते! असच एखाद्या उत्सवानिमित्त काही कार्यालयात मूर्तीची स्थापना करण्याची प्रथा आहे...मग सकाळी 10:30 ला आरतीला सगळे एकत्र येणार , नंतर तिथंच प्रसाद वाटप ,गप्पा टप्पा वगैरे.... तासभर घालवायचा... संध्याकाळी तसच....एकदा माझ्या कार्यालयातील कर्मचारी माझ्याकडे उत्सवानिमित्त मूर्ती स्थापण्याचा प्रस्ताव घेऊन आले, मी म्हणालो  आरतीची वेळ सकाळी कार्यालय सुरू होण्यापूर्वी आणि सायंकाळी कार्यालय संपण्याच्या नंतर असेल .... बस... संपला विषय....भक्ती, भाव कुठं गेला माहीत नाही पण परत तसा प्रस्ताव घेऊन माझ्याकडे कुणीच आलं नाही!!!
त्यात जर एखादं दोन दिवस साहेब रजेवर असेल तर मग साहेबाच ऑफिस नंदांवणासारखं फुलून येत... ज्याला जस वाटलं तसं... आनंदी आनंदी!!
तस संध्याकाळची वेळ झालेली असेल तर कुणाचं कुठंच मन लागत नाही, सगळ्यांना घरी जायची घाई... साहेब ऑफिसला नसेल आणि येण्याची काही लक्षणे नसतील तर लवकरच कल्टी मारता येते... काही ऑफिसमध्ये biometric attendance असल्यामुळे परतीचे सगळे दोर कापले जातात,अगदी शेवटच्या मिनिट म्हणजे शेवटच्या मंगलअष्टकासारखाच !! त्या biometric machine जवळील गर्दी सगळे ऑफिसच्या कामासाठी किती दर्दी आहेत याची साक्ष देत असते!! 
     असाच आला दिवस निघून जातो, उद्याचाही बहुदा तसाच जाणार!! साहेबाच्या मागे असलेला प्रचंड follow up, सारखे whatsapp चे messages, दौरे , आढावा बैठका याचा ताण... आणि असल निवांत  साहेबाच ऑफिस...साहेब धन्य होतो...!! 
(टीप: सदर लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने  केलेला असून त्याला तुम्ही काल्पनिक समजू शकता,कुणाच्याही भावना दुखावण्याचा यामागे उद्देश नाही... सध्या शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा ताणतणाव कमालीचा वाढत आहे याची जाणीव मला  आहे)
(यापूर्वीचे सर्व लेख सोबत दिलेल्या link वर उपलब्ध आहेत, तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत App वर देखील हे सर्व लेख उपलब्ध आहेत)

©गोविंद खामकर

Wednesday, April 20, 2022

साहेबाची VC

लेख 15 वा: साहेबाची VC

गेली दोन वर्ष covid ने नुसता धुमाकूळ घातला. त्याचे पडसाद  समाजातील सर्वच घटकावर पडले, तसे प्रशासनावर पण पडले. याच काळात VC च पीक लै जोरात  आलं. उठसूट VC करून करून साहेब ,कर्मचारी हैराण झाले....
सुरुवातीला म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी  VC हा विषय फक्त वरच्या मोठया मोठ्या साहेबांपर्यंत सीमित होता. जर एखाद्या साहेबाने सांगितलं की मला आज 3:00 वाजता VC आहे तर त्याच्याकडे जरा वेगळंच पाहिलं जायचं. साहेब VC मध्ये असताना कोणाचाही फोन जरी आला तरी साहेब हळू आवाजात बोलून सांगणार VC चालू  आहे तरी समोरची व्यक्ती कोणताही प्रतिप्रश्न न करता गुपचूप phone ठेवायची... म्हणजे थोडक्यात काय तर VC म्हणजे एकदम elite class feeling !!!
पण covid मध्ये VC च प्रचंड अब्रुनुकसान झाल, इज्जतच राहिली नाही., literally सांगायचं तर आता vc ला कुत्रं सुद्धा खात नाही....   covid ने तर VC पार तळागाळात पोहचवली(तशी रसातळाला पण नेली!).
 मोठ्या साहेबाना VC भरपूर असतात पण VC जॉईन करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी अजून एक दोन शतके सुटतील असं अजिबात वाटत नाही! म्हणजे VC जर मध्येच disconnect झाली आणि जवळ त्यातला कोण तज्ञ नसेल तर साहेब एकदम panic होतो. VC जरी वेळेवर सुरू झाली तरी VC घेणारा मुख्य साहेब सगळे join झालेत का याची खात्री करून घेतल्याशिवाय VC ला येत नाही. मुख्य साहेब येत नाही तोपर्यंत तिथला कोणीतरी उगाच बसून काय करावं म्हणून attendance घ्यायचं नाटक सुरू करतो, पण त्याला खालचे साहेब काही जास्त भाव देत नाहीत. मग मुख्य साहेबांची entry होते आणि खालचे जे साहेब अद्याप join नव्हते ते पटापट join होतात( म्हणजे मुख्य साहेब आधी खालचे साहेब नंतर ही परंपरा कायम आहे!).
मग VC सुरू झाल्यावर नेहमीप्रमाणे करून घेतो, उद्या करतो, थोडं राहीलय असली नेहमीची फेकफेकी सुरू होतेच(दुसरं VC मध्ये असतंय तरी काय?!!)पण आता VC दर 2-3 दिवसानी होत असल्याने साहेबांचा फेकफेकीचा scope बराच कमी झालाय. त्यामुळे त्यातली त्यात साहेबाला थोडं alert राहावं लागतंय. दुसरा VC चा फायदा म्हणजे साहेबाला headquarter (Head आणि Quarter यांचा जवळचा संबंध आहे असं कोणी समजू नये!) सहजासहजी सोडता येत नाही, नाहीतर साहेब कधीपण गायब होऊन कधी पण उगवायचे! शिवाय 10-15 मिन च्या VC साठी कार्यालयातून जिल्ह्याला जाऊन  तिकडेच दिवसभर बोंबलत हिंडण्याची प्रथा सुद्धा लोप पावत आहे...!!
वरचा साहेब खालच्या साहेबांची VC घेत असेल ती थोडीशी शिस्तबद्ध असते पण  खालचा साहेब जेंव्हा त्याच्या खालच्या field वरील कर्मचाऱ्यांची VC घेतो तेंव्हा तमाशा पाहण्यासारख्या असतो!!
पाहिले 10 मिनिटे तर कुणालाच कुणाचं काहिच सुधरत  नाही..मधीच कुणीतरी screen share करणार, कुणी जॉईन होतय तर कुणी left होतंय, नुसते कर्णकर्कश , भांड्याकुंड्याचे आवाज, कुठे कुत्रे भुंकल्याचा आवाज , भांडण , कुणाची 'अतिसंवेदनशील' चर्चा, कोण साहेबाला शिव्या देतय वगैरे असलं काहीपण ऐकायला येतंय....जोपर्यंत मध्येच विनाकारण  mike चालू करणे, unmute ठेवणे  आणि तत्सम प्रकार हे Non bailabale , cognizable offence ठरवले जात नाही तोपर्यंत परीस्थिती सुधारेल अस अजिबात चित्र नाही!!     .…जिथं 100 जण जॉईन होणं अपेक्षित आहे तिथं 30-40 च्या पुढं आकडा जात नाही...
मग साहेब जॉईन होतो. एकंदरीत हा सगळा तमाशा पाहून साहेब आधीच हतबल झालेला असतो, त्यात ज्यांचे mike चालू असतात ते सगळे Vivo11, SK, sSamy ,Tomy असल्या कसल्या पण नावाने जॉईन असतात त्यामुळे नेमकं सांगावं कुणाला ते पण सुधरत  नाही.. साहेब 2-4 जणांना सांगून पाहतो नंतर नाद सोडून देतो!! VC ला join झालेल्यांची संख्या फारच निराशाजनक असते, त्यामुळे field वरील लोकांच्या VC ह्या 100% उपस्थितीऐवजी  Quorum तत्वावर होण्याबाबत शासनाकडून एखादं परिपत्रक निघणे आवश्यक वाटते...एवढं झाल्यावर मग साहेब जे जे अनुपस्थित आहेत त्यांना नोटीस काढून त्यांचे खुलासे घेण्याचं फर्मान सोडतो आणि VC सुरू करतो( खरं तर प्रशासनामध्ये  निघालेल्या नोटिसंच पुढं काय होत यावर PhD होऊ शकते, आणि काय हरकत आहे करायला ,नाहीतर copy paste करून PhD मिळविणारे बरेच आहेत!!!).

एकंदरीत one to one आढावा घेण्याच्या mode मध्ये असलेला साहेब एकदम भाषण mode मध्ये येतो, सगळे विषय भराभर उरकून घेतो. साहेब कुणालाही काही विचारत नाही कारण ज्याला विचारलं तो कसाबसा mike सुरू करतो पण पुन्हा बंदच करत नाही, त्यामुळे वातावरण अजून बिघडते..
सगळ्यांना mute करून साहेब ( Host) कधीकधीVC घेतो पण मग फिल्डवरचे VC join करून ठेऊन देतात आणि आपली नेहमीची बिनकामाची कामे करत बसतात! त्यामुळे VC चा उद्देश सफल होत नाही....
त्यामुळे खरं तर   VC कशी join करायची, mute, unmute कसं करायचं, video चालू  बंद कसा करायचा याच mass training(शक्यतो शासकीय प्रशिक्षण संस्था नकोच!) घ्यायला पाहिजे पण ते  सुद्धा VC वर नको , प्रत्यक्षच!!!..नाहीतर तिथं पण तोच तमाशा होणार... !!!!
क्रमशः

©गोविंद खामकर
(टीप: यापूर्वीचे सर्व 14 लेख याच page वर उजव्या बाजूला उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)



 

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...