साहेब हा एक भटका प्रवर्ग आहे( Gypsy). साहेबाची इच्छा असो अथवा नसो,ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासन बदली करणारच! एकीकडे शासन स्थलांतर थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना साहेब कम्युनिटीला असं जाणीवपूर्वक शासन निर्णय काढू काढू भटकं करणं कितपत योग्य आहे?( साहेबांचं काम नाही पण किमान त्याच ठिकाण बदलून तरी साहेबाला फ्रेश करावं असा शासनाचा इरादा असावा!)सोयीच्या ठिकाणी बदली झाली नाही तर साहेबाला बरीच भटकंती करावी लागते. भटकंतीचे दोन तीन प्रकार आहेत. काही साहेब सहकुटुंब भटकंती करत फिरतात मग बदली कुठं का होईना. काही साहेब कुटुंब एका ठिकाणी ठेऊन स्वतः भटकत असतात, हे साहेब मुख्यालयातून शुक्रवारी दुपारी गायब होऊन सोमवारी दुपारपर्यंत मुख्यालयी प्रकट होतात. काही गृहप्रेमी साहेब शंभर दीडशे किलोमीटर दररोज भटकून भटकून घरी येतात, असले साहेब सकाळी 11:00 वाजता ऑफिस ला पोहचून सायंकाळी 4:00 वाजता ऑफिसमधून गायब होतात, या साहेबांची अर्धी जिंदगी प्रवासात बरबाद होते! (शिवाय प्रवासाने मणक्याच्या त्रास वगैरे हे सर्व additional benefits)...पण असो...
Tuesday, March 30, 2021
साहेबाची बदली
Monday, March 22, 2021
फील्ड कर्मचारी आढावा बैठक
एक तर साहेबाने मीटिंग लावलीरे लावली की त्याच दिवशी नेमकं साहेबाला VC असणार, वरचा साहेब मीटिंग लावणार, प्रोटोकॉल असलं काहीतरी लफडं मागे लागणार! अस दोन तीन वेळा मीटिंग रद्द होऊन एकदाचा मुहूर्त लागतो...
मीटिंग ची वेळ सकाळी 10:00 वाजता...पण 11:00 च्या आत कुणिच येणार नाही!!. साहेब पण नाही!( तसं तर साहेबाला वेळेवर मीटिंग सुरू करण्याची तीव्र इच्छा असते पण वेळेवर कुणी येतच नाही तर साहेब एकटा येऊन काय करणार?). मग कुठं तरी खालचे कर्मचारी यायला सुरुवात होणार पण ते सुद्धा मीटिंग हॉल ची ऍलर्जी असल्यासारखे बाहेरच इतर अशासकीय विषयावर गप्पा मारत निवांत बसणार. थोडक्यात जोपर्यंत साहेब मीटिंग हॉल ला येणार नाही तोपर्यंत हे अजिबात मीटिंग ला बसणार नाही( नेमकं साहेब हे आहेत की मी असं साहेबाला वाटून जात!). बरं हे खालचे कर्मचारी मीटिंगला काय माहिती घेऊन येतात हा संशोधनाचा विषय होऊ शकतो! काही काही प्रतिभावान कर्मचारी तर हातात काहीच आणत नाहीत!
मग मीटिंगला सुरुवात होते. साधारणपणे पन्नास ते साठ टक्के उपस्थिती पाहिल्यावर साहेब चिडचिड करणार.. मग खालचे कर्मचारी त्यांच्या कर्मचारी सवंगड्यांना फोन करून बोलावण्याचा प्रयत्न करणार..नेमकं मीटिंगच्या दिवशीच दहा वीस टक्के लोक त्यामध्ये कोण आजारी पडणार( अगदी planning करून), कोण लग्नाला, कोण साखरपुड्याला, कोण अत्यंत जवळच्या पाहुण्याच्या मयतीला तर कोण दहाव्याला, कोण मिटींगला येताना गाडीवरून पडणार वगैरे वगैरे कारणं शोधून गायब. काही तर नेहमीप्रमाणे काहीच न सांगता गायब! नेहमी गायब असणाऱ्याना साहेबाने स्वतःच्या समाधानासाठी 2-3 नोटीस दिल्यावर ते एकदा मीटिंग ला येतात, साहेब खुश होतो पण पुढच्या मीटिंग ला ते पुन्हा गायब! .. एक तर साहेबाला त्याच्या साहेबाने मीटिंग मध्ये झापझाप झापल्यामुळे साहेबाला पण त्याच्या खालच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग एकदम कडक घ्यायची इच्छा असते पण पाच पंचवीस टक्के लोक गैरहजर असल्यामुळे साहेबाचा प्लॅन fail जातो. मागच्या मीटिंग ला कोण कोण गैरहजर होत ते साहेब रागाने विचारतो पण ते कर्मचारी या मीटिंगला सुद्धा गैरहजर असतात त्यामुळे साहेब हा विषय इथंच सोडून देतो!(साहेबाला वाटतं विषय वाढवला तर बाकीच्यांना लक्षात येईल की साहेब नुसता दम देतो ,कारवाई काहीच करत नाही व त्यांचा पण confidence वाढून जे मीटिंग ला येतात ते पण मीटिंग ला यायचं बंद करतील!).
तरीसुद्धा साहेब एकदम कडक सुरुवात करतो! मीटिंग ला येताना साहेब अहवाल घेऊन यायला सांगतो पण जोपर्यंत साहेब विचारत विचारत नाही तोपर्यंत त्याच्या पिशवीतून ते काय बाहेर निघत नाही! मग साहेबाने सांगितल्यावर त्यातले निम्मे अर्धे अहवाल देतात... पण साहेबाला मात्र सगळ्या लोकांचा म्हणजे जे मीटिंग ला आले नाही त्यांचा अथवा जे मीटिंगला येऊन पण अहवाल देत नाहीत त्या सगळ्यांचा अहवाल मात्र वरच्या साहेबाला द्यावाच लागतो(खालचे कर्मचारी गैरहजर राहतात, वेळेवर येत नाही ही कारणे खालचा साहेब वरच्या साहेबाला तर सांगूच शकत नाही!!).. मग साहेबाला असाच काहीतरी आकड्याचा झोल करून वरच्या साहेबाला द्यावा लागतो(साहेबाची अस करण्याची इच्छा नसते पण साहेबांचा नाईलाज असतो). साहेबाला 50 ते 60 विषयाचा आढावा घ्यायचा असतो पण एवढ्या लोकांचा पहिल्या विषयाचा आढावा घ्यायलाच पहिला तास दीड तास जातो. काही तंत्रस्नेही साहेब थोडस चांगलं planning करून projector वर सुद्धा मीटिंग घेण्याचा प्रयत्न करतो पण हे नाटक थोड्याच दिवसात बंद पडत. पहिल्या विषयाचा आढावा तसा कडक होतो. हॉल मधील वातावरण थोडंफार तापलेल असतंय .त्यात पुन्हा निम्म्या लोकांची उत्तर दोन दिवसात करून घेतो, online केलंय पण दिसत नाही वगैरे वगैरे( वरच्या साहेबाला साहेब असलीच उत्तर देतो , ही सवय साहेबाला इथूनच लागते).मग साहेब त्यांना ओरडतो हे अस चालणार नाही, मी कारवाई करील वगैरे वगैरे.
या पहिल्या एक दीड तासात साहेबाला अतिशय गंभीर मुद्रा धारण करावी लागते कारण साहेब नुसता थोडं हसला तरी मीटिंग मधला दम निघून जातो. एवढं सगळं सुरू असताना उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हळूहळू आवक सुरू असतेच(संघटनेला वाहून घेतलेले बहुधा उशिरा येतात). साहेब त्यातल्या काहींवर चिडतो पण मीटिंग च्या मूळ विषयाची link तुटते त्यामुळे साहेब उशिरा येणाऱ्याला हटकायच पण सोडून देतो! तसं तर सगळेच उशिरा येतात पण नेमकं किती वाजताच्या नंतर आलं म्हणजे उशिरा समजायचं हा यक्षप्रश्न कधीच सुटत नाही... मग दुसरा विषय ..त्याच्यात पण हीच अवस्था ...मीटिंग कितीही विषयावर असली तरी खालच्या कर्मचाऱ्याकडे तेच कागद, तीच डायरी( काहींना एक डायरी पाच पाच वर्ष संपत नाही!) . काही विचारलं की तेवढेच दोन पान उचकायचे काही तरी फेकायचं, सगळा वेळ मारून न्यायचा कार्यक्रम !! (अगदी साहेबासारखंच) . साहेब त्यानी सांगितलेलं कुठं तरी लिहून घेतो जे त्याला पुन्हा कधीच सापडत नाही, पण सगळं नोंद घेतल्यासारखं दाखवावं लागतं. या खालच्या कर्मचार्यांचा basic problem हा असतो की ते नाही कशालाच म्हणत नाहीत आणि करत पण काहीच नाहीत ! अशा पद्धतीने पहिल्या एक दोन तासात 2-3 विषय संपत नाही तोच जेवणाची वेळ होते. मग जेवणाची सुट्टी!! अर्धा तासाची सुट्टी म्हणजे सगळ्यांनी एक तास गृहीत धरलेला असतोच! त्यात पण साहेबावर विश्वास असलेले तथा साहेबाची पोथी ओळ्खलेले दुपारीच गायब होतात.
मग पुन्हा बैठक सुरू होते, साहेब meeting ला आल्यानंतर मग लोक मीटिंग ला बसून घ्यायला सुरुवात करतात. काही VIP कर्मचारी तर थेट दुपारच्या सत्रातच meeting ला येतात!! मग अजून फार तर 2-3 विषयावर आढावा होतो(आढावा काही पण असो, उत्तर ठरलेलीच..दोन दिवसात करतो वगैरे वगैरे..).. आता मीटिंगला बऱ्यापैकी पठारावस्था प्राप्त झालेली असते..सगळ्या विषयात अतिशय सुमार दर्जाचा परफॉर्मन्स असल्यामुळे उर्वरित विषयातील कोणता विषय आधी घ्यावा ते साहेबाला समजत नाही. तरी पण आळीपाळीने झपाझापिचा कार्यक्रम सुरूच असतो. त्यातली त्यात प्रोटोकॉल, कमिटी असल्या कार्यक्रमात 'सहकार्य' न करणार्यांना साहेब जरा जास्तच झापतो(दुसरं करणार तरी काय?...)
बरेच विषय आढावा घ्यायचे बाकी असतात, ओरडू ओरडू साहेबाचा घसा दुखायला लागतो... पण विषय संपतच नाही... मग शेवटी बैठक आटोपती घ्यावी लागते..बहुतांशी विषयाला हात पण लागलेला नसतो...एवढा वेळ बैठक घेऊन साहेबाला मात्र समाधान वाटत नाही पण इलाज नसतो. उर्वरित विषय साहेब अक्षरशः फक्त वाचून दाखवतो, आता ह्या राहिलेल्या विषयात खालचे काय दिवा लावणार ते साहेबाला माहितीच असतंय तरी साहेब भोळी अपेक्षा ठेऊन सूचना देत असतो...सायंकाळी पाच साडेपाच वाजता बऱ्यापैकी चुळबुळ सुरू होते... घरी जायची घाई!! साहेब सोडून शक्यतो कोणी मुख्यालयी राहत नाही कारण मुख्यालयी फक्त साहेबानेच राहायचं असतंय हे ठरलेलं! कारण बाकीच्या सर्वांना चांगल्या सोयीसुविधा पाहिजे असतात , त्या मुख्यालयी असतीलच असे नाही... पण साहेब बिचारा adjust करून घेतो! अशा प्रकारे मीटिंग ची सांगता होते.. खालच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तथा फेकलेल्या आकड्यांच्या आधारे साहेब त्याचा report तयार करतो...तेच वरच्या साहेबाला फेकतो... असच वरचा साहेब पण..
- गोविंद खामकर
Saturday, March 20, 2021
कमिटी
आज काल प्रशासकीय कामकाज करताना साहेबाच्या मागे किती कामे असतात ते तर आपण पाहतच आहोत(आणि साहेब त्यातली किती करतो ते पण!). पण एवढ्यावर साहेबाला सोडील ते शासन कुठलं.. साहेब वर्षभर राबता राबता ज्या विविध योजना राबवतो त्याच मूल्यमापन अथवा फलश्रुती तपासण्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळ्या कमिटी फिल्डवर भेटी देत असतात. एक तर शंभर रुपयांची योजना राबवताना ज्या दोनशे अटींचे पालन करावे लागते, त्यामध्ये साहेब आणि यंत्रणा पूर्ण बेजार होते, तरीसुद्धा कामात काहीतरी चुका राहून जातातच....
असंच एखादं पत्र येऊन पडत, कमिटी येणार(सहाजिकच हे पत्र whatsapp वरच!!), साहेबाच्या दृष्टीने कमिटी म्हणजे घरच झालं थोडं अन... पण असो. यंत्रणा कामाला लागते(म्हणजे यापूर्वी अगदीच काम करत नव्हती अस नाही!). तसे कमिटी हा प्रकार नेहमीचाच असल्याने साहेब आणि त्याची यंत्रणा या कामात सराईत(सराईत शब्द जरा जड वाटेल पण राहुद्या आता!) झालेले असतात. कमिटी direct राज्य सरकारला अथवा विभागाला reporting करणार आहे असलं काहीतरी वरचे साहेब सांगत असतात, पण हे नेहमीचंच असल्याने साहेब त्याच जास्त tention घेत नाही . कमिटी येणार म्हणलं तर सगळ्यात आधी साहेबाच्या डोक्यात काय येत असेल तर यावेळी कमिटीचे 'नियोजन' कोणाच्या गळ्यात मारायचं! मग मागच्या वेळी हे नियोजन कोणी केलं होतं किंवा हे करण्यास कोण 'सक्षम' आहे या बाबींचा अभ्यास करून साहेब कोणाच्या तरी गळ्यात हे 'नियोजन' मारून टाकतो!! काही कर्मचारी नियोजन म्हणलं की दूरदूर पळतात, असले कर्मचारी साहेबाला अजिबात आवडत नाहीत. किंबहुना असले कर्मचारी साहेबाच्या 'चांगल्या' कर्मचाऱ्याच्या व्याख्येत बसतच नाही! कमिटीच सगळं 'नियोजन' व्यवस्थित करा असा निरोप वरचा साहेब आवर्जून देऊन मोकळा होतो. या नियोजनाला विशेष अशी तरतूद नसतेच.वरच्या साहेबाला विचारलं तर ते सांगणार ते तुमच्या 'लेव्हल' ला करून घ्या... एवढ्या वर्षात हे 'लेव्हल' नावाच लेखशीर्ष कुठंच सापडलं नाही, तरी पण होऊन जातं सगळं! (आता हे कसं होतं याची चर्चा इथं नकोच!). जे साहेब प्रशासनात नवीन नवीन आलेले असतात त्यांना हे'नियोजन' लवकर कळत नाही, ते वरच्या साहेबाला अजून खोदूखोदू विचारतात, मग वरच्या साहेबाची पण अडचण होते!! मग वरचा साहेब थेट खालच्या साहेबाच्या खालच्या कर्मचाऱ्याला संपर्क करून योग्य ते 'नियोजन' करण्यास सांगतो.. त्यामुळे नवीनच प्रशासनात आलेल्या साहेबाला कमिटीच प्रकरण जरा जडच जात कारण साहेबाला प्रशिक्षण संस्थेत शिकवलेले तत्वज्ञान आणि हे कमिटीच प्रकरण यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. त्यात वरचा साहेबच जर प्रशासनात नवीन तथा interview mode मधून बाहेर आलेला नसेल तर तो खालच्या साहेबांकडे आलेल्या कमिटीच्या भानगडीत अजिबात पडत नाही, तसेच खालचा साहेब हे सगळं कसं manage करतो हे पण त्याला विचारत नाही( हे पारदर्शक प्रशासनाच्या तत्वात कसं बसत ते वरच्या साहेबलाच माहीत). कमिटी नेमक्या कोणत्या गावांना भेट देणार ते शक्यतो आधीच ठरलेल असतंय.. गावातील लोक कसे आहेत, गावातील कर्मचारी कसे आहेत, गावातील कामाचा दर्जा, गावातल्या भानगडी, तक्रारकर्ते, राजकीय गटतट , 'सहकार्याची भावना' इत्यादी parameter पाहून गावे final केलेली असतात... मग कोणती कमिटी आली की त्याच गावात!!! दुसऱ्या गावांना संधीच(की शिक्षा?) नाही! अगदी दुष्काळ पाहणीसाठीएखादी कमिटी आली आणि तिला सगळ्या रस्त्याने सगळया गावांमध्ये जरी नुसता फुफाटा आणि कुसळच दिसली तरी पण साहेब रिस्क घेत नाही,त्या कमिटी ला पण नेहमी ठरलेल्याच गावात नेणार!...show fail नाही झाला पाहिजे ही प्रामाणिक भावना!!
एकदाची कमिटी गावात येते.. साहेब आणि यंत्रणा वाटच पाहत असतात (नाईलाजाने पण आतुरतेने).कमिटी आल्याबरोबर गावात जमलेले तथा वैतागलेले लोक त्यांचं स्वागत करतात. याकामी शक्यतो एका शिक्षकाची नेमणूक केलेली असते(तो पण ठरलेलाच). तो शिक्षक कमिटीच स्वागत करण्यापूर्वी थोडी गावातील इकडची तिकडची माहिती सांगतो. मध्ये मध्ये दोन चार शेर ट#2335;ाकतो , त्यातली त्यात 'यु ही पंख होणे से कूच नही होता, हौसलो से उडान होती है!' हे तर famous!(अतिशय संदर्भहीन पण सगळे गप ऐकून घेतात कारण Timepass करणे हा मूळ हेतू). नंतर हार तुरे देऊन फोटो बिटो काढून मग फील्ड visit कडे रवाना... तिथं पण तेच ठरलेले दोन चार 'पोपट' लाभार्थी... काही पण फेकतेत...हे लाभार्थी काय फेकणार हे त्या समितीतील दोन चार टाळके सोडले तर सगळ्यांना पाठ झालेलं असतंय. या गावात साहेबाने राबविलेल्या योजना प्रचंड यशस्वी झालेल्या असतात!(बाकीच्या गावात काय झालं ते साहेबाला निवांत विचारा!). एखाद्या योजनेमुळे तर एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्यच बदललेलं असत...त्याच उत्पन्न एवढं वाढलेल असतंय की कमिटीमधील एखाद्या सदस्याला frustration येतंय , मी शेतकरी असतो तर किती बरं झालं असत! त्यात एखादा कमिटी सदस्य सल्ला देणार की तुम्ही जे पिकवत आहात ते तुम्ही डायरेक्ट एखाद्या मॉल सोबत tie up करून अजून दोन चार पट कमवू शकता(हा सल्ला सगळेच कमिटी वाले देत असतात). साहेब पण मग जणू त्या कमिटी सदस्याने गुरुत्वाकर्षणचा शोध लावल्यासारखा impress झाल्याच दाखवतो(तस हे ऐकून ऐकून साहेबाचे कान पिकलेले असतात).एखादा कमिटीतील सदस्य तर input output च समीकरण सगळ्यांसमोर मांडतो, आपण खर्च कसा कमी करू शकतो याबद्दल माहिती देतो.. सगळे impress झाल्यासारख दाखवतात...एखाद्या योजनेमुळे त्या गावात सुरुवातीला पावसाळ्यात पण पाणी नसायचं आता उन्हाळ्यात पण फुल्ल पानी...सगळे impress... सगळीकडे असंच.. नुसती फेकफेकी... कमिटी शासकीय घर मिळालेल्या लाभार्थी ला विचारणार नवीन घरात गेल्यापासून आपला अनुभव काय... मग लाभार्थी म्हणणार fresh वाटतंय, बरं वाटतंय, पोराचं लग्न होत नव्हतं आता जुळलंय.. पण कमिटी च एवढ्यावर समाधान होत नाही.. मग लाभार्थी सांगणार पाहिले आम्हाला दररोज साप चावायचे आता कधीकधीच चावतात वगैरे वगैरे....
एखाद्या कमिटी सदस्याला या गावात राबविलेल्या योजना खूपच आवडतात, तो लगेच साहेबाला यावर success story बनवायला सांगतो, साहेब पण नक्की नक्की म्हणून म्हणून होकार दर्शवतो... पण Success story दिली की ते गाव पहायलाअजून कमिट्या येणार हे साहेबाच्या डोक्यात पक्क असल्यामुळे साहेब या भानगडीत पडतच नाही. सगळ्याच साहेबांचा याबाबत awareness वाढल्यामुळे आता शासनाने बऱ्याच योजनांमध्ये suuccess story सुद्धा compulsory सादर करण्यास सांगितले आहे! मग ती success story उत्कृष्ट ठरली तर अजून रिस्क वाढते त्यामुळे ती शक्यतो थातुरमातुर प्रकारची केली जाते...
त्यानंतर कमिटीला परिसरातील एखाद प्रसिद्ध देऊळ त्यांना दाखवायचं. काही कमिटी सदस्य तर फक्त देव देव करायला कमिटीत हिंडतेत का ते पण कळत नाही, कारण ते बाकी कशातच interest दाखवत नाही... देवदर्शनामुळे कमिटीला पण कामात काम झाल्यासारखा वाटत(साहेबाला कामात बिनकामच काम आल्याचं समाधान वाटतं!). एकदा मी कमिटीतील एका सदस्याला म्हटलो की इथल्या देवाच्या पाया पडलं तर घरात भांडण होत नाही, त्याचा दोन तास तिथून पायच निघेना... असो. कमिटी ची इच्छा असो अथवा नसो तिथं आरती वगैरे करायचीच ,timepass जास्तीत जास्त करायचा हे धोरण.
नंतर जेवणाचा कार्यक्रम...त्यासाठी साहेबाची काही यंत्रणा इकडे कार्यरत असते. ही मंडळी या कामात अनुभवी असल्याने सारख ते त्यांच्याच गळ्यात येत..हे काम जर व्यवस्थित झालं तर कमिटी नाराज होण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्या ठिकाणी जे जेवण मिळत तेच त्या परिसरातल best आहे असा कमिटीचा समज तयार केला जातो. मग अशा प्रकारे कमिटीला नमस्कार करून राम राम केला जातो( पुन्हा येऊ नये या अपेक्षेने!) . मग साहेबाला त्या गावातील लोक विनंती करतात साहेब पुढच्या वेळेस दुसरं गाव बघा, त्या गावात काम करणारे कर्मचारी तर पार वैतागून गेलेले असतात , ते पण सांगतात साहेब दुसरं गाव घ्या पुढच्या वेळेस...!! साहेब नुसताच हो हो म्हणतो .....मग थोडे दिवस जातात... मग दुसरी कमिटी.. तेच गाव.. तेच लाभार्थी... तेच देऊळ..
- गोविंद खामकर
Wednesday, March 17, 2021
कार्यशाळा
नुसतं कार्यशाळा शब्द ऐकला तरी कोणत्यापण साहेबाला गुदगुल्या झाल्यासारख वाटत! ह्या शब्दातच जादू आहे...जर पत्रामध्ये चुकून 'कार्यशाळा आणि आढावा बैठक ' असा शब्दप्रयोग आला तरी साहेबाला करमत नाही!! फक्त कार्यशाळा पाहिजे, आढावा नकोच(साहेब मीटिंग मध्ये आढावा कसा देतो ते माहितीच आहे!).कार्यशाळेच्या नावाखाली आढावा घेणार्यांना तर साहेब कम्युनिटी कधीच माफ करणार नाही...!! कार्यशाळा घेण्याचा शासनाचा उद्देश एखादे अभियान समजावून सांगणे, त्या राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविणे इत्यादी असला तरी साहेबाचा प्राथमिक आणि अंतिम हेतू दिवसभराच्या ऑफिसच्या कटकटीतून मुक्त होण्याचा असतो.. नुसतं कार्यशाळेच पत्र अथवा निरोप आला तरी साहेबाचे दोन तीन दिवस खूपच आनंदात जातात.. काही काही साहेब कार्यशाळेच्या आधल्या दिवशीच कार्यशाळेच्या ठिकाणी सर्व "नियोजनाच्या" तयारीने पोहचलेले असतात. कार्यशाळेला जाताना साहेब कोणतीच माहिती सोबत नेत नाही, फार तर साहेबासारखं दिसावं म्हणून एखादी डायरी(न उघडण्याच्या अटीवर) सोबत घेतो. कार्यशाळा घेणारा पण शेवटी साहेबच असल्याने त्याला हे खालच्या साहेबाचे गुण माहीत असतात, त्यामुळे तिथं एखादा पेन( शक्यतो 5 रुपयांच्या आतील), एखादं फोल्डर , माहितीपुस्तिका(साहेब असलं कधी वाचणार!) असलं तिथं गेल्यागेल्या हातात ठेवल जात. कार्यशाळेला पोहचल्यानंतर साहेब त्याच्या इतर साहेबमित्रांना भेटतो, चहापाणी करता करता कार्यशाळेचा मूळ विषय सोडून इतर सर्व विषयावर चर्चा करतो..मग कार्यशाळेच्या हॉल मध्ये प्रवेश केल्यावर साहेब त्याचे दोन चार जोडीदार पाहून शक्य तेवढं stage पासून लांब बसण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपापसात मनमोकळेपणाने चर्चा करता येईल. हॉलमध्ये सजवलेलं स्टेज, background ला सुरू असलेले instrumental music, मोठा प्रोजेक्टर इत्यादी पाहून साहेबाला अजून प्रसन्न वाटतं. नंतर मोठे मोठे 2-4 साहेब येतात, त्यांचा त्यांच्यातली त्यांच्यातच एकमेकांचा बुके देऊन सत्कार केला जातो, साहेब पण फुल energy ने टाळ्या कुटतो. स्वागत आणि प्रस्ताविक शक्यतो एखाद्या अशासकीय निवेदकाकडे असते, शासकीय साहेब हे काम करण्यासारखे कालांतराने राहत नाहीत! नंतर कार्यशाळेच्या मूळ विषयाकडे वळताना प्रोजेक्टरवर presentation द्वारे विषय समजून सांगितला जातो,पण साहेबाचा काही समजून घेण्याचा मुडच नसतोच!! (हे presentation सुद्धा बहुदा त्या अभियानासाठी नेमलेला कंत्राटी staff करत असतो. असंही प्रशासनात हे कंत्राटीच करत आहेत, बाकी शिपायापासून तर साहेबापर्यंत सगळेच साहेब !!). त्यातली त्यात जर presentation सुरू असताना चुकून light गेली, mike बंद झाला, जो presentation करतोय त्याला एखादा फोन आला वगैरे असं काही घडलं तर साहेबाची भावमुद्रा वरकरणी गंभीर दिसत असली तरी आतून मात्र सुखद लाडू फुटत असतात... Presentation मध्ये काही साहेबांनी योजना राबविताना ज्या success story तयार झालेल्या असतात त्या सर्वांना दाखवल्या जातात, त्याच presentation एवढं छान केलेलं असतंय की प्रत्यक्ष ते काम केलेला साहेब पण confuse होतो की हे नक्की मीच केलंय का.!! नंतर हे अभियान राबविताना आपल्याला कोणत्या activities करायच्या आहेत, record कसं ठेवावं लागेल, कोणाची काय जबाबदारी असेल , data entry कशी करावी लागेल, ते करताना काय काळजी घ्यायची , कोणत्या अडचणी येऊ शकतात या सर्व बाबींवर चर्चा केली जाते पण हे सगळं साहेबाच्या डोक्यावरून जात असतंय! साहेब विचार करतो हे मला का सांगत आहेत, माझ्या खालच्या कर्मचाऱ्यांना यांनी training द्यायला पाहिजे, सगळं काय साहेबानी बघायचं का? एकंदरीत आतापर्यंत सगळंच डोक्यावरून गेलेलं असतंय, पण साहेबाला त्याच्या खालच्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांवर विश्वास असतो, साहेबाचे कर्मचारी कार्यशाळेला न येतासुद्धा हे नक्की करू शकतात याची साहेबाला खात्री असते. कार्यशाळेमध्ये साहेबाच मन काही लागत नाही, पण सगळं समजल्यासारखं आणि अगदी मन लावून ऐकल्यासारखी acting मात्र करावीच लागते., त्यातली त्यात जर साहेबाची जागा stage पासून जरा जास्तच जवळ असेल तर साहेबाला कार्यशाळा असून पण दिवस वाया गेल्यासारखा वाटतो!त्यातली त्यात जर साहेबाचा साहेब सुद्धा कार्यशाळेला उपस्थित असेल तर साहेबाला अजून जबाबदारपणे ही acting करावी लागते! तसही मधे मधे आत बाहेर येणे जाणे हा timpass चालू असतोच, अधून मधून मोबाइल चाळने चालूच असते. ऑफिसच्या कामासंदर्भात बरेच फोन नेहमीप्रमाणे चालूच असतात पण साहेब कार्यशाळेच्या नावाखाली कोणालाच दाद देत नाही.. जरा वजनदार माणसाचा फोन असला तरी फोन उचलून अगदी हळू आवाजात सांगणार(जरी मोठ्याने बोलणे अथवा बाहेर जाऊन बोलणे शक्य असले तरीही!) मीटिंग मध्ये आहे,आणि फोन कट करून टाकणार. Stage वरचा एखादा साहेब पण कार्यशाळेच्या मुख्य विषयाला हात न घालता(मोठया साहेबाला पण विषय कितपत समजलेला असतो यावर भाष्य नकोच, पण साहेब असल्यामुळं जमून जातंय!) फक्त एवढंच सांगतो की आपण काम खूप करतो पण ते data entry करत नाही , online करत नाही त्यामुळे आपला performance कमी दिसतो, हे वाक्य प्रत्येक कार्यशाळेत ठरलेलंच...या वाक्याला खाली बसलेले सगळे साहेब अशी दाद देतात जणू काही हे सगळं काम 100 टक्के करून बसले फक्त online करायचं राहील!! हे सगळं करता करता साहेबाच्या पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात आणि मार्गदर्शन करणारा काहीतरी न समजणार सांगत सुटलेला असतो. तो मार्गदर्शन करणारा खाली बसून पुन्हा एखादा नवीन माणूस मार्गदर्शन करायला उठला तर मात्र साहेबाची अक्कल जाते...काही हुशार संधीसाधू साहेब Lunch break होण्यापूर्वीच जेवणाला सुरुवात करतात. साहेब पण कार्यशाळेच्या दिवशी dieting वगैरे च्या भानगडीत न पडता जेवणावर तुटून पडतो. जेवणानंतर कार्यशाळेच रूप बघण्यासारखं असतं... निम्मे अर्धे शिस्तप्रिय साहेब जेवण केल्याबरोबर गायब होतात.. उरलेले पण हॉल मध्ये जाऊ का नको, नाही गेलं तर काय होईल, गेलो तर निघता येईल का, खूप वेळ बसावं लागेल का या विचाराने ग्रासलेले असतात. कार्यशाळा घेणारे पण सगळ्यांना बसून घ्या , बसून घ्या , आपण लगेच संपून टाकू अस प्रलोभन देत असतात पण साहेब लोक लवकर दाद देत नाहीत.. एकंदरीत सगळेच ढेपाळलेले असतात.. कसातरी कार्यक्रम सुरू असतो..मग presentation दाखवणारा कसं तरी presentation पळवत पळवत कडेला न्यायचा प्रयत्न करतो.. आता परिस्थिती कोणाच्याच नियंत्रणात राहिलेली नसते. हा अटीतटिचा क्षण साधून कार्यशाळेची सांगता केली जाते!! जर चुकून एखाद्या साहेबाला विचारलं की नेमकं काय शिकवलं कार्यशाळेत, त्याची विकेट गेलीच म्हणून समजा. कार्यशाळा संपल्याबरोबर साहेबाला मुक्त झाल्यासारख वाटत... इथून पुढंचा सगळा 'कार्यक्रम' मात्र ठरल्याप्रमाणे होतो... काही काही कर्तव्यदक्ष साहेब आजचा दिवस 'गेला' या नकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात तर ओरिजनल साहेब आजचा दिवस 'निघाला' या सकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात....पुढच्या कार्यशाळेची वाट पाहत.... क्रमशः
( ' *साहेब* series मधील 'प्रशासनातील कोंबडशाही, शिपाईसाहेब, नवीन साहेब, साहेबाची मीटिंग, मामाच पत्र हरवलं, कार्यशाळा... क्रमशः)
*©* गोविंद खामकर
Sunday, March 14, 2021
मामाचं पत्र हरवलं...
शासनामध्ये टपालातुन पत्र वेळेत येईल असे कोणत्याच साहेबाला वाटत नाही..हे एकमेकांच्या कार्यक्षमतेवर आणि कर्तव्यतत्परतेवर असलेल्या प्रचंड विश्वासाच प्रतीक आहे.. सामान्यपणे एखाद पत्र साहेबाला त्या पत्राचा उगम झाल्यापासून पंधरा दिवसांनातर हातात येत... त्या पत्रात लिहिलेले असतंय तीन दिवसात अहवाल सादर करावा, विलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, किंवा हे अतिशय गंभीर आहे, आपण व्यक्तिशः लक्ष घालावे, तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी,अर्जदाराला परस्पर तुमच्या स्तरावरून कळून टाकावे इकडे कळवू सुद्धा नये वगैरे वगैरे.....आता पत्रच 15 दिवसांनी आल्यावर कधी अहवाल आणि कधी कार्यवाही ..असो. एरव्ही ही तर फॅशनच झाली आहे, सर्वस्वी जबाबदारी आपली राहील हे प्रत्येक पत्रात नमूद असतंय.. हे असले पत्र काढनाऱ्या साहेबांवर नेमकी कोणती जबाबदारी असते ते पण पाहिलं पाहिजे, कारण नुसते पत्र काढायला शक्यतो शासन एवढा पगार देणार नाही असं वाटतं(देऊ पण शकत, त्यात काय एवढं)!!
एखादं पत्र वरच्या साहेबाच्या ऑफिसमधून type झाल्यापासून तर ते Target तथा खालच्या साहेबाच्या हातात(कार्यलयात नाही!!) पडेपर्यंतच प्रवास फारच रोमांचक असतो... या पत्राचा प्रवास टपाल कक्षातील अतिकार्यक्षम कर्मचार्यांमुळे अजून खडतर होतो!! एक तर ते पत्र type करणारा दिवसभरात एकच पत्र करतो.. इतर उर्वरित तथा फावल्या वेळात 5-25 चहा, गप्पाटप्पा , फरक, इनक्रिमेंट, शेती,प्लॉटिंग आणि इतर राष्ट्रीय विषयावर चर्चा.... मग ते पत्र साहेबाच्या टेबल वर 2-4 दिवस कोंबड्याच्या प्रतीक्षेत!!
साहेबांच्या कोंबडा तथा स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर जावक नंबर टाकून अथवा असाच फेकून ते टपाल कक्षात जाणार.... साहजिकच टपाल कक्षात त्यावर प्रचंड विचारमंथन, चर्चा, आणि अंतिम निर्णय घेणे ही खूपच किचकट प्रक्रिया असल्याने या ठिकाणी घाई करून जमतच नाही!!! या ठिकाणची छोटीशी चूक सुद्धा परभणीचे पत्र जर्मनीला पाठवू शकते वगैरे वगैरे....त्यात पुन्हा टपाल कक्षातील कर्मचारी हे अतिशय सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याने त्याना सर्व वाढदिवस, आजारी पाहुण्याला भेटायला जाणे, मित्राच्या मुलाला मुलगी पाहायला जाणे, सुपारी, साखरपुढे, दहावे, सदिच्छा भेटी, देवदर्शन, नवस, चुलत मेहुण्याच्या चुलत सासुच्या चुलत पोराचं लग्न वगैरे वगैरे हे अटेंड करावेच लागतात. त्यामुळे त्या पत्राला तिथून निघण्यास उशीर झाला तर त्यात एवढं काय नवल आहे? त्यानंतर ते पत्र खालच्या ऑफिस च्या शिपाईसाहेबांच्या प्रतीक्षेत ... खालच्या ऑफिस चे शिपाई साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ते पत्र खालच्या साहेबाच्या टपाल कक्षात पोहच करतात... साहजिकच इथे सुद्धा अत्यंत अनुभवी (काहींनी तर आयुष्य टपाल कक्षात काढलय!) दद्धाचार्यांच्या हातून ते थोडंच अस न तपासता जाणार आहे!!!
तिथं त्याची आवक रजिस्टर ला सांकेतिक भाषेत( ही एक आवक जावक कक्षातील code language आहे, ही जो लिहितो त्यालाही शक्यतो वाचता येत नाही, बाकीच्यांचा तर विषयच नाही!! ) नोंद घेऊन ते पुढे साहेबांकडे जायला तयार...मग कार्यालयातील एखादा कर्मचारी ते पत्र marking करून(खरं तर पत्र साहेबाने मार्क केलं पाहिजे पण... साहेब..शेवटी साहेबच!!.. आता अजून काय बोलणार!) पुढे त्यासंबंधी टेबल वर शिपाईसाहेबामार्फत पाठवतो...एवढं सगळं systematic जंजाळ असताना पत्र उशिरा पोहचणे समजू शकतो पण पत्र न सापडणे हा गंभीर प्रकार शासकीय कार्यालयात नेहमीचाच.!!.. मी काही दिवस मंत्रालयात काम केलं , तिथपासून तर फील्डवरील सगळ्या कार्यालयात हीच बोंब.... साहेबाकडे येणारे अभ्यागत तथा पत्रकार, लाभार्थी, कार्यकर्ते, कार्यालयाच्या अवती भवती कायम पडीक दिसणारे एखादा कागद घेऊन येतात, त्यावर साहेबाच्या कार्यालयाची पोहच असते...साहेबाने तो कागद पाहिलेला नसतोच(अगदी नेहमीप्रमाणे!)..मग साहेब संबंधित टेबल वरच्या कर्मचाऱ्याला बोलावतो... साहजिकच नेहमीप्रमाणे तí#2379; पण म्हणतो त्यानेही तो कागद पाहिलेला नाही...मग कागद गेला कुठं?? साहेब चिडचिड करायला लागतो, तस सगळे तो कागद सापडवण्याचा प्रयत्न करतात अथवा किमान तस भासविण्याचा तरी प्रयत्न करतात, कागद काय सापडत नाही.... बरं हे नेहमी असंच!!!
पण साहेबाला काय मेळ लागत नाही कागद जातेत तरी कुठं!! कधी कधी तर साहेबाला वाटत सरसकट सगळ्यांच्या सोनोग्राफया तरी करून पहाव्या , कोण कागद खात बित तर नाही ना हे तर समजेल!!..... पण आता साहेबाने याला तोडगा काढला...जो व्यक्ती ती पोहच घेऊन येतो त्याचीच झेरॉक्स काढायची आणि तिथून पुढे त्या कागदावर काम सुरू करायचं(हे तत्व मंत्रालयापासून तर सगळ्यात खालच्या ऑफिस पर्यंत लागू आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय)!!
पण आता लोक पण हुशार झालेत, ते पत्रावर पोहच घेऊन 8 दिवसांनी माहिती अधिकारात विचारतात की अमुक अमुक तारखेला दिलेल्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील द्यावा. मग आता काय शोधणार... कुठं शोधणार...शोधून तरी काय होणार...!!!
...बरं ज्या पत्रांचा उगम साहेबाच्या ऑफिस मध्ये होतो तिथं पण तीच बोंब!! जर साहेबाला असं वाटलं की एखादा फील्ड वरील कर्मचारी कामाकडे फारच दुर्लक्ष करतोय(थोडफार चालतय!) तर साहेब त्याला नोटीस काढतो, पण नोटिसला उत्तर सुद्धा येत नाही, मग साहेब दुसरी नोटीस काढतो, तिला पण उत्तर येत नाही, साहेबाला त्या कर्मचाऱ्याच्या मुजोरपणाचा खूप राग येतो मग साहेब प्रथेनुसार तिसरी आणि अंतिम नोटीस काढतो( तीन नोटीस देण्याची प्रथा आहे, नियम नाही)...पण त्याला पण उत्तर नाही... त्यांनतर 2-3 दिवसांनी योगायोगाने नोटीस दिलेला कर्मचारी दुसऱ्या कामानिमित्त साहेबांकडे येतो... साहेबाला तो एकदम chill दिसतो, नोटिसचा लवलेशसुद्धा चेहऱयावर नाही!!! मग साहेब आवक जावक विभागातील तज्ञ कर्मचाऱ्याला बोलावतो.... तिन्ही नोटीस त्याच्याकडेच पडलेल्या!!!! बरं त्याला बोलून काय फायदा.. तो बऱ्याच वर्षांपासून अध्यात्माच्या मार्गावर घसरलेला असल्याने कमालीची स्थितप्रज्ञता त्याच्या अंगी असते, काही बोला, फरकच नाही..असो!!
हे झालं कागदी घोड्यांचं..
Email च तर लै अवघड...इकडचे म्हणणार पाठवला, तिकडले म्हणणार आला नाही... मग एकच तोडगा...पुन्हा पाठवा!!...मग येतो बरोबर.!!...हे कसं काय होत ते त्या सुंदर पिचाईलाच माहिती..आम्ही असलं एकदा Engineering च्या पहिल्या वर्षात 2006 साली केलं होतं, फोन करून विचारल होत email आला का... पण 2021 मध्ये तरी हे थांबलं पाहिजे!!.....
लहानपणी एक खेळ खेळायचो..... मामाच पत्र हरवलं... ते कोणाला सापडलं....आता समजतंय तो मामा साहेब होता!!!!
(काही शासकीय कार्यालयातील कर्मचारी टपाल कक्षामध्ये अत्यंत चांगलं काम करीत आहेत, काही ठिकाणी ई टपाल पद्धती सुद्धा चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे..हे लिखाण अगदी अपवादात्मक अनुभवावर आधारित आहे, जरी कोणाला वाटलं की हे माझ्या ऑफिसशी match होतंय त्यांनी सुधारणा करावी, इलाज नाही)
- गोविंद खामकर
Wednesday, March 10, 2021
साहेबाची मीटिंग
साहेबाच्या मागे भरपूर मिटिंग.. ...कामाच्या व्यापामुळे काही मीटिंग साहेब विसरून जातो.....साहेबाच्या खुर्चीच्या समोरच्या फळ्यावर पुढच्या मीटिंग ,कार्यक्रम वगैरे लिहिण्याची फॅशन साहेब जॉईन झाल्यापासून 5-6 दिवसात बंद पडते.
मीटिंग चा agenda येऊन पडतो... मरणामातीचे विषय... नेहमीप्रमाणे agenda आल्यानंतर तयारीला सुरुवात! मागची मीटिंग झाल्यापासून महिनाभर पाट्या टाकणे , भानगडी सोडविणे, कुटाने मिटविणे,आंदोलन, उपोषण, आमदार, मंत्री, उदघाटन प्रोटोकॉल ,कमिट्या, दुष्काळ, पूर, पाणी , पाऊस, धंदापाणी, पार्ट्या , अध्यात्म वगैरे यातच गेला... मग मिटिंगसाठी कर्मचारी कसले तरी report आणून टाकतेत, काही बिचारे तर आकडे बदलायची पण तसदी घेत नाहीत ,काही अंदाजेच आकडे हाणून टाकतेत...काही काही विषय तर फक्त साहेबालाच माहीत असतात... त्याचा बाकीच्या स्टाफ ला गंध पण नसतो!! शेवटी जमेल त्या पत्रावळ्या बांधून घेऊन साहेब मीटिंग ला निघतो...मीटिंग सुरू होण्यापूर्वी साहेब डायरी उचकुन बघतो, साहजिकच ती मागच्या मीटिंग नंतर थेट आजच उचकलेली असते!! साहेबाला वाटत जरा 2-4 दिवस आधी डायरी उचकुन बघितलीअसती तर जरा बरं झालं असतं.... मीटिंग सुरू होते...
मग एका एका विषयाच्या आढाव्याला सुरुवात होते. मीटिंग घेणारा साहेब मुद्देसूद मीटिंग घ्यायला लागला तर मग खालच्या साहेबांच्या फ्युज उडायला सुरुवात होते.. एक तर मिटींगला आणलेल्या पत्रावळ्यामध्ये जे पाहिजे ते सोडून बाकी सगळं सापडतं!! साहेबाने काही विचारलं की नुसते पानं चाळायचे...काही सापडणार नाही हे माहिती असतंय तरी acting करायची!!..नाहीतर गुपचूप चोरासारखं इकडं तिकडं बघून खाली वाकून संबंधित कर्मचाऱ्याला फोन करून आकडे , माहिती घेण्याचा प्रयत्न चालू असतो पण त्याचा फारसा उपयोग होत नाही!!आढावा घेणारा साहेब विचारत असतो अमुक विषयात आपला performance खूपच खराब आहे( तसा सगळ्याच विषयात खराबच असतो!!) तर आपला साहेब सांगणार साहेब आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे, सगळ्यांना सूचना दिल्या आहेत, बऱ्यापैकी काम झालं आहे, थोडंच राहील आहे, 100% करून घेतो असली काहीतरी मोघमछाप उत्तरे देण्याचा कार्यक्रम चालू असतो, पण याच साहेबाला जेंव्हा याचे फिल्डवरील कर्मचारी असली मोघम उत्तरे देतात तेंव्हा ती त्याला मुळीच आवडत नाहीत!!!
त्यात पुन्हा आढावा घेणाऱ्या साहेब आणि आढावा देणारा साहेब यांचे आकडे एकमेकांशी कधीच जुळत नाहीत, आणि हा जर विषय वेळीच गांभीर्याने घेतला नाही तर अजून किमान 50 वर्ष ह्या दोघांचे आकडे जुळण्याची सुतराम शक्यता नाही( शासनाने यासंबंधी एखादा अभ्यासगट नेमण्याची गरज आहे, पण त्या अभ्यासगटामध्ये पुन्हा असलेच साहेब घेणे कटाक्षाने टाळले पाहिजे!). बरं आकडे जुळले नाही की साहेब सांगणार आम्ही online केलं होत पण दिसतच नाही, technical problem आला, अपलोड झालं नाही, कस काय दिसेना तेच समजेना असल्या दयनीय ,केविलवाण्या ,कालबाह्य कारणांचा आधार घ्यायला सुद्धा साहेब मागे पुढे पाहत नाही.
प्रत्येक विषयाच्या आढाव्यात हेच.. करून घेतो, घेतो करून, पाहून घेतो, लक्ष घालतो(एवढ्या दिवस लक्ष कुठं होत हे विचारायचं नाही!)वगैरे वगैरे....
बऱ्याच विषयांबाबत साहेब बिनधास्त सांगून टाकतो दोन दिवसात करून घेतो... अख्खा महिना गेला तेंव्हा याला जमलं नाही आणि आता दोन दिवसात काय तिर मारणार ते साहेबाला माहिती...हे असले बरेच विषय दोन दिवसात संपवतो म्हणणाऱ्या सुपरमॅन साहेबांची कार्यक्षमता तपासण्यासाठी एकदा आढावा घेणाऱ्या साहेबाने यांची तिसऱ्या दिवशी मीटिंग घेतलीच पाहिजे!! त्याशिवाय ही दोन दिवसात करून घेतो म्हणण्याची अनिष्ट प्रथा समाप्त होणार नाही... पण आढावा घेणारा साहेब पण यांची कार्यक्षमता तपासण्याची रिस्क घेत #2344;ाही(शेवटी तो पण साहेबच!!)...
काही विषयामध्ये शून्य कामगिरी असते पण एखादा साहेब अमुक करताना तमुक technical problem येतो असं काहीतरी खुसपट काढतो ...वरच्या साहेबाला पण काय समजत नाही.. मग वरचा साहेब पण वेळ मारून नेण्यासाठी म्हणतो ठिक हे, दोन दिवसात करून घ्या... त्यामुळे बाकीच्या साहेबांवर आलेली संक्रात टळते...
एवढं सगळं होऊन एखादा तरी विषय असा असतो की त्यात साहेबाचा performance बाकीच्यांपेक्षा जरा बरा असतो पण नेमकं त्याच वेळी आढावा घेणारा साहेब म्हणतो मी काय आज या विषयाचा आढावा घेत बसणार नाही, जे राहिले त्यांनी लवकर विषय संपून टाका!! आता सांगा साहेबानी करायचं तरी काय....
प्रत्येक विषयाचा आढावा घेताना साहेब नमूद करतो की या विषयाचा वरच्या पातळीवरून प्रचंड फॉलोअप सुरू आहेत, मला स्वतःला showcause नोटीस आली, DO आला वगैरे.... थोडक्यात आढावा घेणाऱ्या साहेबाच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की मला नका घाबरू पण किमान माझ्या वरच्या साहेबाला तरी घाबरून काम होईल, पण त्याचा विशेष उपयोग होत नाही!!
असे प्रत्येक विषयामध्ये साहेबाची विकेट जात जात मीटिंग संपण्याची वेळ झालेली असते. एव्हाना सगळ्या साहेबाना बायकांचे (स्वतःच्या) फोन सुरू झालेले असतात, जेवायला येणार का वगैरे वगैरे, आढावा घेणाऱ्या साहेबाला पण फोन येत असतो पण तो बायकोचा फोन आहे असं समजू नये म्हणून त्याच्या वरच्या साहेबाला बोलल्याची acting करतो.. काही अतीऍक्टिव्ह साहेब घरून निघतानाच आज उशीर होणार अस सांगून पुढचं 'नियोजन' करून मीटिंगला निघतात.....मीटिंग सुटल्या सुटल्या कुजबुज सुरू होते लै काम आहे राव आपल्याला ,कस एवढं manage करायचं वगैरे वगैरे...मग सगळे साहेब मार्गस्थ होतात... काही श्रमपरिहारस्थळाकडे तर काही घराकडे... पुन्हा एकदा नव्या उमेदीने... पुढच्या मीटिंग ला चांगली तयारी करू असा निश्चय करून.... पण पुन्हा पुढच्या मीटिंग ला तीच बोंब... बदलीपर्यंत तेच...बदली झाली तरी तेच
- गोविंद खामकर
Thursday, March 4, 2021
शिपाई साहेब
राहुरीचा गुरुवारी बाजार!!! ऑफिस मध्ये फुल्ल गर्दी!! त्यात आज कालच्या नोकऱ्यांमध्ये मिटिंग, VC, आढावे, चौकशा, उपोषण,आंदोलन,बहिष्कार, ,प्रोटोकॉल,पंचनामे, पोस्टिंग आणि कोंबडे हाणून हाणून साहेब पार बेजार झालाय. एवढं सगळा राडा चाललेलं असताना कार्यालयातील शिपायाला पाहून साहेबाला साहेब होण्याचा निर्णय घेऊन चुकल्यासारखं वाटत!!
शिपायाला ना मीटिंग ना भानगडी, त्याला ना प्रोमोशन ची चिंता ना डीमोशनच भीती, ब्रह्मदेव आला तरी त्याच डीमोशन करू शकत नाही!!चांगलं काम केलं तरी शिपाईच, खराब केलं तरी शिपाईच! बदली झाली तरी काम तेच, कारवाई करायची झाली तरी जबाबदारी नसलेल्यावर कोणती जबाबदारी निश्चित करायची?? निलंबन केलं तर लगेच दुसरा नगाला नग कुठून आणायचा ??
बरं तुलनाच करायची झाली तर शिपाईसाहेबांच्या पगारापेक्षा साहेबांचं पगार दुप्पट पण नाही. कार्यालयात १४ हजारावर १४ तास काम करणारे २-४ कंत्राटी कर्मचार्यांचा एकत्रित पगार शिपायाएवढा!! एखाद्या खाजगी company मधल्या अर्ध्या साहेबांचं पगार सुद्धा सिनियर शिपाईसाहेबापेक्षा कमीच!! बरं काम काय तर साहेबांनी गंठी वाजवली तर ह्याला त्याला बोलविणे(ते पण साहेब ऑफिसात असला तर!!,साहेबाने वाजवलेल्या प्रत्त्येक घंटीमागे साधारणपणे १०० रुपये शासन शिपायाला देत असेल!!!), थोडं फार टपाल इकडे तिकडे नेणे , साफसफाईच काम यांनी बऱ्यापैकी Outsource केलेलं आहे ....
त्यात पुन्हा साहेबांचा शिपाई म्हणलं तर त्याला साहेब सोडून बाकीचे शक्यतो दुसरे कोणी काम सांगत नाही. साहेबांचे आणि शिपायाचे कसलेही संबंध असले तरी साहेब शिपायच सगळं ऐकतो(तस तर साहेब सगळ्यांचंच ऐकतो!!) हे बाकीच्या स्टाफ च्या डोक्यात फिट असतंय....त्यामुळे तो साहेबांचा शिपाई असला तर बाकीच्यांचा तो साहेबच असतो. त्यामुळे शिपायांमध्ये पण साहेबांचा शिपाई ही क्रिम पोस्टिंग आहे.
दिवसभर निवांत ,शांत चित्ताने संध्याकाळी 6:00 वाजायची वाट बघत शिपाई राहू शकतो . ना शुगर ना बीपी... (साहेबांची sugar लेवल म्हणजे साखर कारखाना टाकता येईल एवढी)... नंतर अवांतर उद्योग करायला मोकळा. एकदा त्यानी कार्यालय सोडलं की त्याला कोणी फोन पण करत नाही आणि केला आणि त्यानी उचलला नाही तरी पण साहेब त्याच विशेष काही करू शकत नाही!! आयुष्यात अजून काय पाहिजे....
शिपाई पदाच सर्वात जास्त आकर्षण कोणाला असेल तर त्याच्या साहेबाला!! बरेच साहेब ज्यांना बाकीच्या गोष्टीत लै interst नाही ते साहेबाच्या पगारात शिपायचे काम करू शकतेत, पण तशी offer त्यांना कोणी देत नाही....बर साहेबाला शिपाई होण्याचं सुख पाहिजेच असलं तरी साहेबांचं किती demotion केल तरी त्याला शिपाई कोणी करणार नाही!!
त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे फार महत्वाचे आहे, आपली एखादी चूक सुद्धा आपल्याला शिपाई न करता साहेब बनवू शकते जे आयुष्यभर भोगावे लागते.....
म्हणूनच शिपायांचा साहेब होण्यापेक्षा साहेबांचा शिपाई म्हणजेच शिपाईसाहेब व्हा!! आपलं आयुष्यच बदलून जाऊ शकते...
- गोविंद खामकर
Monday, March 1, 2021
प्रशासनातील कोंबडशाही
काल राहुरीतील एक पत्रकार सांगत होता गेल्या 5-10 वर्षात प्रशासन फार गतिमान झालंय ...पण त्याला या गतिमानतेची मूळ मेख माहीतच नाही.....त्याला तरी कसं कळणार!! ही प्रशासन तथा कोंबडशाहीतील गोपनीयता टिकवण्यासाठी हा कोंबड्यांचा खेळ office copy वर असतो,कार्यालयातून बाहेर जाणाऱ्या प्रतीवर नसतो!!
प्रशासनात काम करताना एक सामान्य आणि सर्वमान्य गैरसमज असा असतो की खालच्याना वाटत वरचे सगळं तपासतात आणि वरच्यांना वाटतं खालून सगळं तपासूनच आलंय!! ह्या एकमेकांवरील दृढ (अंध) विश्वासावरच प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान होतंय...साहेब खालच्या कर्मचाऱ्याला चार चार वेळा विचारतो बरोबर केलंय ना, काही चुकीचं तर नाही ना, नक्की ना etc... पण साहेब वाचायची ' Risk' घेत नाही...नियम कायदे वाचायला या गतिमान प्रशासनात वेळच नाही... त्यामुळे बहुतेक वेळा common (non)sense वरच कार्यक्रम चालू असतो...पण यामध्ये सही तथा स्वाक्षरी तथा कोंबडा याचा फार महत्वाचा रोल असतो. साहेबाच्या सहीच्या शेजारी छोटे छोटे दोन चार कोंबडे असल्याशिवाय साहेबाला सही करायला comfortable वाटतच नाही. याठिकाणी साहेबांची ती सही आणि बाकीच्यांचा तो कोंबडा ही धारणा पक्की आहे....
बाकीच्यांचे कोंबडे साहेबांच्या शिक्क्याच्या शेजारी गर्दीत, दाटीवाटीत, वाकडेतिकडे उभे असतात आणि साहेबांचा कोंबडा ऐटीत मोरासारखा शिक्यावर बसलेला असतो. साहेबाला खालच्या कोंबड्यावर कितीही विश्वास असला तरी वेळ आल्यावर खालचे कोंबडे नेमके कुणाचे हे cocktail ( cocktail शब्दाचा उगम इथंच असावा!!)समजतच नाही आणि ऐटीत बसलेल्या साहेबाच्या कोंबड्यामुळे साहेबांचा कार्यक्रम होतो. पण गतिमान प्रशासनात असल्या तुश्च विचारांना थारा नाहीच....त्यात एखादे प्रकरण जरा अवघड दिसलं की साहेबाच्या खालचे एक तर कोंबडा हानीत नाहीत आणि हाणला तर त्याची size पार सेंटीमीटर वरून मिलीमीटर वर आणतेत.....पण साहेबाच्या कोंबड्याला लपायची सोय नाहीच.....
कालांतराने अनुभवातून(कोंबडे हाणण्याच्या) साहेबांचं confidence वाढत जातो आणि तो बाजूला कोंबडे आहेत की नाही ते पण बघत नाही.....मग साहेब खऱ्या अर्थाने गतिमान प्रशासनाचा जनक होतो.. साहेबाचा table कधी पण मोकळाच, कर्मचारी कागद घेऊन येतो की लगेच साहेब पण शिक्का दिसला की हान कोंबडा....... ह्या गतिमानतेमुळे साहेबाच्या खालची मंडळी जॅम खुश असते. साहेबांनी सही करताना लै बारीक पाहिलं की ते कुणालाच आवडत नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी सुद्धा साहेब पटापट कोंबडे हाणतो.
....ह्या गतिमान प्रशासनाच्या राड्यात साहेबाच्या 'सहीचा' कधी कोंबडा होतो ते कळतच नाही.... आणि चुकून गटारी आली तर कोंबडा मात्र साहेबाचाच कापला जातो....
- श्री. गोविंद खामकर
प्रोटोकॉल
लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...
-
साईड पोस्टिंग ही प्रशासनाची आध्यात्मिक शाखा आहे. लाल दिवे , नोकरचाकर, बंगले गाड्या , लोकसेवा , समाजसेवा हे सर्व मोहमाया आहे असे ज्यांना कळू...
-
साहेब आणि whatsapp!!! माहितीच्या अधिकारानंतर प्रशासनात अमूलाग्र बदल करणारा घटक म्हणजे Whatsapp !! क्रांतीच म्हणा ना! एक महत्वाची गोष्ट ...
-
काल राहुरीतील एक पत्रकार सांगत होता गेल्या 5-10 वर्षात प्रशासन फार गतिमान झालंय ...पण त्याला या गतिमानतेची मूळ मेख माहीतच नाही.....त्...
-
साहेबाच्या मागे भरपूर मिटिंग.. ...कामाच्या व्यापामुळे काही मीटिंग साहेब विसरून जातो.....साहेबाच्या खुर्चीच्या समोरच्या फळ्याव...
-
बदल्यांचा सिजन संपलेला असतो. नवीन ठिकाणी पोस्टिंग झालेला साहेब कार्यालयात रुजू होण्याआधीच काही अतिउत्साही मंडळी साहेबाला फोन करून साहेब कधी ...