लेख 16 वा: साहेबाच ऑफिस
साहेबाच ऑफिस कुठे असावं कुठे असु नये याबाबत बरेच मतप्रवाह असले तरी ते वर्दळीच्या ठिकाणाहून म्हणजे बस स्टँड, बाजार इ. पासून दूर असलं पाहिजे म्हणजे 'बिनकामाचे' लोक ऑफिसला येत नाहीत असा सार्वत्रिक गैरसमज पक्का आहे!!! खरं तर ज्याला यायचंयचं तो कुठं पण येतो हे बऱ्याच लपाछपीच्या प्रयोगानंतर सिद्ध झालेलेच आहे!! साहेबाच ऑफिस स्वच्छ, सुंदर असावा की बकाल, ओसाड याबाबतही बरेच मतप्रवाह आहेत... ज्यांना त्यांच्यातला साहेब जिवंत ठेवायचा आहे त्यांना स्वच्छ सुंदर कार्यालय आवडत तर ज्याना प्रशासनात सिद्धी प्राप्त झाली आहे, प्राप्त करायची आहे त्यांना कसलं पण ऑफिस चालतं(ते कुठेही चांगली batting करू शकतात... वयनिरपेक्ष, पदनिरपेक्ष, स्वयंसिद्ध!!).
कार्यलयीन वेळेच्या बाबतीत साहेबाची माफक अपेक्षा एवढीच असते की मी सोडून सगळ्यांनी वेळेवर कार्यालयात आलं पाहिजे!! कारण साहेबाला बाहेरची ,field वरची बरीच कामे असतात.!.. पण सगळ्याच कर्मचाऱ्यांना मात्र वेळेवर कार्यालयात येणारा साहेब आवडतो असे अजिबात नाही, कारण त्यांना पण वेळेत यावं लागेल !(असा गैरसमज!!). पण काही दिवसांनी साहेब त्या कार्यालयात जुना झाल्यावर साहेबाची पोथी सगळ्यांनी ओळ्खलेली असते , त्यामुळे साहेब वेळेवर आला तरी कर्मचारी वेळ पाळत नाहीत आणि साहेबही त्यांचं विशेष काही करत नाही हे पण विशेष आहे! साहेब लवकर येऊनही कर्मचारी उशिरा येत असल्याने ते साहेबाला फारच awakrd वाटते, त्यामुळे अशी परिस्थिती उदभवू नये म्हणून साहेब उशिराच येणे पसंद करतो...काही काही कर्मचारी साहेब कधी पण येवो स्वतः मात्र वेळेत ऑफिसला येऊन वेळेत घरी जातात त्यांना सलाम...
साहेबाच ऑफिस 80:20 तत्वावर चालत, म्हणजे 20% कामाचे ,बाकीचे दिवस काढायला आलेले... साहेब पण 80% इकडं तिकडं 20% ऑफिसात...!!
साहेब त्या ऑफिसचा कुटुंबप्रमुख असल्याने साहेबाला कसली कसली प्रकरण हाताळावी लागतील याचा भरोसाच नाही..!! .म्हणजे पार एखाद्या कर्मचाऱ्याच्या मामाच्या पोराच्या पोराचं लग्न attend करण्यासाठी पण साहेबाला आग्रह धरला जातो!!(साहेब एवढा रिकामा असतो का? काय माहिती.. असू पण शकतो). सर्वात महत्त्वाच म्हणजे ऑफिसमधील प्रत्येकाला वाटत साहेब मलाच खूप काम सांगतात, त्याला काहीच सांगत नाही...अशा लोकांचे 'गैरसमज' साहेबालाच दूर करावे लागतात( गैरसमज हाच की तुमच्यातल एक पण कामाचं नाही!!) .कार्यालयात रिम, toner, printer, computer, internet connection यावरून नेहमी कुरबुर सुरू असते!! या समस्यांना फारच थोडे शासकीय कार्यालये अपवाद असतील!! त्या computer मधलं त्या कर्मचाऱ्याला type करायचं सोडून काहीच समजत नाही पण त्याला computer एकदम भारीतला पाहिजे, वरून त्या computer ला password वगैरे टाकून एकदम शासनाने तो computer आहेरामध्ये त्यालाच देऊन टाकल्यासारखा अविर्भाव !!! कारण काय दिले जाते तर त्यात महत्वाच्या files आहेत वगैरे! शासनाच्या file मध्ये लपून ठेवण्यासारखं काही शिल्लक राहिलंय अस मला तरी काही वाटत नाही....बरं यातलं काही कमी पडल की चालले साहेबांकडे... रिम नाही, toner नाही, antivirus नाही, net slow आहे , माझे मागचेच xerox चे बिलं अजून निघले नाहीत वगैरे....मोठे मोठे साहेब या असल्या मुलुभूत प्रश्नावर check mate होताना मी डोळ्यांनी पाहिलंय..!!! मग साहेब म्हणतो असले फालतू फालतू विषय माझ्याकडे आणायचे नाहीत( पण actually साहेबाकडून हे छोटे छोटे विषय पण सुटत नाहीत हे सत्य असतं!!)
कार्यलयामध्ये काही modern भाट असतात जे कायम साहेबाची सतत स्तुती करत असतात.. साहेब हा color तुम्हाला छान दिसतो, साहेब तुमची personality लै भारी आहे, तल्लख बुद्धी, निडर वगैरे वगैरे.... खरं एवढ्या रापलेल्या चेहऱ्यामागच सौदर्य पाहण्याची सौंदर्यदृष्टी त्याला प्राप्त झालेली असते की त्याचा उद्देश दुसराच काही असतो त्याच त्याला माहिती.!... पण सामान्यपणे ही स्तुतीसुमने उधळणाऱ्या व्यक्तीना फक्त साहेबामधेच सौन्दर्य का दिसत यावर साहेबाने गांभीर्याने विचार करायला हरकत नाही... पण अशा व्यक्ती या साहेबाच्या जवळच्या असतात असा गैरसमज असल्याने त्यांच्या जास्त नादी कोणी लागत नाही!!
साहेब जर कार्यलयात येणाऱ्या लोकांशी जरा नीट बोलत असेल तर बहुतांशी कार्यालयातील कर्मचारी त्यांच्याकडे आलेले visitor साहेबांकडे पाठवून पाठवून देऊन मोकळे होतात, म्हणजे अगदी त्याला काही सांगायचा कंटाळा आला तरी तो काहीतरी अर्धवट सांगणार आणि वरून सांगणार वाटल्यास साहेबाला भेटून घ्या!! काही काही साहेबाना त्यांच्याकडे जास्त लोक आलेलं आवडत नाहीत, त्यामुळे तो खालच्याना सांगून टाकतो की माझ्याकडं विनाकारण कुणी आलं तर तुमची खैर नाही , त्यावेळी खालचा कर्मचारी कसाबसा किल्ला लढवायचा प्रयत्न करतो पण visitor ला पण साहेबाला भेटल्याशिवाय त्याचा हेलपाटा कारणी लागला असे वाटत नाही(पण शेवटी हेलपाटाच!)
काही काही कर्मचारी visitor आला की त्याच्याकडे बघतच नाहीत, Zero eye contact.!!...अशाने visitor वैतागून जातो(त्याला वैतागून सोडणे हा पण उद्देश असू शकतो!!)...मग कधीकधी त्या visitor चा पण बांध फुटतो, शाब्दिक चकमक होते... पण अशा चकमकींची सवय झालेली असल्याने कर्मचाऱ्यांना याचा काहीच फरक पडत नाही..
कार्यालयामध्ये साहेब बेल मारून शिपायाला बोलवुन सांगणार अमुक अमुक कर्मचाऱ्याला बोलावून आन लगेच शिपाई सांगणार साहेब ते चहा घ्यायला गेलेत!! सारख चहा ला जाणारे कर्मचारी 'चहा पाण्याचे' सगळे पैसे प्रामाणिकपणे खरंच चहावरच खर्च करतात का इथपर्यंत शंका येते..
बरं दुसऱ्या एखाद्याला बोलवायला सांगितले तर तो तिसऱ्याच टेबलला गेलेला... या टेबल कडून त्या टेबल कडे मग तिथला कर्मचारी तिसऱ्याच टेबल कडे असा संगीतखुर्चीचा कार्यक्रम दिवसभर चालू असतो... बरं हे कर्मचारी गप्पा काय मारतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे... म्हणजे युक्रेन युद्धापासून तर ह्याच आणि हीच कायतरी चाललंय इथपर्यंत सगळं cover करायचं पण ऑफिसमधील कामाबाबत चर्चा कटाक्षाने टाळली जाते!!
दुपारी जेवणाची सुट्टी कधी असावी याबाबत शासन निर्णय आहेच पण त्याची दखल कुणीच घेत नाही, खुद्द साहेब पण घेत नाही..!!.बरेच कर्मचारी सकाळीच जेवण करून येऊन दिवसभर 'चहा पाण्यावरच ' असतात...साधारणपणे दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान हा भोजन सोहळा चालू असतो, या काळात साहेबाने कोणालाही बोलावलं तरी तो जेवायलाच गेलेला असतो!(नेमकं जेवायला जातो की गावजेवण घालायला जातो हे साहेबाला समजत नाही!).
कधी कधी सहजच एखादा नेता, कार्यकर्ता, पत्रकार इ. साहेबाकडे येतो... तो सरळ सांगतो यापूर्वी जे साहेब होते त्यांचं आम्हाला फार सहकार्य असायचं!! जुना साहेब एवढ्या सगळ्यांना 'सहकार्य' कसा करायचा हा प्रश्न साहेबाला शेवटपर्यंत सुटत नाही.
त्यांना साहेब कधी कधी विचारतो काही चहा वगैरे घेणार का, मग न्हाय व्हय करता करता प्रकरण black tea जवळ येऊन मिटत!! नंतर इकडच्या तिकडच्या चर्चा( निव्वळ बिनकामच्या!!)..चर्चेचे विषय संपले तरी चहा येत नाही, तो मध्येच म्हणणार ,बरं जाऊद्या साहेब येतो आता,चहा नंतर घेऊ कधीतरी .. साहेब पण म्हणणार (फारच उथळ मनाने!) न्हाय आता चहा घेऊनच जा!…चहा ला होणारा delay दोघांनाही असह्य होतो....त्यामुळे चहा सांगताना साहेबाने दरम्यानच्या काळात हे प्रकरण कसं हाताळावे याचा विचार पण केला पाहिजे!! काही ऑफिस मध्ये चहाच मशीन लावण्याचा प्रयोग काही साहेबानी केला पण काही हौशी लोक चहासाठी साहेबाकडे यायला लागले!! विनाकारण OPD वाढली!! त्यामुळे बऱ्याच साहेबानी चालू मशीन काढून टाकलं!
हल्ली प्रत्येक कार्यालयात Birthday नी पण धुराळा केलाय.!!..Birthday असला की ऑफिसमध्ये celebrate होणारच.. पण जर birthday सुट्टीच्या दिवशी आला तर त्याला साधा कोणी फोन सुद्धा करणार नाही !!! म्हणजे Birthday च कौतुक फक्त कार्यालयीन वेळेतच!! ज्या कर्मचाऱ्याला एरव्ही कोणी काहीच विचारत नाही त्याला म्हणजे 'Birthday Boy' ला (अगदी वयनिरपेक्ष भावाने!!) birthday दिवशी मध्ये उभा करायचा, मग cake आणून कापायचा, नंतर संध्याकाळी त्यालाच कापायचा!(याचसाठी केला होता अट्टाहास?)..त्यात birthday ला wish करताना अजून awkward परिस्थिती निर्माण होते, कारण cake कापताना एकदम गाण्याच्या सुरात Happy Bithday Dear अमुक तमुक म्हणताना 'Dear' शब्दाजवळ थोडासा break लागतोच!! याला/हिला dear म्हणू की नको असा विचार करत असतानाच ही घटिका टळून जाते!!!(पण ज्याना dear म्हणायचच आहे ते म्हणून पण टाकतात!!)..(कृपया आपल्या कार्यालयात एखाद्याचा birthday असेल तर या लेखाची आठवण येऊ देऊ नये!!बिनधास्तपणे व्यक्त व्हा ही विनंती!!).
म्हणजे कार्यालयातील कामाचा वेळ(तसा बिनकामाचा!) असाच कसातरी timepass करण्यासाठी घालविण्यासाठी सर्वांची धावपळ असते! असच एखाद्या उत्सवानिमित्त काही कार्यालयात मूर्तीची स्थापना करण्याची प्रथा आहे...मग सकाळी 10:30 ला आरतीला सगळे एकत्र येणार , नंतर तिथंच प्रसाद वाटप ,गप्पा टप्पा वगैरे.... तासभर घालवायचा... संध्याकाळी तसच....एकदा माझ्या कार्यालयातील कर्मचारी माझ्याकडे उत्सवानिमित्त मूर्ती स्थापण्याचा प्रस्ताव घेऊन आले, मी म्हणालो आरतीची वेळ सकाळी कार्यालय सुरू होण्यापूर्वी आणि सायंकाळी कार्यालय संपण्याच्या नंतर असेल .... बस... संपला विषय....भक्ती, भाव कुठं गेला माहीत नाही पण परत तसा प्रस्ताव घेऊन माझ्याकडे कुणीच आलं नाही!!!
त्यात जर एखादं दोन दिवस साहेब रजेवर असेल तर मग साहेबाच ऑफिस नंदांवणासारखं फुलून येत... ज्याला जस वाटलं तसं... आनंदी आनंदी!!
तस संध्याकाळची वेळ झालेली असेल तर कुणाचं कुठंच मन लागत नाही, सगळ्यांना घरी जायची घाई... साहेब ऑफिसला नसेल आणि येण्याची काही लक्षणे नसतील तर लवकरच कल्टी मारता येते... काही ऑफिसमध्ये biometric attendance असल्यामुळे परतीचे सगळे दोर कापले जातात,अगदी शेवटच्या मिनिट म्हणजे शेवटच्या मंगलअष्टकासारखाच !! त्या biometric machine जवळील गर्दी सगळे ऑफिसच्या कामासाठी किती दर्दी आहेत याची साक्ष देत असते!!
असाच आला दिवस निघून जातो, उद्याचाही बहुदा तसाच जाणार!! साहेबाच्या मागे असलेला प्रचंड follow up, सारखे whatsapp चे messages, दौरे , आढावा बैठका याचा ताण... आणि असल निवांत साहेबाच ऑफिस...साहेब धन्य होतो...!!
(टीप: सदर लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने केलेला असून त्याला तुम्ही काल्पनिक समजू शकता,कुणाच्याही भावना दुखावण्याचा यामागे उद्देश नाही... सध्या शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा ताणतणाव कमालीचा वाढत आहे याची जाणीव मला आहे)
(यापूर्वीचे सर्व लेख सोबत दिलेल्या link वर उपलब्ध आहेत, तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत App वर देखील हे सर्व लेख उपलब्ध आहेत)
©गोविंद खामकर